शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (08:59 IST)

दहीहंडी की राजकीय आखाडा? पारंपरिक उत्सवातून निवडणुकीचं राजकारण

dahi handi
दीपाली जगताप
 
'गोंविदा रे गोपाळा...'
 
'अरे बोल बजरंग बली की जय...'
 
असे सूर कानावर पडत राज्यात दहीहंडीचा उत्सव सुरू होतो. परंतु हल्ली हा सण जन्माष्टमिचा पारंपरिक उत्सव म्हणायचा की राजकारण्यांचा? असा प्रश्न पडावा इतके बदल कालांतराने दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात झालेले दिसतात.
 
कोणाची दहीहंडी सर्वांत उंच? यासाठी संर्वात उंच थर लावण्यात कोण यशस्वी होणार? आणि लाखोंचं बक्षीस कोण देणार? यासाठीची स्पर्धा सुरू असल्याचं दिसतं.
 
राज्यातील जनतेसाठी खरंतर हे चित्र तसं नवीन राहिलेलं नाही. परंतु यंदाची दहीहंडी ही खऱ्या अर्थाने गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा की राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा? असा प्रश्न उपस्थित करणारी आहे.
 
याला कारणही तसंच आहे. विशेषत: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय आखाड्याचं स्वरुप आलेलं दिसतं. कोणता नेता आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात किती लाखांचं बक्षीस देणार याचीच स्पर्धा रंगल्याचं चित्र यावर्षी दिसत आहे.
 
गेल्या काही वर्षांत या उत्सवाचं रुपांतर भव्य इव्हेंटमध्ये झालं हे उघड आहे. हंडी फोडण्याच्या स्पर्धेत नंतर याला साहसी खेळ म्हणून मान्यताही देण्यात आली.
 
परंतु कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुरू झालेला हा पारंपरिक खेळ केवळ इथपर्यंतच थांबला नाही. तर काही ठिकाणी हा राजकीय आखाडा बनला असंही याचं विश्लेषण केलं जातं. यंदाची दहीहंडी याचं ताजं उदाहरण म्हणता येईल. असं का? हे जाणून घेऊया...
 
लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर
राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यात निवडणुका तोंडावर आहेत. अशात राजकीय नेत्यांनी दहिहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे.
 
दहीहंडी उत्सवात दही किंवा फळं ठेवलेली हंडी एका उंचीपर्यंत नेण्यात येते. काही ठिकाणी तर अगदी जमिनीवर उभं असलेल्या माणसाला स्पष्ट हंडी दिसत नाही इतकी ती उंचावर नेली जाते.
 
यासाठी गोविंद पथक मानवी मनोरा तयार करतात. मग हंडी फोडण्यासाठी तरुण मंडळांमध्ये स्पर्धा रंगते. जे गोविंदा पथक सर्वाधिक थर लावत सर्वप्रथम हंडी फोडणार त्याला बक्षीसाची रक्कम दिली जाते.
 
गोविंदा पथकांचे एकावर एक असे थर लागत असताना दुसरीकडे मोठ्या आवाजात संगीताचे कार्यक्रम सुरू असतात.
 
कुठे लाईव्ह म्यूजीक तर कुठे डिजे. काही ठिकाणी गोविंदा पथकांच्या अंगावर पाणी टाकलं जातं. या दरम्यान सिनेसृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेत्यांची रेलचेल पहायला मिळते.
 
व्यासपीठावरून राजकीय नेत्यांचे भाषण सुरू असतात. कलाकारांचेही विविध कार्यक्रम असतात. आणि हे सगळं पाहण्यासाठी शेकडो तरुणांची गर्दी त्याठिकाणी जमलेली असते.
 
विशेषत: मुंबई आणि ठाण्यात राजकीय नेते आपआपल्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करताना दिसत असल्याचं दिसतं.
 
मुंबई आणि ठाण्यात कोणत्या नेत्याने किती रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय ते पाहूया,
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांची बक्षीस जाहीर करण्यात आली आहेत. गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपये तर महिला पथकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे.
 
भाजपचे नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तब्बल 51 लाख 51 हजार 510 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
 
शिवसेनेचे आमदार शिंदे गटाचे नेते प्रकाश सुर्वे यांनी 50 लाख 5 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय.
 
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 9 थरांचा रेकाॅर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय.
 
तर 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. यानंतर क्रमाने इतर गोविंदा पथकांना बक्षीसं दिली जाणार आहेत.
 
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यासाठी उपस्थित राहणार आहेत.
 
