शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (14:47 IST)

भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा

तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र, प्रत्येकवेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जातं. पण आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याचप्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज INS Vikrant नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन हा ध्वज तयार करण्यात आल्याचं सांगितलं.
 
कसा आहे नौदलाचा नवा ध्वज?
नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे.
 
छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’असं निळ्या रंगात लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’हे नौदलाचं ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.