शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (16:33 IST)

इराण इस्रायलवर हल्ला करेल का? संपूर्ण आखातावर भीती आणि चिंतेचं ढग

Iran Israel War
सौदी अरेबियातील जेद्दा या शहरात ओआयसी (OIC) या इस्लामिक सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांची बुधवारी (7 जुलै) आपत्कालीन बैठक झाली. या बैठकीला हमासचे प्रमुख नेते इस्माईल हानिये यांच्या हत्येची पार्श्वभूमी होती.
 
इराणने या बैठकीची मागणी केली होती. या बैठकीत इतर अनेक मुद्द्यांबरोबरच हमासचे प्रमुख नेते इस्माईल हानिये यांची तेहरानमध्ये (इराणची राजधानी) हत्या झाली. या हत्येवर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीच्या निमित्ताने ओआयसीच्या (OIC) सदस्य देशांना आपल्या 'बदला घेण्याच्या' हेतूचं कारण समजवण्याची संधी देखील इराणकडे होती.
 
(इथे ही बाब लक्षात घेतली पाहिजे की 57 देश ओआयसी (OIC) या संघटनेचे सदस्य आहेत. त्यातील 48 देश मुस्लिमबहुल आहेत. जगातील मुस्लिम समुदायाचा एकत्रित आवाज असल्याचा दावा ही संघटना करते.)
31 जुलैला इराणच्या तेहरानमध्ये इस्माईल हानिये यांची हत्या झाली होती. इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूह पेजेश्कियान यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी हानिये तिथे गेले असताना ही हत्या झाली.
 
यानंतर इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्लाह अली खामेनी यांनी हानिये यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची घोषणा केली होती.
 
हमास आणि इराण या दोघांचं म्हणणं आहे की, 31 जुलैला झालेल्या इस्माईल हानिये यांच्या हत्येत इस्रायलचा हात आहे. अर्थात, इस्रायलनं मात्र अद्याप यावर अधिकृत वक्तव्यं दिलेलं नाही.मात्र, असं मानलं जातं आहे की, या हत्येमागे इस्रायलचाच हात आहे.
 
इराणच्या प्रत्युत्तराची चिंता का आहे?
इराणचे परराष्ट्रमंत्री बाकेरी अली बागेरी कानी म्हणाले की, त्यांच्या देशासमोर प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.ते म्हणाले की, इराण 'योग्य वेळी' आणि 'योग्य पद्धती'ने प्रत्युत्तर देईल.
 
कानी पुढे म्हणाले की, इराणची संभाव्य प्रतिक्रिया फक्त इराणचं सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी नसेल तर ती 'संपूर्ण प्रदेशाचं स्थैर्य आणि सुरक्षे'साठी असेल.इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या इस्माईल हानिये यांचा मुक्काम इराणच्या प्रसिद्ध इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प (IRGC)च्या एका अती सुरक्षित गेस्टहाऊसमध्ये होता.
 
मात्र, आता इराणमधील या अती सुरक्षित ठिकाणावरच हल्ला करून इस्माईल हानिये यांची हत्या करण्यात आल्यानं इराणवर देखील नामुष्कीची वेळ आली आहे.या घटनेनंतर आखातात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. इराण याला कसं उत्तर देणार याचेच अंदाज बांधले जात आहेत. म्हणून इराण संबंधित प्रत्येक संकेत, इराणकडून येणारं प्रत्येक वक्तव्यं, प्रत्येक भाषण यावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.
 
इराण नेमका कधी आणि कशाप्रकारे या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे कळावं यासाठी हे लक्ष ठेवलं जातं आहे. त्याचबरोबर इराणच्या प्रत्युत्तरामुळे संपूर्ण आखातात मोठ्या संघर्षाचा वणवा पेटू शकतो ही चिंता देखील व्यक्त केली जाते आहे.
 
अर्थात, अद्याप इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणकडून हल्ला केला जाण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत, तर पाश्चात्य देशांचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे इराणची मर्यादित गुप्त माहिती आहे.
 
त्यामुळे अशा परिस्थितीत इराण नेमकं काय करणार आहे, त्यांची योजना काय आहे याबद्दल काहीच स्पष्ट नाही.
 
याच वर्षी एप्रिलमध्ये सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कसमध्ये एका अती महत्त्वाच्या परिसरात (डिप्लोमॅटिक कॉम्प्लेक्स) हवाई हल्ला झाला होता. या हल्ल्यात आयआरजीसीचे आठ अधिकारी मारले गेले होते. हा हल्ला इस्रायलनच केल्याचं मानलं गेलं.
 
