शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (17:00 IST)

श्री परशुराम माहत्म्य अध्याय २४

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीविश्‍वामित्र मख रक्षकायते नमः ॥
जय जया चिदानंद एक ईश्‍वरा क्षीराब्धी रमणा निर्विकारा आदि अनादी परंपरा नाम अनामातीत तूं ॥१॥
तूं निर्विकल्प निरंजन भक्तालागीं जांलासी सगुण पाहतां तुझें आगमन ठायीं न पडे ब्रह्मादिकां ॥२॥
पाहोनियां भोळे भक्ता तेथें प्रगटसी जगन्नाथा समूळ निरसोनि भवगाथा आपुले स्वरुपीं ठेविलें ॥३॥
तुझिया भजनीं जे लागले ते जन्म मरणातें सुटले ब्रह्मानंदीं मुरुनि गेले पावले पुनरावृत्ती वर्जित ॥४॥
तुझे अगाध गुण कौतुक पुराणीं गर्जती व्यास वाल्मिक तेथें मी पामर रंक काय महात्म्य वर्णूं शके ॥५॥
परी येतां उदया वासरमणी सरोवरीं विकाशती कमळणी ॥ कीं पौर्णिमेचा इंदू देखोनी आल्हादमनीं चकोरा ॥६॥
तेवीं तव कृपेचा चंडाश उगवतां त्‍हृद्भुवनीं प्रकाश पडिला ह्मणूनि विशेष ज्ञानदृष्टी पसरली ॥७॥
अपूर्व विस्मळ स्नानाचें पर्व नारदातें कथी ब्रह्मदेव यावरी भीष्म कृपार्णव ह्मणे धर्मा परिसीजे ॥८॥
ऐकूनि विमळाची परवणी आश्‍चर्य करी नारदमुनी ह्मणे ऐसें हें क्षेत्र नयनीं पाहवें मनीं मजवाटे ॥९॥
पाहोनि कार्तीक एकादशी नारद वसिष्ठादि सकळ ऋषी इंद्रादिदेव स्वर्गवासी परिवारेंसीं निघाले ॥१०॥
यक्ष गंधर्व किन्नर पाताळीं जे फणिवर वसू दिक्पाळ समग्र विमळ क्षेत्रीं एकवटले ॥११॥
गृहस्थ सन्यासी ब्रह्मचारी तापसी वानप्रस्थ जटाधारी फळजळ विरहीत निराहारी ऊर्ध्व बाहू मौनीजे ॥१२॥
कीं ते सप्त समुद्रींचे लोट धरा मंडळीं एकवट तेवीं समुदायाचा थाट येती अचाट विमळा ॥१३॥
धांवती ऋषींचे भार मृत्युलोकींचे नारीनर पाहोनि विमळ सरोवर जयजयकारें गर्जिन्नले ॥१४॥
एक करिती साष्टांग नमन एक घालिती लोटांगण एक टाळ मृदंग विणा घेऊन सप्रेमें कीर्तन करिताती ॥१५॥
राग उपराग भार्यासहित मूर्छनातान हंपित कंपित देवांगना मिळोनि समस्त आलाप करिती सुस्वरें ॥१६॥
कोणी करिती श्रीहरी पूजन एक सांगती पुराण कथिती कोणी दिव्यज्ञान ठायीं ठायीं बैसोनी ॥१७॥
ऋषी करिती वेदघोष अहोरात्र आसमास स्तोत्रें पठती विशेष रामाचें यश वर्णिती ॥१८॥
वाद्यें असंख्य वाजती दिव्य सुमनांचे परिमळ येती लोकस्नान दानें करिती पातकें जळती भडाभडा ॥१९॥
नारदादि वसिष्टमुनी संतोष पावले अंतःकरणीं वैतरणी तटीं स्नान करोनी लावूनि मुद्रा तिलक जाणा ॥२०॥
