शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (16:30 IST)

प्रेमाच्या महिन्यात 'लोच्या झाला रे' ४ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे नवीन वर्षात लोच्या करायला पूर्णपणे सज्ज झाले आहेत. कारणच तसे आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट लवकरच म्हणजेच ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून हा धमाकेदार कौटुंबिक चित्रपट तुफान विनोदी असेल असे दिसतेय. मुळात हे चारही कलाकार पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असून कोणामुळे कोणाच्या आयुष्यात लोच्या होणार आहे, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
 
पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी 'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी 'लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी  ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे. या चित्रपटात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत .
 
     या चित्रपटाबाबत निर्माते नवीन चंद्रा म्हणतात, ‘’आम्हाला हा चित्रपट प्रदर्शित करताना खूप आनंद होत आहे. सध्याची स्थिती पाहता, आताही मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहात आहेत, मराठी चित्रपटांना सहकार्य करत आहेत, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे आणि त्यामुळेच चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचे प्रोत्साहन आम्हाला मिळत आहे. प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. आम्हाला खात्री आहे. ‘लोच्या झाला रे’ चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होईल.’’