शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (20:13 IST)

बाप्परे, थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यकांच्या नावे तोतयागिरी

fraud
नाशिकमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यकांच्या नावे तोतयागिरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 28 व 29 नोव्हेंबरदरम्यान फिर्यादी प्रतापसिंग बाबूराव चव्हाण (वय 67) यांना अज्ञात इसमाने फोन करून मुख्यमंत्र्यांचा पीए कानडे बोलत असल्याचे सांगितले.

"मुख्यमंत्र्यांचा पीए  कानडे बोलतोय" असे सांगत तोतयाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  प्रशासकांना  फोन केला. सक्तीच्या रजेवर असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या, अशा सूचना तोतयाने प्रशासकांना केल्या आहेत. सक्तीच्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्याची सध्या चौकशी सुरु आहे आणि त्या अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक फोन का करतील? असा प्रश्न त्यांना पडला.
 
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे संपर्क साधला. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रशासकांनी संपूर्ण आपबिती सांगितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून आलेला फोन बनावट  असल्याचे प्रशासकांच्या लक्षात आले. प्रशासकांनी लगेचच जवळचे पोलीस ठाणे गाठले आणि तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor