रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (13:33 IST)

संजीव कुमार : कंजूसपणाचा खोटा आरोप झालेला उत्कृष्ट आणि दिलदार कलाकार

संजीव कुमार यांनी 6 नोव्हेंबर 1985 रोजी वयाच्या केवळ ४७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तोवर संजीव कुमार यांनी चित्रपट उद्योगात 25 वर्षं काम केलं होतं. बॉलिवूडमधील त्यांचा हा प्रवास एखाद्या सुपरहिट चित्रपटाच्या कहाणीसारखाच होता.
 
प्रेक्षकांना सतत चकित करणारा बहुढंगी अभिनय, बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणारे चित्रपट, अनेक सुंदर प्रेयसी- असे संजीव कुमार यांच्या आयुष्याचे पैलू सुपरस्टारला साजेसेच होते.
 
स्टारडमसोबतच त्यांना मित्रमंडळींना सोबत घेऊन मद्यपान करण्याचाही शौक होता, त्यामुळे त्यांच्या भोवती सतत लोकांचा गराडा पडलेला असायचा. परंतु, संजीव कुमार यांच्या आयुष्याची अखेर मात्र एकाकीपणात झाली आणि शेवटचं आजारपणही त्यांच्यासाठी त्रासदायक ठरलं.
 
एका अर्थ, जगण्याच्या प्रवासातसुद्धा संजीव कुमार सातत्याने कसोटीच्या क्षणांना सामोरं जात होते. ते अगदीच लहान असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्यानंतर आईने कष्टाने त्यांना वाढवलं, मग संजीव यांना नाटकांमध्ये रुची वाटू लागली, कौटुंबिक जबाबदारीसोबतच चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांना झगडावं लागलं.
 
सी अथवा बी ग्रेडच्या चित्रपटांपासून सुरुवात करत त्यांनी निव्वळ अभियनाच्या जोरावर लोकप्रियता कमावली. त्यामुळे अनेक बडे अभिनेते काम करत असलेल्या चित्रपटातसुद्धा त्यांचं मानधन सर्वाधिक असायचं.
 
संजीव कुमार यांना हे यश एका फटक्यात मिळालं नव्हतं. स्वतःच्या बळावर एक-एक पाऊल टाकत ते यशाच्या शिखरापर्यंत पोचले. लहानपणापासून त्यांनी घेतलेल्या अभिनयाच्या प्रशिक्षणाचा यात मोठा हातभार होता.
 
संजीव कुमार यांच्या नावापासूनच त्यांची ही संघर्षगाथा सुरू झाली. वास्तविक हिंदी चित्रपटांमध्ये काम सुरू करण्याआधी त्यांचं नाव हरिहर जेठालाल असं होतं. याच नावाने ते नाटकं करत होते.
 
संजीव कुमार हे नाव कसं रुळलं?
हरिहर जेठालाल जरीवाला यांना 1960 साली 'हम हिंदुस्तानी' या चित्रपटात पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात संजीव कुमार यांची भूमिका केवळ दोन सेकंदांसाठी एका क्लोज-अप शॉटकरता उभं राहण्यापुरती होती.
त्यानंतर त्यांनी विविध निर्माते, दिग्दर्शक आणि स्टुडिओमालकांच्या कार्यालयांच्या वाऱ्या करायला सुरुवात केली. दरम्यान, नाट्य क्षेत्रातील मित्रांसोबत गप्पा मारताना हरिहर जेठालाल म्हणाले की, त्यांना आधी चित्रपटांसाठी एक वेगळं नाव घ्यावं लागेल. त्यांच्या आईचं नाव शांताबेन जरीवाला होतं.
आपण एस या इंग्रजी अद्याक्षरावरून टोपणनाव घेणार असल्याचं त्यांनी मित्रांना सांगितलं. त्या काळी दिलीप कुमार आणि अशोक कुमार प्रचंड लोकप्रिय होते, त्या प्रभावाखाली हरिहर यांनी स्वतःच्या नावात 'कुमार' हा शब्द घेण्याचं निश्चित केलं. आणि त्या आधी 'संजय' हे नाव स्वीकारलं.
 
संजीव कुमार यांच्या कारकीर्दीमधील दुसरा हिंदी चित्रपट होता 'आओ प्यार करे'. हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झाला आणि त्यातल्या श्रेयनामावलीत त्यांचं नाव 'संजय कुमार' असं लागलं. यानंतर कमाल अमरोही यांनी त्यांना शंकर हुसैन या चित्रपटासाठी करारबद्ध केलं (हा चित्रपट पूर्ण झाला नाही). संजय कुमार हे नाव फारसं आकर्षक नसल्याचं मत अमरोही यांनी दिलं.
 
