शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (13:39 IST)

दारुडे नातेवाईक ते मारहाण; देशभरातल्या रुग्णालयात नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांची काय स्थिती आहे?

कोलकाताच्या आर जी कार सरकारी रूग्णालयात वैद्यकीय पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर सगळीकडे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात असून देशभरात अनेक ठिकाणी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन पुकारलं आहे.
 
या घटनेची चौकशी होईपर्यंत आरोग्य सेवा स्थगित करणार असल्याचा इशारा दिल्ली, मुंबई, कोलकातासह देशभरातील सरकारी रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलाय.
 
या पाशवी बलात्कार आणि निर्घृण हत्येची सखोल चौकशी व्हावी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हे सततचे हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष कायदा केला जावा, अशी मागणी देशभरातील डॉक्टर करत आहेत.
 
लॅन्सेटच्या अहवालानुसार 2007 ते 2019 या काळात भारतात आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या 153 घटना नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रत्यक्षात हा आकडा अजून बराच जास्त आहे.
 
Violence Against Healthcare Workers (VAHCW) ही संघटना भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची नोंद घेते. त्यांच्या अहवालानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या 2020 मध्ये 225 तर 2021 मध्ये 110 घटना घडलेल्या आहेत.
 
यामध्ये अगदी कनिष्ट स्तरावरील आरोग्य सेविका ते हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. या अहवालात आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी केलेल्या 2020 च्या केद्रींय कायद्याचा उल्लेख आहे.
बीबीसीच्या वार्ताहरांनी देशभरातील प्रतिष्ठित सरकारी रुग्णालय व महाविद्यालयांना भेट दिली. महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटणारी भीती आणि खास करून नाइट शिफ्टमधील सुरक्षा यासंबंधी त्यांच्याशीच बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
दिल्लीः ‘रुग्णांसोबत येणाऱ्या दारुड्या नातेवाईकांमुळे मनस्ताप नेहमीचाच..’
लोकनायक हॉस्पिटल, जी. बी. पंत हॉस्पिटल आणि लेडी हार्डिंग कॉलेज ही दिल्लीतील तीन प्रमुख आणि प्रतिष्ठित रुग्णालय आहेत. यातली पहिली दोन दिल्ली राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात तर तिसरं रुग्णालय केंद्र सरकारकडून चालवलं जातं‌.
 
लोकनायक हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर्स बसवण्यात आलेले आहेत. पण हे प्रयोजन अगदीच तोकडं असून त्यांची कोणी निगराणी देखील करत नाही, असा आरोप इथल्या एक वरिष्ठ रहिवासी डॉक्टरांनी केला.‘’तिन्ही रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. पण त्याने काही फारसा फरक पडत नाही. कारण त्यांच्यावर कोणी नजरच ठेवत नाही,’’ लोकनायक हॉस्पिटलमधीलच आणखी एका राहिवासी डॉक्टरांनी आपली खंत व्यक्त केली.
 
“रुग्णांच्या नातेवाईकांकडून सतत धमक्या मिळत असतात. बऱ्याचदा तर ते दारू पिऊन नशेतच आलेले असतात. त्यामुळे आम्ही सतत भीतीत असतो,” लोकनायक हॉस्पिटल मधील एक सेविका सांगत होती.
“हॉस्पिटलच्या या भागात लाईट्सच नाहीत. त्यामुळे इथे रात्रीचा अंधार असतो. बरेचशे रुग्णांचे नातेवाईक इथेच हॉस्पिटलच्या आवारात फरशीवर झोपलेले असतात,” लोकनायक हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी बीबीसीशी बोलताना म्हणाला.
 
या तिन्ही रुग्णालयांमधली सुरक्षा व्यवस्था अतिशय तकलादू आहे. हॉस्पिटलच्या आवारात शिरताना आमचीही तपासणी झाली नाही. प्रसूती विभागात शिरताना महिला सुरक्षारक्षकांनी नावापुरतं फक्त भेटीचं कारण विचारलं. जुजबी उत्तर दिल्यानंतर पुढे कुठली चौकशी न करता आम्हाला आत सोडलं.
 
“इथली सुरक्षा व्यवस्था सुधारली पाहिजे. काही रुग्णांचे नातेवाईक तर इथे येऊन अक्षरशः धिंगाणा घालतात. त्यांना आवरण्यासाठी खरं तर हॉस्पिटलने बाऊन्सर्स ठेवले पाहिजेत,” असं मत राजघाट जवळील जी बी पंत हॉस्पिटल मधल्या एका नर्सने आमच्याशी बोलताना व्यक्त केलं.“हॉस्पिटलचं कॅन्टीन 24 तास सुरू असलं तरी रात्री तिथे जायला भीती वाटते. त्यामुळे रात्रपाळीत भूक लागली तर मी बाहेरून ऑनलाईन जेवण मागवते,” असं इथली एक वरिष्ठ रहिवासी डॉक्टर म्हणाली.
 