आयआरजीसीचे अधिकारी मारले जाणं ही इराणसाठी अत्यंत नामुष्कीची बाब होती.
दमास्कसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर इराणनं सूड घेण्याचा आपला निश्चय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी इस्रायलवर 300 अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा हल्ला केला होता.
अर्थात, या हल्ल्यात इस्रायलचं खूप नुकसान झालं नाही. कारण इस्रायल आणि अमेरिकेच्या संरक्षण प्रणालीनं ही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच हाणून पाडली होती.
बदला घेण्यासाठी इराणनं केलेल्या या हल्ल्याचा इस्रायलवर फारसा परिणाम झाला नव्हता.
इराण नेमकं काय प्रत्युत्तर देणार याबद्दल अस्पष्टता
मागील आठवड्यात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, कदाचित यावेळेस इराण आणखी मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याची शक्यता आहे. मागील वेळच्या अपयशाची पुनरावृत्ती न येता इस्रायलचं मोठं नुकसान करण्याचा प्रयत्न यावेळी होऊ शकतो.
 
अलीकडेच प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये इस्माईल हानिये यांच्या हत्येसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
 
त्यात म्हटलं आहे की, हानिये यांची हत्या क्षेपणास्त्राच्या अचूक हल्ल्याद्वारे झालेली नाही तर या हल्ल्याला इराणमधूनच मदत मिळाली आहे. हानिये यांच्यावर झालेल्या हल्ल्यात कोणत्याही इराणी नागरिकाचा मृत्यू झालेला नाही.
 
इराणसंदर्भात तणावाची परिस्थिती असतानाच अरब देश आणि पाश्चात्य देशांकडून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमुळे कदाचित या सर्व प्रकरणात पुनर्विचार करण्याचा दबाव इराणवर येऊ शकतो.
मागील आठवड्यात जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणचा दौरा केला होता. तर बुधवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलले होते.
 
फ्रान्सच्या दूतावासानुसार, मॅक्रॉन यांनी इराणला सांगितलं की "नव्यानं उद्भवलेला सामरिक तणाव कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत."
 
याच दरम्यान इस्रायलवर लेबनॉनमधून सातत्यानं हल्ले होत आहेत. हिजबुल्लाह ही संघटना लेबनॉनमधून हल्ले चढवते आहे.
 
हिजबुल्लाह ही एक सशस्त्र संघटना असून त्यांना इराणचा पाठिंबा आहे.
 
इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर फवाद शुक्र यांचा मृत्यू झाला होता. हिजबुल्लाह या घटनेचा सूड घेण्याची घोषणा केली आहे.
 
हानिये यांच्या हत्येच्या काही तास आधीच बेरूतमध्ये एका हवाई हल्ल्यात फवाद शुक्र यांचा मृत्यू झाला होता.
 
हा हल्ला बेरूतमधील दाहिया परिसरात झाला होता. या परिसराला हिजबुल्लाह चा बालेकिल्ला मानला जातो.
 
हिजबुल्लाह मोठी कारवाई करू शकते का?
मागील वर्षी 7 ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहनं लेबनॉनच्या सीमेला लागून असलेल्या इस्रायलच्या उत्तरेकडच्या भागात हल्ले सुरू केले होते.
 
तेव्हापासून इस्रायल-लेबनॉन सीमेवर तणाव आहे. सद्यपरिस्थितीत लेबनॉन पर्यंत युद्धाची व्यापी वाढवण्याचा सर्वाधिक धोका आहे.
 
आतापर्यंत हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फक्त लेबनॉन आणि इस्रायलच्या उत्तर भागातील सीमेपर्यंतच मर्यादित राहिला आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाह या दोघांकडूनही असेच संकेत मिळत आले आहेत की ते मोठ्या स्वरुपात युद्ध करू इच्छित नाही.
 
हिजबुल्लाहकडून आतापर्यंत फक्त इस्रायलच्या सैनिकी तळांवरच हल्ला करण्यात आला आहे. मात्र, आता हिजबुल्लाहचे हल्ले आणखी तीव्र झाले आहेत. ते आता इस्रायलच्या आतील भागातील ठिकाणांवर देखील हल्ले करत आहेत.
फवाद शुक्र यांच्या हत्येनंतर हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांनी सूड घेण्यासाठी 'कठोर आणि प्रभावी' कारवाई करण्याचा वचन दिलं होतं. ते म्हणाले होते की फवाद शुक्र हिजबुल्लाहच्या व्यूहरचनेचे मुख्य सूत्रधार होते.
 
शुक्र यांची हत्या होण्याच्या काही तास आधीच आपण त्यांच्याशी बोलल्याचं नसरल्लाह यांनी सांगितलं होतं.
 
