रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (22:14 IST)

प्रसिद्ध असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठात तब्बल 50 कोटी रुपयांचा घोटाळा

crime
सेवेकरी अमर पाटील यांनीच केली अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात तक्रार
नाशिक : दिंडोरी येथील देशात प्रसिद्ध असणाऱ्या स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख श्रीराम खंडेराव मोरे उर्फ गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठात तब्बल 50 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, अशी तक्रार स्वामी समर्थ केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात केल्याने भक्तपरिवारात खळबळ उडाली आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा करून संस्थेच्या निधीचा अपहार केल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली आहे. याबाबतचे लेखापरीक्षण अहवाल पुरावा म्हणून तक्रारीसोबत जोडल्याचेही पाटील यांनी सांगितले. याबाबत पोलीस काय भूमिका घेतात याकडे आता भक्त परिवाराचे लक्ष लागून आहे.
या तक्रारीमध्ये पाटील यांनी श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णासाहेब मोरे हे या संस्थेचे अध्यक्ष असून नारायण दामोदर काकड हे उपाध्यक्ष आहे तर चंद्रकांत श्रीराम मोरे सचिव, नितीन श्रीराम मोरे उपसचिव अनिल खंडेराव मोरे, शिरीष त्र्यंबक मोरे, निंबा मोतीलाल शिरसाट हे सदस्य आहेत. या सर्वांनी संगनमताने 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपयांचा अपहार केल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वामी समर्थ केंद्राचे मोठे प्रस्थ आहे. अण्णासाहेब मोरे यांचा शिष्य वर्ग ही मोठा आहे. असे असल्याने संस्थेतील निधीचा अपहार झाल्याची तक्रार दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धर्मदाय संस्थेचा निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, स्वामी समर्थ गुरूपिठाच्या विश्वस्तांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने फौजदारी स्वरूपाचे कट-कारस्थान करून एक कोटी 44 लाख 93 हजार 560 रुपये निधी बँकेत जमा न करता वेगळ्या कारणासाठी वापरून अपहार केला असल्याचा दावा करीत संपूर्ण तपशील तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे.
 
अशी आहे तक्रार
कुठल्याही धर्मदाय संस्थेत पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे काम करण्यासाठी कायदेशीर तरतुदीप्रमाणे कलम 36 नुसार धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच त्या कामांच्या निविदा काढणे गरजेचे असते. मात्र, 2009 ते 2021 पर्यंत वेळोवेळी विविध कामांच्या माध्यमातून पैशांचा अपहार केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 2016 ते 2017 या आर्थिक वर्षात 9 कोटी 21 लाख 70 हजार 685 रुपये स्थावर मिळकतीवर तर 10 हजार 200 रुपयांचा खर्च जंगम मिळकतीवर करण्यात आला आहे. एकूण रक्कम रुपये 9 कोटी 21 लाख 80 हजार 885 रुपये एवढ्या निधीचा अपहार केला आहे. 2017 ते 2018 या आर्थिक वर्षात 5 कोटी 73 लाख 18 हजार 271 रुपयांचा स्थावर मिळकतींवर खर्च करण्यात आला, 47 लाख 692 रुपयांचा खर्च जंगम मिळकतींवर केला आहे. याच काळात 24 लाख 62 हजार 651 रुपये अनामत अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात आली आहे. असा एकूण 6 कोटी 44 लाख 99 हजार 641 रुपये एवढ्या निधीचा अपहार केला आहे. 2018 ते 2019 या वर्षात 9कोटी 5लाख 65 हजार 308 रुपये इतका खर्च स्थावर मिळकतीवर आणि रक्कम रुपये 2 कोटी 63 लाख 44 हजार 878 रुपये जंगम मिळकतींवर खर्च केला आहे. या काळात 1 कोटी 47 लाख 33 हजार 878 रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून इतरांना दिला आहे. 2019 ते 2020 या आर्थिक वर्षात 10 कोटी 30 लाख 58 हजार 920 रुपये खर्च स्थावर मिळकतींवर 44 लाख 22 हजार 37 रुपये जंगम मिळकतीवर खर्च केला आहे. 2 कोटी 79 लाख 60 हजार 873 रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात आला आहे. अशाप्रकारे यावर्षी 13 कोटी 54 लाख 41 हजार 830 रुपये एवढ्या निधीचा अपहार केला आहे. 2020 ते 21 या काळात 4 कोटी 86 लाख 24 हजार 128 रुपये स्थावर मिळकतींवर आणि रक्कम रुपये 13 लाख 11 हजार 41 रुपये जंगम मिळकतीवर खर्च केले आहेत. याच कालावधीत 1 कोटी 86 लाख 68 हजार 99 रुपये इतरांना अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात आलेले आहे. अशी एकूण 6 कोटी 86 लाख 268 एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार केला आहे. अशाप्रकारे स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या धर्मदाय संस्थेमध्ये 2009 पासूून 2021 पर्यंत 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपये निधीचा अपहार करून शासनाची आणि भक्तांची फसवणूक केली असून संस्थेच्या विश्वस्थांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्वामी समर्थ गुरुपीठ या तक्रारीवर काय म्हणाले ?
तक्रारदारांनी वैयक्तिक द्वेषापोटी हे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपात तथ्य असते तर आतापर्यंत धर्मदाय आयुक्त अथवा पोलीस निरीक्षकांनी आमच्यावर कारवाई केली असती. आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत आणि त्यांची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ट्रस्टचे सर्वच कामकाज नियमानुसारच झालेले आहे लेखापरीक्षण बाबतीतील कोणत्याही तक्रारींत तथ्य नाही.
– गिरीश मोरे, व्यवस्थापक,