रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: दुबई , मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (09:14 IST)

हेलिकॉप्टर अपघातात सौदीच्या राजपुत्राचा मृत्यू

सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील वरिष्ठ राजपुत्र आणि अन्य काही सरकारी अधिकारी काल झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले. सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील असिर प्रांतात झालेल्या या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरमधील सर्व 8 जण मृत्यूमुखी पडले. राजपुत्र मन्सूर बिन मक्रीन आणि 7 सरकारी अधिकारी येमेनच्या सीमेपासून 160 किलोमीटर अंतरावरील अभा येथील एका स्थानिक प्रकल्पाला भेट देण्यासाठी जात होते. राजपुत्र मन्सूर हे आसिर प्रांताचे उपराज्यपाल होते.
 
येमेनमधील हुती बंडखोरांविरोधात मार्च 2015 पासून सौदीचा लष्करी संघर्ष सुरु आहे. येमेनमधील हुती अधिकाऱ्यांकडून या हेलिकॉप्टर अपघाताबाबत त्वरित कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र हुतीच्या अल मसिराह या उपग्रह वृत्तवाहिनीने केवळ हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे वृत्त प्रसारित केले.
 
राजपुत्र मन्सूर बिन मक्रीन हे राजपुत्र मक्रीन बिन अब्दुलाझिझ यांचे पुत्र आणि गुप्तचर विभागाचे माजी संचालकही होते. याशिवाय त्यांचे नाव एकेकाळी युवराज म्हणूनही निश्‍चित झाले होते. मात्र एप्रिल 2015 मध्ये त्यांना त्यांचे सावत्र बंधू राजे सलमान यांनी युवराजपदावरून हटवले होते आणि राजपुत्र मोहम्मद बिन नायेफ यांना युवराज केले गेले होते. मात्र जून महिन्यात राजे सलमान यांनी युवराज मोहम्मद यांनाही हटवले आणि 32 वर्षीय राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांना युवराज म्हणून निश्‍चित केले होते.
 
गेल्या आठवड्यात राजघराण्यतील डझनवारी राजपुत्र, सरकारी अधिकारी, मंत्री, लष्करी अधिकारी आणि उद्योजकांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी अटक केली. राजसत्तेवरील आपली पकड अधिक घट्ट करण्याच्या हेतूने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.