लेडी हार्डिंग कॉलेजमधल्या एका महिला राहिवासी डॉक्टरने आपली तक्रार व्यक्त केली. “हॉस्पिटलचा परिसर बराच मोठा आहे. रात्रपाळीत बऱ्याचदा रुग्णाची कोणती मेडिकल टेस्ट करायची असल्यास आवारातील एका टोकावरून दुसऱ्या टोकावरच्या इमारतीकडे जावं लागतं. तेव्हा बरीच भीती वाटते.”
 
लेडी हार्डिंगमधल्या एका प्रशिक्षणार्थीनं सांगितलं की कधीकधी मानसिक रोगी असलेल्या पुरुषांच्या वॉर्डमध्ये तपासणीसाठी महिला डॉक्टरला पाठवलं जातं. तिच्या मते हे धोकादायक असून हा प्रकार तत्काळ थांबवला पाहिजे. रात्रपाळीत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आराम करायला किंवा बसायला ज्या खोल्या आहेत त्या अस्वच्छ आणि असुरक्षित असल्याची तक्रार अनेकांनी केली. “आम्हाला नवीन आणि चांगल्या खोल्या हव्या आहेत,” अशी मागणी लोकनायक हॉस्पिटलमधल्या प्रसूतीगृहात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने केली.
 
लेडी हार्डिंग कॉलेजमधल्या काही विभागांमध्ये तर पुरुष आणि महिलांसाठी एकच रेस्ट रुम असल्याचं एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने सांगितलं.
प्रशासनाची प्रतिक्रिया : यावर हॉस्पिटल प्रशासनाची प्रतिक्रिया अद्याप मिळायची आहे.
 
मुंबईः ‘मदतीला आजूबाजूला कोणीच नसतं तेव्हा फार भीती वाटते’
सोमवारी संध्याकाळी आम्ही गेलो तेव्हा जे जे हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक हजर होते. हॉस्पिटलच्या आवारात आम्ही आलो पण आत मेडिकल प्रभागात परवानगीशिवाय जाता आलं नाही. तरीही “रात्रपाळीत काम करताना भीती वाटतेच,” असं इथल्या महिला डॉक्टर आणि रुग्णसेविका आमच्याशी बोलताना म्हणाल्या.
 
“हॉस्पिटलच्या आवारातील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली गेली पाहिजे,” अशी अपेक्षा आदिती कानडे या इथल्या रहिवासी डॉक्टरांनी व्यक्त केली.‘’हॉस्पिटलचा परिसर विस्तीर्ण आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर लाईट्स नाहीत. रात्री वसतिगृहातून मेडिकल वार्ड मध्ये कामासाठी जाताना भीती वाटते,’’ डॉक्टर आदिती सांगत होत्या.
 
एक रुग्ण दगावल्यानंतर त्यांचे नातेवाईक एकदम आक्रमक झाले. काही केल्या ते शांत होत नव्हते. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आम्हाला स्वतःला रुममध्ये कोंडून घ्यावं लागल्याची आठवण त्यांनी सांगितली.“अनेक खोल्यांमध्ये आणि व्हरांड्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे असायला हवेत. तसंच शस्त्रक्रिया विभागात महिला डॉक्टरांसाठी वेगळी खोली असायला हवी. पुरुष आणि महिलांसाठी एकच खोली असल्यामुळे आमची मोठी अडचण होते,” डॉक्टर आदितींनी आपल्या समस्येला वाचा फोडली. हेमलता गजबे या इथे मागच्या 26 वर्षांपासून रुग्णसेविका / परिचारिका म्हणून काम करत आहेत. त्यांनी देखील इथली सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याची तक्रार केली.
 
“रुग्णांचे नातेवाईक भेट द्यायला येतात तेव्हा ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. बऱ्याचदा तर दारू पिऊन आलेले असतात. काही जण राजकीय दबाव टाकायचा प्रयत्न करतात. कधी कधी आजूबाजूला मदतीला कोणीच नसल्यामुळे अनेक दुर्घटनाही घडलेल्या आहेत,’’ हेमलता आपला अनुभव आणि असहाय्यता व्यक्त करत होत्या‌.
 