9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला त्यांनी 11 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर 8 थर लावणाऱ्या प्रत्येक मंडळाला 21 हजार, 7 थरासाठी 9 हजार, 6 थरांसाठी 7 हजार आणि त्याखाली पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. तसंच महिला पथकांना प्रत्येकी 11 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
 
'कितीही प्रयत्न केले तरी त्यांची घागर उताणी राहणार'
भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दहीहंडीची जय्यत तयारी केली आहे. वरळीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जांबोरी मैदानात भाजपने 'परिवर्तन' दहीहंडीचं आयोजन केलं आहे.
 
निवडणुकीच्या तोंडावर मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मुंबईत विविध प्रभागांमध्येही दहिहंडी उत्सवाचं आयोजन आहे.
 
तर वरळीत युवा सेनेककडूनही दहीहंडी साजरी केली जाणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
 
यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये नवीन वाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी भाजपला टोला लगावला आहे.
 
ते म्हणाले, "वरळीत भाजपने दहीहंडी उत्सव साजरा करुन कितीही प्रयत्न केले तर यांची घागर उताणी राहणार आहे. भाजपने कागदावर लिहून द्यावं की त्यांचा हा दहीहंडी उत्सव पुढचे पाच-दहा वर्षं सुरु राहील. फक्त निवडणुका जवळ आल्या की अशाप्रकारे आयोजन करायचं का?"
 
सचिन अहीर यांना प्रत्युत्तर देत भाजपच्या दहीहंडीचे आयोजक संतोष पांडे म्हणाले,"सचिन अहीर आधी उत्सव करत होते आता शिवसेनेत गेल्यापासून त्यांना करता येत नाही. ते करत नाहीत म्हणून आम्ही करत आहोत. त्यांना जमत नाही म्हणून आम्ही करतोय. आम्ही आमचं काम करत राहणार."
 
शिवसेनेचे दोन गट आमने-सामने
ठाणे शहरात राजकीय नेत्यांकडून दरवर्षी दहीहंडी उत्सवाचं भव्य आयोजन केलं जातं.
 
टेंभी नाका परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आयोजित दहिहंडी उत्सव होणार आहे. तर या कार्यक्रमापासून जवळच ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्याकडून दहिहंडीच्या उत्सवाचं आयोजन केलं आहे.
 
ठाण्यात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही दरवर्षीप्रमाणे दहिहंडी उत्सवाचं नियोजन केलं आहे. 9 थरांचा रेकाॅर्ड ब्रेक करणाऱ्या पथकासाठी विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवण्यात आलं आहे.
 
तर ठाण्यातच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही दहीहंडी उत्सवाची मोठी तयारी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
 
याशिवाय मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे शहरात विविध ठिकाणी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आलं आहे.
 
गोविंदा पथकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर करून तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होताना दिसत आहे. दहीहंडी उत्सव आयोजक राजकीय नेते मात्र हे नाकारतात.
 
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के सांगतात,"गोविंदा हाच आमचा सेलिब्रिटी आहे. मुंबई, पुणे येथून गोविंदा पथक सहभागी होत असतात. सलामी देणं ही परंपरा झालेली आहे. चार थर लावले तरी आम्ही रोख बक्षीस देतो. आम्ही जीवघेणी स्पर्धा करत नाही. अनेक सेलिब्रिटी उत्सवाला हजेरी लावतात. संगतीचा कार्यक्रम असतो. आम्ही सेफ्टी रोपची व्यवस्था केलेली आहे."
 
हे कुठलंही शक्तीप्रदर्शन नाही असंही ते सांगतात.
 
"कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्हाला कुठेही पक्षाचं नाव, चिन्ह दिसणार नाही. आता ब्रँडिंग केलं जातं. यामागे मंडळांची प्रचंड मेहनत असते. मंडळं, उत्सव एका दिवसात होत नाही. यामागे अनेक लोक मेहतन घेत असतात. आम्हीही अशा उत्सवांमधून मोठे झालेले कार्यकर्ते आहोत. यात कुठेही कोणाशीही स्पर्धा नाही. परंपरेनुसार हा उत्सव आम्ही करत आहोत,"असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
पहिल्यांदाच प्रो-गोविंद दहीहंडीचे आयोजन
प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रो दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारने याबाबतची घोषणा यापूर्वी केली होती.
 
मुंबईत वरळी डोममध्ये ही स्पर्धा होणार आहे. या डोमची उंची 40 फूट असल्याने इथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
 
या स्पर्धेचे पहिले बक्षीस 11 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 7 लाख रुपये आणि तिसरे बक्षीस 3 लाख रुपये आहे. तसंच यासाठी गोविंदाच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजार रुपयांची रक्कम सरकारने मंजूर केली आहे.
 
8 सप्टेंबरपर्यंत शासकीय विमा कवच लागू असेल. 75 हजार गोविंदांना या विम्याचं कवच मिळणार आहे. प्रो गोविंदा दहीहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास हे शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे.
 