क्रियाकर्म अनुष्ठान सारिलें पितृतर्पण विधानोक्त गोदान ब्राह्मणांसी समर्पिलें ॥२१॥
स्वेतवर्णी रक्तवर्णी कपिला धेनू श्रृंगारुनी नीलवर्णी कृष्णवर्णी सालंकृत दीधल्या ॥२२॥
भोळ्या ठेंगण्या दुधाळ स्वल्प आहारी परी जंघाळ इच्छिले समयीं तात्काळ दुग्ध देती बाळकातें ॥२३॥
ऐसीं गोदानें घेऊनी पूजिली एकवीरा भवानी भोंवती देवीच्या आवरणी अनुक्रमें पूजिल्या ॥२४॥
ऐसा विधी सारोन आले विमळासी परतोन ॥ विमळोदकी स्नान करोन घेतलें दर्शन शिवाचें ॥२५॥
प्रार्थोनि गिरिपती उमावर ह्मणोनि पुरुष सूक्त भक्तिपुरःसर विमळी नारायण चक्रधर षोडशोपचारें पूजिला ॥२६॥
चतुष्कोनीं अकरारुद्र तेही पूजिले समग्र ठायीं ठायीं देवता चक्र यथासांग पूजिले ॥२७॥
जेथें जेथें केलें पूजन तेथें करुनि विष्णु स्मरण महापुण्य संपादून कृतकृत्य जाहले ॥२८॥
करुनि तीर्थ प्रदक्षिणा दानें दीधलीं ब्राह्मणा नारद ह्मणे मुनिजना गमन माझें तिहीं लोकीं ॥२९॥
तीर्थें पाहिलीं सकळ परी विमळा सारिखें नसे स्थळ बाणें भेदूनि पाताळ वोघ आणिले तीर्थाचे ॥३०॥
ऐसे वोघ आणिके स्थळीं न देखों या भूमंडळीं काशी प्रयागादि सकळी एकेक तीर्थ असे ॥३१॥
धन्यधन्य भार्गववीर या भक्ताचा उत्धार त्रिलोकींचीं तीर्थेंसमग्र एकेच ठायीं मिळविलीं ॥३२॥
तरी येथीचिया पुण्यातें गणती न करवे शेषातें जो वंदीया तीर्थांतें तोचि धन्य संसारीं ॥३३॥
विमळतीर्थाचें जीवन कमंडलीं ठेविजे भरोन आपुले ग्रहीं पूजा करोन नित्यमेव प्रासिजे ॥३४॥
पुरुष सूक्तें शालिग्राम ॥ षोडश किंवा चतुर्विंशती वार जाण जो अभिषिक्त करी शंख भरुन तयाचें पुण्य न वर्णवे ॥३५॥
तो प्राणी निरंतर शुची सबात्द्य अभ्यंतर सफळ तयाचा संसार मोक्षपद शेवटीं ॥३६॥
उत्तम नरदेहा येऊन जो न पाहे विमळस्थान तो पापी अधोरकृतघ्न नरक दारुण न सुटे तया ॥३७॥
ऐकोनि नारादाचिया वचना ॥ समस्त ऋषी डोलविती माना असो ब्राह्मण संतर्पणा करुनि द्वादशी साधिली ॥३८॥
अमावास्या सोमपर्वणी स्नानें केलीं विमळा वैतरणी विधानोक्त सत्कर्मा चरणीं विमळस्थानीं बैसले ॥३९॥
त्रिपदा गायत्री आवाहन करितां अष्टौ महामंत्र जप नते साक्षांत सूर्यनारायण समान ऋषी शोभले ॥४०॥
तया विमळ वरुण स्थानीं पादकुंड नैऋत्य कोनीं भागीरथी काशीहूनी वोघ वाहे निरंतर ॥४१॥
तेथें करितां स्नानदान काशीप्रयागाहूनि घडे पुण्य ह्मणोनि वसिष्ठादि मुनिजन तेथें स्नानें करिताती ॥४२॥
पाणी पात्र करीं घेऊनी उदक भरितां वसिष्ठमुनी हातींचे सरतां तत्क्षणीं अगाध जीवन बुडालें ॥४३॥
