शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

`माहिती देणे म्हणजे शिक्षण नव्हे`

NDND
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची शिकवण्याची पद्धत अतिशय प्रभावी होती. आपल्या बुद्धिमत्तापूर्ण व्याख्यानांनी, त्याच्या अतिशय उत्साही व आनंदी अशा प्रकटीकरणाने आणि नर्मविनोदाने ते विद्यार्थ्यांना भारून टाकत असत. विद्यार्थ्यांनी उच्च नैतिक मुल्यांचे आचरण करावे अशी त्यांची अपेक्षा होती. ते स्वतः जो विषय शिकवत त्याचा सखोल अभ्यास आधी करत. दर्शनशास्त्रासारख्या गंभीर विषयावर बोलतानाही ते त्याची मांडणी साधी, सोपी आणि सरळ करत. त्यामुळे विषय़ समजायला सोपा जाई.

राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाचे अवमुल्यन होत असताना आणि गुरू-शिष्य संबंधांचे पावित्र्य संपत चाललेले असताना त्यांच्या स्मृती नक्कीच चांगली प्रेरणा देऊ शकतात. 1962 मध्ये ते राष्ट्रपती झाले, तेव्हा काही विद्यार्थी व चाहत्यांनी त्यांचा जन्मदिवस हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी भारावलेल्या राधाकृष्णन यांनी हा आपला गौरव असल्याचे सांगितले. त्यानंतर पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

शिक्षणाच्या क्षेत्रात डॉ. राधाकृष्णन यांनी दिलेले योगदान अमुल्य आहे. बहुमुखी प्रतिभा हे त्यांचे वैशिष्ट्य. प्रख्यात विद्वान, शिक्षक, चांगले वक्ता, प्रशासक, राजनेता, देशभक्त आणि शिक्षणतज्ज्ञ ही त्यांची रूपे होती. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक उच्च पदांवर काम केले. पण तरीही त्यांच्यातील शिक्षक मात्र जागा होता. त्यांच्या मते शिक्षण चांगले मिळाले तर समाजातील अनेक अनिष्ट बाबी निर्माण होणारच नाहीत.

ते नेहमी म्हणत, केवळ माहिती देणे म्हणजे शिक्षण नाही. माहितीचे स्वतःचे एक महत्त्व आहे. आधुनिक जगात तर तांत्रिक ज्ञानाची माहिती नसेल तर पुढे काही करता येणार नाही. पण तरीही व्यक्तीच्या बुद्धिमतेचा स्वभाविक कल व त्याच्यातील लोकशाहीची भावना यांनाही महत्त्व आहे. जबाबदार नागरिक बनविण्यासाठी हेच उपयोगी पडते. शिक्षणाचे उद्दिष्ट्य ज्ञानाप्रती समर्पणाची भावना आणि निरंतर शिकत रहाण्याची प्रवृत्ती निर्माण करणे हे आहे. शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे ज्ञान आणि कौशल्य दोन्ही निर्माण होतात. शिवाय जीवनात त्याचा उपयोग कसा करायचा याचे भानही शिक्षणामुळेच मिळते. करूणा, प्रेम आणि समृद्ध परंपरांचा विकास हाही शिक्षणाचा उद्देश आहे.

ते म्हणत, शिक्षकाकडेच शिकविण्याविषयीची समर्पण भावना नसेल आणि शिक्षणाकडे तो एक मिशन या दृष्टीने पहात नसेल तर चांगल्या शिक्षणाची कल्पनाच करता येत नाही. त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. आदर्श शिक्षकाचे सर्व गुण त्यांच्यात होते. त्यांच्या मते शिक्षक तोच व्हायला हवा जो सर्वांत बुद्धिमान आहे. त्याचप्रमाणे केवळ चांगले शिकवले म्हणजे संपले असे मानता कामा नये. त्याने विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदर कसा निर्माण करायचा हेही शिकवायला पाहिजे. केवळ शिक्षक झाल्याने आदर मिळत नाही, तो मिळवावा लागतो.