शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:01 IST)

नाशिकरोड कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल; गुन्हेगारांना अशी केली मदत

nasik jail
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहाचा कारभार अतिशय संशयास्पद असल्याची बाब समोर आली आहे.  खुद्द तुरुंग अधिकारीच गुन्हेगारांना मदत करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याची गंभीर दखल कारागृह महासंचालकांनी घेतली आहे. त्यामुळेच याप्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यासह ३ जणांवर नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी (श्रेणी १) शामराव आश्रुबा गिते, तत्कालीन तुरुंग अधिकारी (श्रेणी २) माधव कामाजी खैरगे, तत्कालीन वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डाबेराव या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी आदेश दिले होते. तुरुंग अधिकाऱ्याने गुन्हेगाराची मदत करण्यासाठी तुरुंगाच्या नोंदवहीमध्ये खाडाखोड करणे, व्हाईटनर लावून फेरबदल करणे, शिक्षा वॉरंट, नोंदवहीमध्ये न्यायाधीन कालावधी, बाह्यदिवस कालावधी, माफीचे दिवस या नोंदीवर व्हाईटनर लावून खाडाखोड करणे असे गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. याद्वारे शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.
 
हा सर्व प्रकार २०१७ मध्ये घडला आहे. याप्रकरणी सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने अहवाल दिला. त्यात स्पष्ट झाले की अधिकारीच गुन्हेगारांना मदत करुन शासनाची फसवणूक करीत आहेत. आर्थिक व्यवहार करुन या अधिकाऱ्यांनी शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगार आणि कैद्यांना सुटीमध्येही सूट दिल्याचे उघड झाले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा नाशिकरोड कारागृह चर्चेत आले आहे.