रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (11:36 IST)

दुसऱ्या सामन्यासाठी वेगळे डावपेच

कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चाहल या फिरकी गोलंदाजांच्या जोडीने गेल्या अनेक सामन्यांमध्ये भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली असून एखाद्या सामन्यातील अपयशामुळे त्यांच्याबाबत वेगळा विचार करण्याची गज नसल्याचे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी सांगितले. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वन सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
पहिल्या सामन्यात कुलदीप व चाहल यांच्यावर वर्चस्व गाजविताना रॉस टेलर आणि टॉम लेथॅम या न्यूझीलंडच्या जोडीने द्विशतकी भागीदारी करून भारतावरील विजयात मोलाचा वाटा उचलला होता. परंतु उद्या (बुधवार) होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ वेगळे डावपेच वापरेल, असे सांगून भारत अरुण म्हणाले की, आम्ही सध्या 2019 विश्‍वचषकासाठी संघबांधणी करण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्या दृष्टीने या जोडीने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली हे.
 
भारताने गेल्या नऊ सामन्यांमध्ये नऊ विजय मिळविले आहेत व कुलदीप व चाहल यांनी त्यात मोलाचा वाटा उचलला आहे, असे सांगून अरुण म्हणाले की, एखाद्या सामन्यातील अपयशामुळे फारसा फरक पडत नाही. टेलर व लेथॅम यांनी फिरकी जोडीविरुद्ध स्वीप व रिव्हर्स स्वीपचा वापर करून त्यांची लय बिघडविली. मात्र त्यांच्या फलंदाजीचा अभ्यास आम्ही केला असून उद्याच्या सामन्यात त्यांच्याविरुद्ध वेगळ्या डावपेचांचा वापर केला जाईल.
 
न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली असल्याचे सांगून अरुण म्हणाले की, पहिला सामना जिंकून आमच्यासमोर त्यांनी खरोखरीच अवघड आव्हान उभे केले आहे. परंतु पुण्याचे मैदान आमच्यासाठी योग्य असून दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आम्ही मालिका बरोबरीत आणू असा मला विश्‍वास वाटतो. भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांवर त्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे, यात शंका नाही.