मग अमरोही यांनी संजीव कुमार यांचं 'स्क्रिन-नेम' गौतम राजवंश असं ठेवलं. त्या वेळी अमरोही पाकिझा या चित्रपटाच्या कामात इतके व्यग्र होते की, संजीव कुमार यांच्या सोबतचा त्यांचा चित्रपट काही मोजक्या दृश्यांच्या चित्रीकरणानंतर बंद पडला. गौतम राजवंश हे नाव काही संजीव कुमार यांना रुचलं नाही.
 
दरम्यान, त्यांचा अभिनय असणारा 'दोस्ती' हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झाला व प्रचंड गाजला. या चित्रपटात अभिनय केलेले संजय खान एकदम प्रस्थापित अभिनेते झाले. या पार्श्वभूमीवर, एक संजय खान असताना आपण पुन्हा संजय कुमार या नावाने चित्रपट करणं काही इष्ट ठरणार नाही, असं वाटून हरिहर जेठालाल यांनी परत त्यांच्या मित्रमंडळींशी चर्चा केली आणि संजीव कुमार हे नाव स्वीकारलं. 1965 साली प्रदर्शित झालेल्या 'निशान' या चित्रपटासोबत पहिल्यांदा त्यांचं 'संजीव कुमार' हे नाव लोकांसमोर आलं.
 
निधनानंतर 36 वर्षांनी पहिलं प्रमाणित चरित्र प्रकाशित
 
संजीव कुमार यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या, हनीफ झवेरी व सुमन्त बत्रा लिखित चरित्रामध्ये नामकरणाचा वरील घटनाक्रम नोंदवला आहे. पेंग्वीन प्रकाशनाने काढलेलं 'अॅन अॅक्टर्स अॅक्टर' हे पुस्तक संजीव कुमार यांचं प्रमाणित चरित्र आहे. संजीव कुमार यांच्या निधनानंतर गेल्या 36 वर्षांच्या काळात त्यांच्या आयुष्यक्रमाची कहाणी सांगणारं एकही पुस्तक प्रकाशित झालेलं नव्हतं. ही उणीव हनीफ झवेरी व सुमन्त बत्रा यांनी बहुतांशाने भरून काढली आहे.

संजीव कुमार यांनी 1968 साली 'संघर्ष' या चित्रपटामध्ये दिलीप कुमार यांच्या समोर उत्तम अभिनय करून चित्रपटसृष्टीत स्वतःचे पाय घट्ट रोवले आणि पुढील 17 वर्षं, म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत त्यांची ही छाप कायम राहिली. या दरम्यान कुमार यांनी केवळ आर्थिक कमाई करणारेच चित्रपट केले असं नाही, तर त्या वेळी काळाच्या पुढे मानल्या गेलेल्या चित्रपटांमध्येसुद्धा त्यांनी काम केलं.
 
'खिलौना' या 1970 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये त्यांनी मानसिक आजाराशी झगडणाऱ्या पात्राची भूमिका केली होती. या भूमिकेने त्यांना लोकप्रियता आणि यशाच्या शिखरावर पोचवलं. दोन वर्षांनी, 1972 साली आलेल्या 'कोशीश' या चित्रपटामध्ये त्यांनी मुक्या माणसाची भूमिका करताना केवळ डोळ्यांनी उत्कट अभिनय करून दाखवला.
 
सर्व तऱ्हांचे चित्रपट आणि भूमिका
संजीव कुमार यांनी कधी स्वतःच्या अभिनयाची पुनरावृत्ती होऊ दिली नाही आणि अभिनेता म्हणून ते एकाच साच्यात बसले नाहीत. त्यांना 'ऑल सीझन अॅक्टर' संबोधलं जात असे. त्यांना स्वतःच्या प्रतिमेची फारशी फिकीर नव्हती. एकाच वेळी ते 'अनामिका' चित्रपटात जया भादुरी यांच्या प्रियकराची भूमिका करत होते, तर त्याच वेळी 'परिचय'मध्ये ते जया यांचे वडील होते, यावरून त्यांचा अभिनयातील धाडसीपणा दिसून येतो. 'शोले'मध्ये ते जया यांचे सासरे होते.

