राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणूक जाहीर; असे आहे जागांचे समीकरण
महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 10 जून 2022 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 31 मे आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह 15 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .
महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल,डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी 10 जून 2022 निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
या निवडणुकांसाठी 24 मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. 31 मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 1 जून रोजी अर्जांची छाननी होणार. 3जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. 13जून 2022 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांच्या संख्याबळात बदल झाला आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला 2, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना प्रत्येकी 1जागा मिळणार आहे. त्यामुळे सहावी जागा रिक्त राहणार आहे. मात्र, खासदार संभाजीराचे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे आजच घोषित केले आहे. त्यामुळे हे सर्व पक्ष त्यांना पाठिंबा देतात की प्रत्यक्ष निवडणुकीसाठी चुरस निर्माण होते हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.