शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (08:08 IST)

Jal Diwali 47 शहरांमध्ये अभियानाच्या माध्यमातून ‘जल दिवाळी’चे आयोजन

navi mumbai mahapalika
राज्यात 7 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत “जल दिवाळी’ साजरी करण्यासाठी ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ (DAY-NULM) व अमृत योजना यांच्या सहकार्याने ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान” नावाचा एक अनोखा उपक्रम राज्यातील 24 महानगरपालिका व 23 नगरपरिषदांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
 
या उपक्रमामुळे स्वयंसहाय्यता बचतगटांमधील (SHG) महिलांना त्यांच्या संबंधित शहरांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रास (WTPS) भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भेटींदरम्यान घरोघरी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची गटातील महिलांना माहिती देण्यात येत आहे. याशिवाय, नागरिकांना उच्च गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करून घेणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दल साक्षर करण्यात येत आहे.
 
पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची भावना वाढवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. शिवाय या भेटीमुळे महिलांना मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी निर्माण होईल. सर्वसमावेशकता आणि सहभाग याला चालना मिळेल.
 
या उपक्रमांतर्गत  7 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान राज्यातील 47 शहरांमध्ये 83 जलशुद्धीकरण केंद्रांना साधारण 2000 महिला सदस्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
 
या भेटीमध्ये बचत गटांमधील महिलांना ‘जल दिवाळी’ चे किट भेट म्हणून दिले जाणार आहे. भेटीच्या ठिकाणी प्रशिक्षित व्यक्तीकडून जल शुद्धीकरण पद्धती सर्वांना सांगण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त बचत गटांमधील महिलांना सहभागी करून घेण्यात यावे, असे आवाहन आयुक्त तथा राज्य अभियान संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई मनोज रानडे यांनी केले आहे.
 
आज 7 नोव्हेंबर 2023 रोजी नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व अमृत (AMRUT) यांच्या सहकार्याने “जल दिवाळी” निमित्त जलशुद्धीकरण केंद्र भेट आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचे उद्घाटन आयुक्त तथा राज्य अभियान संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई श्री. रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपायुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालनालय शंकर गोरे, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी अभियंता, समाज विकास अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी व स्वयंसहाय्यता बचत गटांचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.