एका बाजूला 'शोले' आणि 'त्रिशूल' यांसारख्या मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये अभिनय करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे संजीव कुमार दुसऱ्या बाजूला प्रायोगिक चित्रपटांमध्ये काम करून लोकांना चकित करत होते. 'नया दिन, नई रात' या 1974 साली आलेल्या चित्रपटात त्यांनी नऊ पात्रांचा अभिनय करून लोकांना तोंडात बोटं घालायला लावलं.
 
त्यांनी 1977 साली अतिशय कमी मानधन घेऊन सत्यजित राय यांच्या 'शतरंज के खिलाडी' या चित्रपटात काम केलं. लगेच पुढच्या वर्षी, म्हणजे 1978 साली, 'पती, पत्नी और वो' हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर 1982 साली त्यांनी 'अंगूर' या उत्तम विनोदी चित्रपटात काम केलं.
 
संजीव कुमार यांनी 1960 ते 1985 या कालावधीमध्ये 153 चित्रपटांमध्ये अभिनय केला. यातील 'दस्तक' व 'कोशीश' या चित्रपटांमधील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करून या स्तरापर्यंत पोचणं सोपं नसतं, पण संजीव कुमार यांनी ते साध्य करून दाखवलं.
 
प्रेमभंगामुळे दारूचं व्यसन
या प्रवासादरम्यान संजीव कुमार यांचं विवाहित नूतनसोबत आणि हेमा मालिनीसोबतही काही नातं निर्माण झालं होतं. हे दोन्ही नातेसंबंध पुढे जाऊ शकले नाहीत. त्यानंतर सुलक्षणा पंडित यांच्यासह इतरही काही अभिनेत्र्यांसोबत त्यांचे संबंध राहिल्याचं बोललं गेलं. परंतु, संजीव कुमार यांनी कधीच लग्न केलं नाही. प्रेमातील या अपयशामुळे आलेलं एकाकीपण दूर सारण्यासाठी संजीव कुमार यांनी स्वतःला दारूच्या व्यसनात बुडवून घेतलं.
संजीव कुमार यांनी लहानपणापासूनच हृदयाशी संबंधित विकारांचा त्रास होत असे आणि दारूच्या व्यसनामुळे हा त्रास वाढत गेला. एकीकडे ते कारकीर्दीत सर्वोच्च शिखर गाठत असताना, वयाच्या 37व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. परंतु, तरीही त्यांनी स्वतःच्या सवयींमध्ये काही बदल केला नाही.
 
याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. लवकरच त्यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर संजीव कुमार यांनी अमेरिकेत जाऊन ओपन हार्ट सर्जरी करवून घेतली.
 
अमेरिकेतून परतल्यावर त्यांची तब्येत पूर्ववत होईल, अशी आशा होती. पण चित्रपटनिर्मात्यांनी त्यांना पुन्हा काम सुरू करण्यासाठी भरीला पाडलं, शिवाय उरलेले चित्रपट पूर्ण करण्याचा त्यांचा स्वतःचाही हट्ट होता, त्यामुळे त्यांना विश्रांतीसाठी काहीच वेळ मिळाला नाही.
 
अखेर 6 नोव्हेंबर 1985 रोजी संजीव कुमार यांचं निधन झालं. त्या वेळी त्यांचे मित्र व सहकलाकार दिनेश हिंगू यांनी हनीफ झवेरी यांना सांगितलं होतं, "त्याने लग्न केलं असतं, तर आणखी काही काळ तो जिवंत राहिला असता. त्याला विश्रांतीची सवयच नव्हती. बायपास सर्जरी झाल्यानंतरसुद्धा त्याने सलग कामं सुरूच ठेवली. त्याच्या मृत्यूला चित्रपटनिर्माते जबाबदार आहेत."
 
आईच्या पुण्यतिथीच्या दिवशीच जगाचा निरोप घेतला
दर वर्षी सहा नोव्हेंबरला संजीव कुमार त्यांच्या आईच्या स्मृती जागवत असत. त्यांच्या आईचं निधन 6 नोव्हेंबर 1980 रोजी झालं. त्यानंतर संजीव केवळ पाच वर्षंच जगले. आजाराशी संघर्ष करत ते सातत्याने चित्रपटांमध्ये काम करत राहिले.
संजीव कुमार यांच्या या काळातील आयुष्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत राहिली. त्यांना दारूचं व्यसन होतंच, शिवाय ते कंजूष आहेत आणि ते मैत्रिणींवर विश्वास ठेवत नाहीत, अशाही कंड्या पिकवण्यात आल्या. संजीव कुमार अतिशय साधे कपडे घालत असत आणि सर्वसाधारणतः चित्रपटसृष्टीतील तारेतारखा स्वतःच्या दिसण्यावर, पोशाखावर जितका खर्च करतात तसा काहीच खर्च ते करत नसतं, त्यामुळे कदाचित त्यांच्या कंजूषपणाच्या प्रतिमेत भर पडली असावी.
 
