रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

लक्ष्मीपूजन (आश्‍विन अमावास्या)

सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे, पण तो सर्व कामांना नाही; म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.

`प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णु इत्यादि देवता व कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधि आहे. या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. त्यांच्याप्रीत्यर्थ प्रत्येकाने आपापल्या घरी सर्व सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करावी व सर्वत्र दिवे लावावे, असे सांगितले आहे.

लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्म्यादि देवतांना लवंग, वेलची व साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवितात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादि पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्‍तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. (हातातील पलिता दक्षिण दिशेकडे दाखवून पितृमार्गदर्शन करतात.) ब्राह्मणांना व अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. पुराणांत असे सांगितले आहे की, आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान्, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्‍त व क्षमाशील पुरुष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.'