शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (09:04 IST)

मुलांच्या वाईट सवयी सुधारण्यासाठी...

लहान मुलांमधील काही वाईट सवयी पालकांसाठी काही वेळा डोकेदुखी होतात. त्यात वेळीच सुधारणा न केल्यास भविष्यात मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. मुलांच्या या वाईट सवयी कशा बदलाव्यात आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल कसा घडवावा.
 
मनीषा आणि तिचा मुलगा मंदार दोघे तिच्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. अचानक मंदारने चॉकलेटसाठी हट्ट करायला सुरूवात केली.मनीषा नाही म्हटल्यानंतर जोरजोरात रडायला आणि कांगावा करायला सुरूवात केली. ते पाहून मनीषाने त्याला चॉकलेट दिले आणि मग मंदार शांत झाला. पण या गोष्टीचे मनीषाला वाईट वाटले की मैत्रिणीच्या घरी मंदार असा वागला. मुलांच्या वाईट सवयी आणि वर्तणुकीमुळे अनेकदा पालकांना अशा परिस्थितीला सामारे जावे लागते. मुलांच्या वाईट सवयींना वेळीच आवर घालून सुरूवातीपासून त्या दूर केल्या पाहिजेत.
 
अंगठा चोखणेः कित्येक मुलांना अंगठा चोखायची सवय असते. मुलांना भूक लागली, वेळेवर दूध न मिळाल्यास त्यांना अंगठा किंवा काही वेळा संपूर्ण मूठ चोखायची सवय लागते त्यामुळे मुलांना बरे वाटते. पण सतत अंगठा चोखल्यास ओठ मोठे होतात, दात पुढे येऊ शकतात तसेच बोटाला संसर्ग होऊ शकतो. दीर्घकाळ मुलांना ही सवय असेल तर डॉक्टरी सल्ला घ्यावा. मुलांच्या अंगठ्याला मिरची लावणे, टेप लावणे, पट्टी बांधणे या उपयांनी मुलांना ताण येतो. त्यामुळे असे उपाय करू नयेत. त्यांना प्रेमाने समजावून ही सवय बदलण्यास प्रेरणा घ्यावी नखे खाणेः तणाव किंवा कंटाळा आला की मुले नखे खातात. सतत नखे खात राहणे वाईट तर दिसतेच पण नखांमधील घाण पोटात जाऊनविविध आजार होऊ शकतात. नखे खाल्ल्याने ती कमजोर होतात आणि बेढब दिसतात. ही सवय घालवण्यासाठी मुलांशी बोलावे. त्यांना नखे खाल्ल्याने होणार्‍या नुकसानाबाबत माहिती  द्यावी.  मुले जेव्हा आपल्या सवयीत सुधारणा करतील तेव्हा त्यांचे कौतुक जरूर करावे.
 
सतत हट्टीपणाः मुलांना स्वतःचे म्हणणे खरे करायचे असते किंवा हवी ती वस्तू मिळवण्यासाठी ते कुठेही आणि कोणत्याही वेळी हट्टीपणा करतात. त्यांना कोणत्याही गोष्टीवरून ओरडणे, किंचाळणे याची सवय लागते. त्यांची ही सवय सुधारली नाही तर मोठे झाल्यावरही त्यांना हीच सवय लागते. त्यासाठी मुले जेव्हा हट्टीपणा करतील,
किंचाळतील किंवा आरडाओरड करतील तेव्हा त्यांना प्रथम प्रेमाने समजवावे तरीही नाही ऐकले तर सक्तीने त्यांनी ही गोष्ट समजावून सांगावी.
 
जान्हवी शिरोडकर