वास्तविक, आपल्या आसपास घुटमळणारे बहुतांश लोक पैशाच्या लोभानेच जवळ आलेले आहेत, याची जाणीव त्यांच्या काही जवळच्या मित्रांनी त्यांना करून दिलेली होती. यावर संजीव कुमार यांनाही थोडाफार विश्वास वाटू लागला होता. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या काळात ते इतर लोकांमध्ये फारसे मिसळत नसत.
 
परंतु, संजीव कुमार यांच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या या दोन गोष्टींमध्ये काही तथ्य नाही, असं हनीफ झवेरी आणि सुमन्त बत्रा यांनी नमूद केलं आहे. संजीव कुमार आपले घनिष्ठ मित्र होते, असं त्यांच्या सोबत काम केलेल्या अनेक अभिनेत्र्यांनी हनीफ झवेरी यांना सांगितलं.
 
शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांचे संसार सावरले
संजीव कुमार यांना स्वतःला संसार सुरू करता आला नसला, तरी त्यांना कौटुंबिक नातेसंबंधांचं महत्त्व माहीत होतं, त्यामुळे ते केवळ स्वतःच्या कुटुंबियांनाच मदत करायचे असं नव्हे, तर दुसऱ्यांचे अडखळणारे संसार सावरण्याचं कामही त्यांनी केलं. शत्रुघ्न सिन्हा व त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांच्यातील ताण खूप वाढला होता, तेव्हा हा तणाव निवळवण्यात संजीव कुमार यांनी मोलाची भूमिका पार पाडली होती. याचा उल्लेख खुद्द शत्रुघ्न सिन्हासुद्धा करतात. यामुळेच शत्रुघ्न सिन्हा त्यांचे आयुष्यभराचे जिवलग मित्र राहिले. संजीव कुमार यांचं निधन झालं तेव्हा शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या मृतदेहाशेजारी 48 तास बसून होते.
 
संजीव कुमार यांची बहीण अमेरिकेहून आल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरल्यावर दुसऱ्या दिवशी मुंबईतील चित्रपटसृष्टीमध्ये कोणतंही काम झालं नाही. सगळी चित्रीकरणं थांबवण्यात आली.
 
गुलझारसुद्धा त्यांना स्वतःला खास मित्र मानत असत
अलीकडेच पेंग्विन प्रकाशनाने गुलझार यांच्या आठवणींचं 'अॅक्चुअली आय मेट देम- अ मेमॉयर' हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. यातील एक प्रकरण संजीव कुमार यांच्यावर आहे. यात गुलझार यांनी संजीव कुमार यांची स्टार म्हणून नव्हे तर मित्र म्हणून आठवण काढली आहे.

गुलझार आणि संजीव कुमार यांचं एकमेकांशी खूप पटत असे. 'परिचय' या चित्रपटापासून सुरुवात करत या दोघांनी 'मौसम', 'आंधी' आणि 'नमकिन' अशा उत्तमोत्तम चित्रपटांसाठी सोबत काम केलं. संजीव कुमार यांच्या निधनानंतर शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या मृतदेहाशेजारी 48 तास निश्चलपणे बसले होते, असं गुलझार यांनीसुद्धा नमूद केलं आहे.
 
अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झालं, तेव्हा संजीव कुमार यांनी त्यात मध्यस्थी करून त्यांचे संबंध सुरळीत केले, असंही हनीफ झवेरी व सुमन्त बत्रा यांच्या पुस्तकात नोंदवलं आहे. जया बच्चन संजीव यांना भाऊ मानत असत.
 
संजीव कुमार यांच्या कथित कंजूसपणाबाबतही हनीफ झवेरी यांनी विरोधी दाखले नोंदवले आहेत. अनेक विख्यात निर्मात्यांनी व कलाकारांनी कोणत्याही हिशेबाची नोंद न ठेवता संजीव कुमार यांच्याकडून पैसे घेतल्याची कबुली झवेरी यांच्यापाशी दिली. बोनी कपूर यांनी संजीव कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पैसे परत देऊ केले. तेव्हा संजीव कुमार यांच्या कुटुंबियांना संजीव यांनी बोनी यांना पैसे उधार दिल्याचं माहीतही नव्हतं.
 
