शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (08:10 IST)

मुंबईतील सर्वात जुन्या खादी विक्री केंद्रावर कारवाई, खादी एम्पोरियमवर बंदी

मुंबई येथील डॉ. डी. एन. सिंग मार्ग इथल्या मेट्रोपॉलिटन इन्शुरन्स हाऊस, येथे 1954 पासून अत्यंत प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम” चालवण्याऱ्या मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन (MKVIA) या सर्वात जुन्या खादी विक्री संस्थेचे ‘खादी’ प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. बनावट/खादी नसलेल्या उत्पादनांच्या विक्रीविरुद्ध कडक धोरणाअंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) ही कठोर कारवाई केली आहे.
 
डॉ. डी.एन. मार्ग येथील खादी एम्पोरियम अस्सल खादी उत्पादनांच्या मिषाने, खादी नसलेल्या उत्पादनांची विक्री करत असल्याचे आयोगाला आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नियमित तपासणी दरम्यान, आयोगाच्या अधिकार्‍यांनी एम्पोरियममधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये ही उत्पादने खादी नसल्याचे आढळून आले. आयोगाने जारी केलेल्या “खादी प्रमाणपत्र” आणि “खादी प्रमाणचिन्ह प्रमाणपत्र” च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयोगाने मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनला कायदेशीर नोटीस जारी केली. नोंदणी रद्द केल्यामुळे, खादी एम्पोरियमला अस्सल खादी विक्री केंद्र म्हणून मान्यता राहणार नाही आणि यापुढे एम्पोरियममध्ये खादी उत्पादने विकण्याची परवानगीही नसेल. विश्वासार्हतेचा भंग केल्याबद्दल आणि खादी ब्रँडची विश्वासार्हता आणि लोकप्रियता यांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर जनतेची फसवणूक केल्याबद्दल मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनविरुद्ध (MKVIA) कायदेशीर कारवाईचा विचार आयोग करत आहे.
 
एम्पोरियममधून फक्त “अस्सल खादी उत्पादनेच ” विकण्याच्या सक्त अटीवर आयोगाने 1954 मध्ये खादी एम्पोरियमचे संचालन आणि व्यवस्थापन MKVIA या नोंदणीकृत खादी संस्थेकडे सोपवले होते. मात्र अलिकडच्या वर्षांत, MKVIA बनावट खादी उत्पादने विकून अनुचित व्यापार पद्धतींमध्ये गुंतले होते. त्यामुळे हे एम्पोरियम खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून चालवले जात असल्याचा समज असलेल्या लोकांची फसवणूक होत होती.
 
गेल्या काही वर्षांमध्ये आयोगाने “खादी इंडिया” या आपल्या ब्रँड नावाचा गैरवापर आणि ट्रेडमार्कच्या उल्लंघनाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आयोगाने आत्तापर्यंत 1200 हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांना “खादी” या ब्रँड नावाचा गैरवापर केल्याबद्दल आणि “खादीच्या ” नावाखाली बिगर खादी उत्पादने विकल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावल्या आहेत.