शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 21 जुलै 2023 (22:20 IST)

लग्न जमवून देण्याचे आमिष:मॅट्रिमोनी वेबसाईटवरून विवाहेच्छुला ६ लाखांचा गंडा

6 lakhs extortion from matrimony website  लग्न जमवणाऱ्या संस्थेच्या एका संकेतस्थळावर आवडलेल्या युवतीसोबत लग्न जमवून देण्याचे आमिष देत एका महिलेने तरुणाला सहा लाख १० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पाटील (३०) नामक तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एका विवाह जमवणाऱ्या एका  संकेतस्थळावर त्याने नावनोंदणी केली होती. काही दिवसांत संबंधित संकेतस्थळावरून काही विवाहेच्छुक युवतींचे फोटो पाठविण्यात आले.
 
यातील एक युवती पसंत पडल्याने तिच्यासोबत लग्न जुळविण्यासाठी पाटील यांनी संकेतस्थळावर माहिती पाठवली. विवाह संस्थेच्या संशयित महिलेने सोशल मीडियावर आणि फोनद्वारे संपर्क साधून पाटील यांना मुलीचे फोटो आणि सर्व माहिती पाठवली.
 
दोघांची एकमेकांना माहिती होण्याकरिता संशयित महिलेने पाटील यांना कॉल करून कॉन्फरन्स कॉलने विवाह नोंदणी कार्यालयाची फी भरण्यास सांगीतले. पाटील यांनी सुरवातीला काही रक्कम ऑनलाइन जमा केली. पाटील यांनी वेळोवेळी ६ लाख १० हजारांची रक्कम भरली. आणखी पैशांची मागणी होत असल्याने पाटील यांना संशय आला. संबंधित महिलेशी संपर्क साधला असता तिने पैसे देण्यास नकार देत आणखी पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली.
 
अशी केली फसवणूक:
पीडित तरुणानें विवाह जुळविणाऱ्या संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली होती. नोंदणी कार्यालयातून फोन आला. सर्व माहिती मागवली. इच्छुक युवकाकडून रजिस्ट्रेशन फी घेण्यात आली. युवतीची सर्व माहिती दिल्यानंतर दोघांच्या आवडी-निवडी समजण्यासाठी झुम मिटिंगसाठी पैसे पाठविण्यास सांगितले. वेळोवेळी ६ लाख भरल्यानंतर संबंधित युवतीने स्थळ पसंत नसल्याचे सांगत पुढे बोलणे करण्यास नकार देत फसवणूक केली.