रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑक्टोबर 2019 (10:19 IST)

विजयी कोणीही होवो, मिरवणूक नको, सेलिब्रेशन नको आपला जवान वीरगतीस प्राप्त

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांनी निकालानंतर विजयी जल्लोष न करण्याचे कार्यकर्ते आणि इतरांना देखील आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की आपल्या कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील वीर जवान नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांना मंगळवारी वीरगती प्राप्त झाली असून, आपण आपल्या तालुक्यातील एक भूमिपुत्र गमावला आहे. या दुःखात आपण सर्व जण भावुक झालो असून त्यामुळे निकाल काहीही लागो, कोणीही विजय प्राप्त करो मात्र मिरवणूक किंवा कोणतेही सेलिब्रेशन नको, असा निर्णय स्नेहलात कोल्हेंनी घेतला आहे.
 
आपल्या शहराच्या भूमिपुत्राच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. त्यामुळे उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजय कोणाचाही होवो जल्लोष करू नये, गुलाल उधळण करू नये. या दुःखासमोर कितीही मोठा आनंद असला तरी तो क्षुल्लक आहे. त्यामुळे सर्वांनी या दुःखाची जाणीव ठेवावी आणि उद्या आपल्यातील संवेदनशीलता जपावी, असे आवाहन करत भाजपा उमेदवार स्नेहलता कोल्हेंनी केले आहे.
 
स्नेहलता कोल्हे या कोपरगाव मतदारसंघातील विद्यमान आमदार असून त्यांनी भाजपा महायुतीकडून निवडणूक लढवली, स्नेहलता यांना राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांचे आव्हान आहे. कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील रहिवासी नायब सुभेदार सुनिल रावसाहेब वलटे (वय 40) यांना मंगळवारी सीमेवर वीरमरण आले आहे.