प्रशासनाची प्रतिक्रिया : बीबीसीने जे जे हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी साबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
 
लखनौः ‘कोणीही कुठल्याही तपासणी शिवाय सर्रास आत येतो’
आम्ही किंग्स मेडिकल युनिव्हर्सिटीच्या आवारात शिरलो जिथे आम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर 2 सुरक्षारक्षक दिसले खरे पण त्यांनी आमची ना कुठली अडवणूक केली ना चौकशी. आत मेडिसिन विभागात जाताना पुन्हा 3 सुरक्षारक्षक दिसले. त्यातले दोन पुरुष तर एक महिला होती.
 
‘रुग्णांचे नातेवाईक कामावर असलेल्या डॉक्टरांशी हमखास हुज्जत घालतात, प्रसंगी त्यांना धमकावतात,’’ अशी तक्रार आमच्याजवळ वरिष्ठ राहिवासी डॉक्टर नीता यांनी केली.‘’अशा वेळेस गरज पडली तर आम्ही सुरक्षा रक्षकांना बोलवतो. पण ते स्वतःहून कधीच मदतीला धावून येत नाहीत. शेवटी आमचं आम्हालाच बघावं लागतं. कशीबशी मोठ्या मुश्किलीने आम्ही परिस्थिती हाताळतो,‘’ असं डॉक्टर नीता म्हणाल्या. वसतिगृहाच्या परिसरात आम्हाला पुरेसे लाईट्स आढळले नाहीत‌. काही भाग हा अंधारलेलाच होता.
 
एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी हर्षिता आणि नीतू आम्हाला सांगत होत्या की, "बाहेरचे लोक हमखास हॉस्पिटलच्या आवारात फिरत असतात. अश्लील आणि अर्वाच्य शेरेबाजी करत जातात. प्रशासनानं यासाठी काहीतरी करायला हवं. प्रवेशद्वारावरची निगराणी आणखी कडक व्हायला हवी‌. मागच्या काही महिन्यात इथली गस्त वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे आजकाल थोडंसं सुरक्षित वाटतं,” असं हर्षिता म्हणाल्या. मुलींच्या वसतिगृहासमोरच असलेल्या ट्रॉमा सेंटर बाहेर महिलांची छेडछाड झाल्याचे अनेक प्रसंग घडल्याचं आम्हाला एका डॉक्टरांनी सांगितलं.
 
हॉस्पिटल प्रशासनाची प्रतिक्रिया : किंग्स कॉलेज प्रशासनाचे प्रवक्ते डॉक्टर सुधीर सिंह म्हणाले की, ‘’कॉलेज, वस्तीगृह आणि हॉस्पिटलच्या प्रत्येक विभागात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. वस्तीगृहावर निगराणी ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे. रुग्णांच्या वॉर्डमध्ये खास सुरक्षारक्षक ठेवले गेलेत. मागच्या काही काळात हॉस्पिटलच्या आवारात एकही दुर्घटना घडलेली नाही. विशाखा गाईडलाईनचं पालन फक्त कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात करण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या आवारात प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि त्यांची निगराणी वेळोवेळी होत असते.
 
हैदराबादः ‘मला इथे सुरक्षित वाटत नाही’
हैदराबाद मधील उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोलकाता दुर्घटनेतील पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी निषेध मोर्चा काढला. सोमवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान मी या रुग्णालयाला भेट दिली. इथल्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
 
“आम्हाला इथे सुरक्षित वाटत नाही. हॉस्पिटल आवारातील काही भागात तर अगदीच नाही,” मोर्चात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर हरिनी मला सांगत होत्या. “रात्रपाळीत काम करत असताना एका विभागातून दुसऱ्या विभागात पळापळ करावी लागते. इथला कॅम्पस बराच मोठा आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात बरंच अंतर पार करावं लागतं. इथे ना कुठली सुरक्षा व्यवस्था आहे ना सुरक्षा रक्षक,” डॉक्टर हरिनी तक्रारीच्या सुरात म्हणाल्या.
 
हॉस्पिटल पासून वसतिगृहापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दिव्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रकाश अपुरा असतो. एका महिला डॉक्टरनं विश्रांतीसाठी पुरुष आणि महिला डॉक्टरांना वेगवेगळी खोली उपलब्ध नसल्याचंही सांगितलं. “त्या खोलीत पुरुष आणि महिला डॉक्टर आजूबाजूला बसलेले असतात. मला ते सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे थोडी विश्रांती घ्यायची असेल तर मी सरळ माझ्या वसतिगृहात जाऊन बसते,” असं मला डॉक्टर हरिनी यांनी सांगितलं.
 