याआधी वरिष्ठ कमांडर किंवा नेत्यांच्या मृत्यूनंतर प्रत्युत्तर देताना हिजबुल्लाह इस्रायलवर रॉकेट हल्ले करत आला आहे. मात्र, आता बेरूतमधील आपल्या बालेकिल्ल्यातच सर्वोच्च कमांडरची हत्या झाल्यानंतर हिजबुल्लाहकडून आणखी व्यापक स्वरुपाच्या प्रत्युत्तराची शक्यता आहे.
 
या पार्श्वभूमीवर हिजबुल्लाहचं म्हणणं आहे की त्यांचं प्रत्युत्तर लढाईच्या नियमांतर्गंतच असेल.
 
तर तिकडे लेबनॉनमध्ये अनेकांना या गोष्टीची भीती वाटते आहे की त्यांना अशा युद्धात ओढलं जातं आहे, जे लेबनॉनच्या राष्ट्रीय हिताचं नाही.
 
2005 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्षामुळे झालेल्या विध्वंसाची आठवण लेबनॉनच्या नागरिकांना अजूनही आहे.
 
आखातातील हिजबुल्लाहचं महत्त्वं?
मात्र, हिजबुल्लाहसारखी संघटना कमजोर असणं हे इराणच्या फायद्याचं नाही. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी किंवा इस्रायलबरोबरच्या संघर्षात इराणच्या दृष्टीनं हिजबुल्लाह महत्त्वाची आहे.
 
हिजबुल्लाहच्या माध्यमातून इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करणं हा इराणच्या युद्धनीतीचा भाग आहे. कारण हिजबुल्लाह चे तळ इस्रायलच्या सीमेला लागूनच आहेत. त्यामुळे तिथून इस्रायलवर हल्ला चढवणं इराणसाठी तुलनेनं सोपं आहे.
 
इराणचा आण्विक कार्यक्रम हा आपल्या अस्तित्वासाठी मोठा धोका असल्याचं इस्रायल मानतं.
 
त्यामुळे इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलकडून हल्ला केला जाण्याची शक्यता नेहमीच असते.
 
अशा परिस्थितीत जर इस्रायलकडून या प्रकारचा हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देताना हिजबुल्लाहची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
 
इराणचा पाठिंबा असलेल्या संघटनांचा आखातात एक समूह आहे. याला तथाकथित अॅक्सिस ऑफ रेझिस्टंस म्हटलं जातं. आखातात या संघटना इराणच्या बाजूने कार्यरत असतात. यामध्ये येमेनमधील हूती बंडखोर आणि इराकमधील संघटनेचा समावेश आहे.
 
या अॅक्सिस ऑफ रेजिस्टंस मध्ये हिजबुल्लाह ही संघटना सर्वात महत्त्वाची आहे. सात ऑक्टोबरनंतर येमेनमधील हूती बंडखोर आणि इराकमधील लढवय्यांनी देखील इस्रायलवर हल्ले केले आहेत.
 
अमेरिका-इस्रायलची सज्जता
अर्थात, इराण आणि त्याच्या समर्थक संघटना एकत्रितपणे प्रत्युत्तर देणार की नाही ही बाब अद्याप स्पष्ट नाही. मात्र, अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमधून असे संकेत मिळाले आहेत की हिजबुल्लाह एकट्यानंच हल्ला करू शकते आणि सर्वात आधी हल्ला करू शकते.
 
याच आठवड्यात अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकल कूरिल्ला यांनी इस्रायलचा दौरा केला आहे. त्यावेळेस त्यांनी सुरक्षा सज्जतेचा आढावा घेतला होता. त्यामुळे यावेळेस देखील इस्रायलचा बचाव करण्याच्या प्रयत्नांचं नेतृत्व अमेरिकाच करेल असं मानलं जातं आहे.
 
त्याचबरोबर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं आहे की, इस्रायलवर कुठूनही हल्ला झाला तरी त्याची प्रचंड किंमत मोजावी लागेल.
 
संघर्ष वाढण्याची शक्यता आणि अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये जाणारी-येणारी विमान उड्डाणं रद्द होत आहेत. विमानसेवा कंपन्या या दोन्ही देशांच्या हवाई क्षेत्राला टाळत आहेत.
 
जगातील अनेक देश आपल्या नागरिकांना इस्रायल आणि लेबनॉन सोडण्याच्या सूचना देत आहेत.
 
काही लोक युद्धाची तयारीसुद्धा करत आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात हा प्रदेश अपघातानं किंवा मुद्दामहून युद्धात ओढला जाऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)
Published By- Priya Dixit