दहीहंडी उत्सव की राजकीय शक्तीप्रदर्शन?
दहीहंडी हे राजकीय शक्तीप्रदर्शनाचंही व्यासपीठ झालं आहे यात काही दुमत असण्याचं कारण नाही असं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात.
 
अशा महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना आपल्याकडे आकर्षित केलं जातं. तरुण वर्ग अशा आयोजनासाठी उत्साहीत असतो. कलाकारांना बोलवलं जातं, लाखो रुपयांची बक्षीस दिले जातात, डिजे लावून धूडगूस घालण्याची मूभा असते. या माध्यमातून तरुणांची मतं आपल्याकडे वळवण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो.
 
परंतु प्रत्यक्षात या प्रयत्नांमुळे मतं परिवर्तीत होतात का? यावर बोलताना प्रधान सांगतात, "राजकीय नेते मतांसाठी असे अनेक प्रयत्न करत असतात. उदा. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाचे वर्ग, गणेश मंडळांना देणगी, रोजगार शिबीरं असे अनेक मार्ग केले जातात. हल्ली ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ क्षेत्रांची सहल आयोजित केली जाते. यामुळे दहीहंडी हा सुद्धा अशाच अनेक प्रयत्नांचा एक भाग आहे."
 
यात नेत्यांमध्येही कोण वरचढ ठरेल अशी स्पर्धा सुरू असते, प्रतिष्ठेची लढाई केली जाते असंही ते सांगतात.
 
" ठाण्यात आपण पाहतोय की जे वर्षानुवर्ष दहिहंडी आयोजित करतात ते निवडून येत आहेत. शिवाय, अशा कार्यक्रमांमधून नेत्यांना प्रसिद्धी मिळते. लोकप्रियता वाढवण्यासाठीही हा प्रयत्न असतो."
 
दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता दिल्यावर प्रो कबड्डीप्रमाणे प्रो दहिहंडी असेही कार्यक्रम होत आहेत.
 
संदीप प्रधान सांगतात,"क्रिकेटमध्ये आयपीएल खेळ सुरू झाल्यावर भरमसाठ पैसा आला. यानंतर आपण पाहिलं की प्रो कबड्डी सुद्धा सुरू झालं. दहिहंडीतही असं काही होऊ शकतं. पैसा गुंतल्यामुळे मग बेटींग किंवा फिक्सिंग असेही प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही."
 
मुंबई, ठाण्यात दहीहंडीसारखे उत्सव हे तरुणांशी कनेक्ट होण्याची संधी यादृष्टीने त्याकडे पाहिलं जातं असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात.
 
ते म्हणाले, "मुंबईत गणेशोत्सव, दहीहंडी, साई दिंडी, शिवजयंती अशा कार्यक्रमांचं आयोजन करून राजकीय पक्ष तरुणांशी जोडण्याचा प्रयत्न करतात. दहीहंडीसारख्या उत्सवात प्रचंड गर्दी जमवता येते. यावेळी राजकीय नेत्यांना आपलं कॅम्पेन तरुणांपर्यंत पोहचवण्याची संधी असते.
 
तसंच नेतृत्त्वालाही आपली प्रतिमा, आपला संदेश थेट देता येतो. त्यात लोकसभा, विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने यंदा असे अनेक कार्यक्रम आपल्याला अशाच स्वरुपात होताना दिसतील."
 
आयोजन करणारे राजकीय नेते मात्र हे आरोप फेटाळता. दहीहंडीला राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सुर्वे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
ते म्हणाले, "याला राजकीय दृष्टीकोनाने पाहणे चुकीचं आहे असं मला वाटतं. काही लोक निवडणुकीसाठी करतात, पण मी 21 वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव करत आहे. तरुणांना प्राधान्य देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे करतो. दहीहंडी हा खेळ एकतेचं प्रतिक आहे. सामूहीकरित्या खेळताना एकमेकांवर विश्वास ठेऊनच थर चढवले जातात. तरुण व्यसनाधीन होण्यापेक्षा अशा खेळांसाठी तयारी करतात हे महत्त्वाचं आहे."
 
परंतु यासाठी राजकीय नेते लाखो रुपयांचा खर्च करतात. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,"स्पर्धा आणि बक्षीस असल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साह असतो. आता आम्ही गोविंदांसाठी विमा मोफत केला आहे. अटी शर्थी शिथील केल्या आहेत. यामुळे गोविंदा पथकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
 
आमच्याकडे 87 गोविंदा पथक आहेत. यापैकी 83 तरी सहभागी होतात. त्यांचा खर्च, सरावाचा खर्च, बस, जेवण, टीशर्ट्स अशा अनेक गोष्टींसाठी किमान पावणे दोन लाख रुपये इतका खर्च तरी येतोच."