“एकदा रात्रपाळी आटपून सकाळी मी माझ्या दुचाकीवर वसतिगृहातून परतत असताना काही मुलांनी माझा पाठलाग केला. या प्रसंगानंतर मी प्रचंड घाबरले होते,” हरिनी तिला आलेला वाईट अनुभव नमूद करत होती.
अपघात विभागात तैनात असलेला एक पोलीस आम्हाला दिसला. तसेच प्रत्येक प्रवेशद्वारा जवळ खासगी सुरक्षा रक्षकही नेमलेले होते.
प्रशासनाची प्रतिक्रिया : प्रतिक्रिया मिळवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू आहे.
 
चंदीगडः ‘आम्हाला न्याय हवाय’
राहिवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGI) मधील वैद्यकीय सेवा ठप्प पडली होती. कोलकाता दुर्घटनेतील पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी इथल्या रहिवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला होता. मी रात्री 11 च्या दरम्यान हॉस्पिटलला गेलो. ट्रॉमा सेंटर बाहेर दोन सुरक्षारक्षक थांबलेले दिसले. आतमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटवून चौकशी करण्याचं काम ते करत होते. प्रवेशद्वाराजवळच चंदीगड पोलिसांकडून चालवलं जाणारं एक मदत केंद्र आम्हाला दिसलं‌.
 
या मदत केंद्रावर महिला पोलीस अधिकारी देखील तैनात होत्या. आत हॉस्पिटल वार्ड मध्ये प्रवेश केल्यानंतर डॉक्टर, रुग्णसेविका आणि खासगी सुरक्षा रक्षक कामात व्यस्त होते. ट्रॉमा सेंटर बाहेरच एक मोठं बॅनर लावलेलं होतं. ‘आम्हाला हवाय न्याय’
 
मूळच्या बंगळुरूच्या असलेल्या डॉक्टर पूजा या संस्थेत कामाला आहेत. इतर शहरांच्या तुलनेत या संस्थेतील सुरक्षा व्यवस्था बरीच चांगली असल्याचं त्या म्हणाल्या.
डॉक्टर पूजा यांचे पालक मात्र चिंतेत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ल्या करण्याचे प्रसंग इथेही घडल्याचं त्यांनी सांगितलं. पण सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.
 
चंदीगड जवळच मोहाली शहरातील‌ सरकारी रुग्णालयात डॉक्टर गगनदीप सिंग नोकरी करतात. इथली सुरक्षा व्यवस्था मात्र बरीच अपुरी असल्याची तक्रार त्यांनी आमच्याजवळ केली.काही दिवसांपूर्वीच म्हणजे 6 ऑगस्ट रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी एका बालरोगतज्ज्ञावर हल्ला केला. यासंबंधी पोलीस तक्रारही दाखल केली गेली.
“पण ही घटना घडली तेव्हा हॉस्पिटलमध्ये कुठलीच सुरक्षा व्यवस्था तैनात नव्हती,” असं डॉक्टर सिंग म्हणाले. ‌
 
प्रशासनाची प्रतिक्रिया : पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे संयुक्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज अरोरा यांनी बीबीसीला सांगितलं की, हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवली गेलेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसवण्यात आलेले आहे. “तरीही डॉक्टरांची कोणतीही तक्रार आली असेल तर तत्काळ त्याची दखल घेऊन कार्यवाही केली जाते,” असं आश्वासन डॉ. अरोरा यांनी दिलं.
 
चेन्नईः ‘विश्रांतीसाठी कुठली खोली अथवा जागाच उपलब्ध नाही’
वालाजहा रोडवर चेन्नई शहराच्या मधोमध वसलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी 9:30 वाजता आम्ही प्रवेश केला असता एका सुरक्षारक्षकाने आम्हाला रोखलं आणि आमची चौकशी केली.
 
रुग्णांचा दाखला केला जातो त्या विभागासमोरील जिन्याच्या पायऱ्यांवरच रुग्णांचे नातेवाईक बसलेले आम्हाला दिसले. लाईट्स कमी असल्यामुळे रात्रीच्या वेळी तिथे पुरेसा प्रकाश नव्हता. आपत्कालीन प्रवेशद्वारा जवळ दोन पोलीस उभे राहिलेले आम्हाला दिसले. एस अबर्ना, या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची रात्रपाळी सुरू होती. कोलकाता दुर्घटनेनंतर आम्हा महिला आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं त्या म्हणाल्या. “या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनानं हॉस्पिटल आवारातील महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक खास बैठकही बोलावली होती,” असं त्यांनी सांगितलं.
 