ऋषीं ते जाहली परमचिंता धुंडितां पात्र लागे हाता नारदातें कथिति वार्ता पात्र गेलें हातींचें ॥४४॥
पाणिमात्र मोलागळें विश्‍वकर्म्यानें असें निर्मिलें शोधितां त्रिभुवन सगळें ऐसें न मिळे मागुतीं ॥४५॥
वैवस्वत मनूचे वेळीं कपिला षष्टीचे पर्वकाळीं कुबेर करितो दानावळी पाणी पात्र मज दिधलें ॥४६॥
नारद ह्मणे वसिष्ठासी भागीरथी आणिली विमळासी तेणे प्रवाहें वाराणसीसी गेले असे वाटते ॥४७॥
तरीं आपण येच क्षणीं वेगीं निघावें सिद्धगमनी ऐसें बोलतां नारदमुनी वसिष्ठ मुनी संतोषला ॥४८॥
प्रातः स्नान करुनि विमळीं माध्यान्हीं पातले काशिस्थळीं मन कर्णिकेचे जळीं स्नानें करिती दोघेजण ॥४९॥
माध्यान्हीं सूर्यास अर्घ्य देतां पाणिपात्र लागलें हाता परम आनंदोनियां चित्ता नारदातें दाखवी ॥५०॥
ह्मणे नवल वाटे मनीं विमळकुंडीं भरितां पाणी हातींचें गेलें निस्टोनी आगाध जीवनीं बुडालें ॥५१॥
ते पाताळ प्रवाह उदकी येथें आले मन कर्णिकीं ऐसें कौतुक तीहीं लोकीं वर्तलें नाहीं अद्यापी ॥५२॥
ऐकोनि नारदमुनी परशुरामाची विचित्र करणी सर्वतीर्थें भेदूनि पाणी विमळस्थानीं आलीं हो ॥५३॥
विमळाचें जळ बिंदुमात्र स्पर्शतां प्राणी होती पवित्र पातकें जळती समस्त ऐका दृष्टांत ये विषयीं ॥५४॥
शुष्क तृणाचे पर्वत कंटकें सराटे भरले भारित तेथें अग्नी यत्किंचित् पडतां धडके ज्या रिती ॥५५॥
तैसें विमळाचें बिंदू जळ स्पर्शतां पापें जळती समूळ जेथें प्रवाह निर्मळ भागीरथी वाहतसे ॥५६॥
त्रिशक्ती रुपें वैतरणी भोगावती आणि मंदाकिनी दोन्हीं तुळितांचि तूळणीं नयेती कदां जाणिजे ॥५७॥
आणिका तीर्थीं गोदान गजवाजी रथ रत्‍नदान हिरे माणिक्य तुळदान शालिग्राम दान करितीजे ॥५८॥
इतुक्या पुण्याचे परिपाडें जरी वैतरणी स्नान घडे तात्काळीं पाविजे रोकडें नलगे कांहीं सायास ॥५९॥
द्वादशी अमा सोम परवणी स्नान करितां विमळ वैतरणीं तरी सहस्त्रलक्ष वर्षांनीं इंद्रलोकीं वस्ती घडे ॥६०॥
विमळ क्षेत्रींचे जन ते केवळ पुण्य परायण त्यांचें होतांचि दर्शन पातकें दहन पैं होती ॥६१॥
ऐसी हे नारदाची वाणी ऐकतां संतोषे वशिष्ठ मुनी विमळाचा महिमा महापुराणीं वेदव्यासादिकीं वर्णिला ॥६२॥
तेथेंचि पाहोनि समस्त महाराष्ट्र भाषेनें यथार्थ वर्णिलें म्या ईश प्रीत्यर्थ स्वानंद भरें भरोनियां ॥६३॥
स्वस्ति श्रीपरशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्या अपारु ऐकतां निःपाप होती नरु चतुर्विशतीध्याय गोड हा ॥२४॥