शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (18:13 IST)

स्त्रीच्या भावना कवितेत मांडल्या

शनिवार दि. २९ जानेवारी २०२२ रोजी मराठी साहित्य व संस्कृतीस समर्पित ‘साहित्य संस्कृती मंच’ या व्हाट्सअप समूहातर्फे साहित्यिक उपक्रमांत अंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन कविसंमेलन आयोजित केले होते.
 
या कविसंमेलनांत संपूर्ण भारतातून तसेच भारताबाहेरील कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रुप ऍडमिन सौ पौर्णिमा हुंडीवाले यांनी पाहुण्यांचे व उपस्थित कवींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजक मदन बोबडे आणि अनिता देशमुख यांनी सांगितले की सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, मराठी चित्रपट गीतकार श्री प्रवीण दवणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री भारत सासणे हे विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित होते. 
 
कार्यक्रमात सुमारे चाळीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कवयित्रींकडून स्त्रियांच्या व्यथा आणि स्वाभिमान मुख्यत्वे त्यांच्या रचनांतून मांडण्यात आल्या. गोव्यातील सौ.शांता लागू यांनी ‘मोकळं ढाकळं आभाळ तिला गावलं का?’ या अतिशय सुंदर ओळी सादर केल्या, तसेच उज्जैनच्या डॉ. अपर्णा जोशी यांनी रूपकुंवर यांच्या सती जाण्यावर चपखल भाष्य करून, जी सती गेली नाही तिला समाज कसा छळत आहे यावर आपली रचना सादर केली. पुण्याच्या निशिकांत देशपांडे यांनी शेतकर्यांयच्या व्यथा अतिशय समर्थपणे मांडल्या तसेच नंदुरबारहून हेमलता पाटील यांनी प्रेम आणि विरह या भावनांच्या पल्याड जाऊन मानवी समस्यांकडे लक्ष वेधून घेणारी गझल मांडली.  
 
अमेरिकेतील डलास शहरातून सत्यजित मावडे यांनी ‘अथांग डोळे हसरे तरीही सांगुन जातात काही, शब्दावाचुन लिहीते गाथा डोळया मधली शाई’ अश्या भावूक शब्दांत स्त्रीच्या भावनांना शब्दबद्ध केले. अमेरिकेतूनच कवयित्री तनुजा प्रधान यांनी ‘सर्व काही ईश्वरमय आहे’ अश्या आशयाची भक्तिपूर्ण रचना सादर केली. प्रवीण दवणे यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. दवणे त्यांच्या कवितांतून कायमच एक सखोल विचार मांडताना दिसतात. ‘अस्तित्वाला आलेला एक आकाशीय हलकेपणा, आभासापरी जड अशी तरल चाहुल’ ही त्यांची रचना श्रोत्यांना अंतर्मुख करून गेली. कार्यक्रमाचे संचालन, सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अंतरा करवडे यांनी केले व आभार प्रदर्शन समुहाचे नियंत्रक डॉ श्रीकांत तारे यांनी केले.