आतापर्यंत फक्त नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्टाफ रूम वापरायची परवानगी आता प्रशिक्षणार्थींनाही देण्यात आलेली आहे. शिवाय आत बसताना दार व्यवस्थित लावून घ्या, अशी सूचना सुद्धा केली गेलेली आहे. प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये कावलान ॲप वापरण्याचा सल्ला दिला गेलाय. आपत्कालीन स्थितीत धोक्याचा इशारा तात्काळ शहरातील पोलिसांना पोहोचवण्यासाठी हे खास ॲप बनवलं गेलंय. पण तरीही “कधीही काहीही होऊ शकतं, या भीतीने घाबरायला होतं,” एक महिला प्रशिक्षणार्थी आम्हाला सांगत होती.
 
“प्रत्येक वॉर्ड मध्ये संपर्क साधण्यासाठी इंटरकॉम सेवा व आपत्कालीन बटणाची सुविधा पुरवल्यास बरीच मदत होईल,” अशी अपेक्षा डॉक्टर अबर्ना यांनी व्यक्त केली. कोलकत्ता दुर्घटनेनंतर डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी हॉस्पिटलच्या आवारात एक निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर अबर्ना देखील या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
 
ओमंदुरार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे तामिळनाडू राज्यातील प्रतिष्ठित रूग्णालय आहे. इथल्या एका परिचारिकेने रात्रपाळीत विश्रांती घेण्यासाठी कुठलीच खोली नसून फक्त एक खुर्ची आणि समोर टेबल टाकला गेलाय, अशी तक्रार नोंदवली. "बाहेर काही मीटर अंतरावर एक पोलीस आऊट पोस्ट असून तिथल्या लोकांजवळ पोलिसांचे संपर्क क्रमांक आहेत," असं त्या म्हणाल्या.
 
प्रशासनाची प्रतिक्रिया : ओमंदुरार वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर ए अरविंद म्हणाले की,” सभागृहात आत येण्यासाठी किंवा बाहेर जायला दोन द्वार आहे. दोन्ही ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेले आहे. कॅम्पसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. रात्रपाळीत निगराणी ठेवण्यासाठी 20 सुरक्षारक्षक तैनात असतात. हॉस्पिटल आवारावर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक रहिवासी वैद्यकीय अधिकारी नेमलेला आहे. कुठलीही आपत्ती अथवा धोका निर्माण झाल्यास तात्काळ पाऊल उचलण्यास ते प्रतिबद्ध आहेत.
 
अहमदाबादः ‘डॉक्टरांच्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरा गायब’
“रात्रपाळीसाठी वसतिगृहापासून हॉस्पिटलला आम्ही चालतच येतो. रस्त्यावरील दिव्यांची संख्या कमी असल्यामुळे पुरेसा प्रकाश नसतो. शिवाय या रस्त्यावर कुठला सुरक्षा रक्षकही तैनात नसतो,” असं अहमदाबाद मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिमा रामी यांनी सांगितलं.
आमचं काम 24 तास सुरू असतं. त्यामुळे खास करून रात्रपाळीसाठी सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी आम्ही रुग्णालय प्रशासनाकडे केल्याचं महिमा म्हणाल्या.
 
“रात्रपाळीत महिला डॉक्टर रुग्णालय प्रभागातीलच डॉक्टर्स रूममध्ये विश्रांती घेतात. कधीकधी रुग्णांचे नातेवाईकच या खोलीत घुसून हैदोस घालतात. या डॉक्टर्स रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवण्यात आलेला नाही,” अशी तक्रार दुसऱ्या महिला डॉक्टरने केली.
 
हॉस्पिटलमधील ट्रॉमा सेंटर हा इथला सर्वात महत्त्वाचा प्रभाग आहे. या ट्रॉमा सेंटर बाहेर 8 सुरक्षा रक्षक हजर होते. पण कुठलाही सुरक्षा रक्षक रात्री या प्रभागात शिरणाऱ्या लोकांची चौकशी अथवा तपासणी करताना दिसला नाही.
मी ट्रॉमा सेंटर मध्ये शिरलो आणि तिथून हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गेलो. कोणीच माझी अडवणूक केली नाही अथवा मी कोण? याची चौकशी झाली नाही.
 
प्रशासनाची प्रतिक्रिया : रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रजनीश पटेल बीबीसीशी बोलताना म्हणाले की, ’’रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अगदी काटेकोर आहे. प्रकाश व्यवस्था अपुरी असल्याची तक्रार आलेली आहे. या शिवायही इतर काही मुद्दे डॉक्टरांच्या संघटनेकडून उठवण्यात आलेले आहेत. सगळ्यांची नोंद घेऊन त्यावर उचित कार्यवाही सुरू आहे.”
Published By- Priya Dixit