त्या वेळी संजीव कुमार यांचे सचिव जमनादास यांनी एक डायरी काढून कुटुंबियांना दाखवली. त्या डायरीतील नोंदींनुसार संजीव कुमार यांच्याकडून त्यांच्या मित्रपरिवारातील अभिनेत्यांनी व निर्माता-दिग्दर्शकांनी एकूण 94,36,000 रुपये उधार घेतले होते.
 
संजीव कुमार यांच्या कुटुंबियांनी या लोकांकडून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही पैशांची परतफेड केली नाही. यानंतर पैसे परत मिळवण्यासाठी सुनील दत्त यांची मदत घेण्यासाठी संजीव कुमार यांचे कुटुंबीय त्यांच्याकडे गेले. सुनील दत्त यांचं चित्रपटसृष्टीत बरंच वजन होतं आणि या उद्योगातील कारभाराची पद्धत त्यांना चांगली परिचित होती. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतो, पण पैसे परत मिळण्याची फारशी आशा नाही, असं सुनील दत्त यांनी संजीव यांच्या कुटुंबियांना सांगितलं. आजही संजीव कुमार यांच्या कुटुंबियांकडे ती डायरीतली यादी आहे.
 
संजीव कुमार यांच्या आयुष्यातील अनेक लहान-मोठ्या गोष्टींचा उल्लेख त्या डायरीमध्ये आहे. ते सहज साथा पोशाख का करत असत, आणि मांसाहारी जेवण्यासाठी ते कोणत्याही सह-कलाकाराच्या घरी अचानक कसे येऊन धडकत असत, यांच्याही नोंदी त्यात आहेत.
 
संजीव कुमार यांना मांसाहाराची आवड होती आणि कधीही ते खाण्यासाठी बाहेर जायला तयार असत, असं गुलझार यांनीही त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे.
 
सेटवर उशिरा पोचण्याची सवय
संजीव कुमार स्टार असले, तरी ते असा काही तोरा मिरवत नसत. परंतु, चित्रीकरणासाठी सेटवर मात्र ते कायम उशिरा येत. सकाळपर्यंत मद्यपान सुरू राहिल्यामुळे केवळ त्यांना असा उशीर होत असे.
 
त्यांच्या या 'लेट लतिफी' वृत्तीमुळे दिग्दर्शक व सह-कलाकार मात्र फारसे नाराज होत नसत, कारण संजीव कुमार केवळ एका टेकमध्ये संबंधित दृश्यात अव्वल कामगिरी करून दाखवत, त्यामुळे इतर कोणी कलाकार एखादं काम करण्यासाठी आठ तास घालवणार असेल, तर संजीव कुमार ते काम केवळ चार तासांमध्ये करण्यासाठी ओळखले जात होते. शिवाय, त्यांची मिश्कील विनोदबुद्धी इतकी तल्लख होती की सह-कलाकारांना हसणं आवरत नसे.
हनीफ झवेरी यांनी पत्रकार म्हणून संजीव कुमार यांना जवळून पाहिलं होतं, अनेकदा त्यांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे सम्राट मानले जाणारे दिलीप कुमार यांनी आपल्याला संजीव कुमार यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा सल्ला दिला, असं झवेरी म्हणतात. त्यांनी यासंबंधी साधनसामग्री गोळा करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना संजीव यांचे दुसरे चाहते सुमन्त बत्रा यांच्याबद्दल कळलं. मग दोघांनी एकत्र येऊन हे पुस्तक लिहिलं. त्यात संजीव कुमार यांच्या आयुष्यातील सर्व तपशील नोंदवले आहेत.
 
हनीफ झवेरी सांगतात, "या पुस्तकावर 2009 साली काम सुरू झालं होतं. त्यानंतर पाच वर्षं काही कारणाने काम थांबलं होतं. जरीवाला कुटुंबियांच्या काही अडचणी होत्या. त्यानंतर मी संजीव कुमार यांच्या ओळखीतील जवळपास 150 लोकांच्या मुलाखती घेतल्या. वेळ कितीही लागला असेल, तरी आम्ही संजीव कुमार यांच्या आयुष्यावरचं परिपूर्ण ठरेल असं पुस्तक लिहिलं आहे."