शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (15:52 IST)

भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जेजुरी देवस्थानच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या प्रयत्न केल्यासाठी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी सकाळी गोपिचंद पडळकर यांनी जेजुरी येथे जाऊन पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. या शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन कऱणे आणि पोलिसांशी झटापट करणे या कामासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणात शुक्रवारी पहाटेच जेजुरीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या संस्थानाच्या पुतळ्याचे अनावरण गोपिचंद पडळकर यांनी केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवार या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याआधीच भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुतळ्याचे उद्घाटन केले. पुतळ्याचे अनावरण करताना गोपिचंद पडळकर यांच्यासोबतचे कार्यकर्ते आणि संस्थानच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पडळकर यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे. पुन्हा एकदा थेट राष्ट्रवादीला शिंगावर घेत असल्याचे उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे. आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडळकरांवरून नाराजी आहे. त्यातच आज पडळकर यांनी ऱाष्ट्रवादीच्या शरद पवारांवरही गंभीर टीका केली आहे.
 
या पुतळ्याचा अनावरणाला आमचा विरोध नाही. पण भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये. भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या माणसाच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणे हा अहिल्यादेवींचा अपमान असल्याचे पडळकर म्हणाले. शरद पवारांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावताना विचार करावा, कारण यांच्या विचारात फार तफावत आहे. त्यामुळेच या पुण्यश्लोक पुतळ्याच्या पायावर डोक ठेवून उद्घाटन झाले असे आम्ही जाहीर करतो असे सांगितले.