राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीविषयी कुटुंबीयांनी दिली माहिती
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या राजू यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.
"सध्या राजू यांची तब्येत स्थिर आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि आशीर्वादासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. कृपा करून अफवांपासून सावध राहा," असं राजू यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
राजू यांच्यावर बुधवारी (10 ऑगस्ट) अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
राजू श्रीवास्तव यांना बुधवारी सकाळी व्यायाम करत असताना हृदयविकाराचा धक्का बसला. यावेळी ते ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना अचानक छातीत वेदना जाणवल्या. यानंतर राजू यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं दिसून येतं.
राजू श्रीवास्तव यांना कॉमेडियन म्हणून ओळख एका टिव्ही शोमधून प्राप्त झाली आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात त्यांच्या विनोदी टायमिंगचं चांगलंच कौतुक झालं. यानंतर राजू यांनी कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो या कार्यक्रमांमध्येही सहभाग नोंदवला.
राजू श्रीवास्तव हे एक कॉमेडियन आहेतच, पण त्यासोबतच ते आपल्या अभिनयासाठीही ओळखले जात. त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
त्यामध्ये सलमान खानसोबत मैंने प्यार किया, शाहरुख खानसोबत बाजीगर या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय बॉम्बे टू गोवा, आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपय्या यांसारख्या विनोदी चित्रपटांमध्येही राजू श्रीवास्तव यांनी भूमिका केल्या.
बिग बॉस या रिअलिटी शोच्या तिसऱ्या हंगामात राजू सहभागी झाले होते. यासोबतच शक्तिमान या टीव्ही मालिकेतही राजू श्रीवास्तव यांनी भूमिका केलेली आहे.