शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बारामती , सोमवार, 12 एप्रिल 2021 (08:50 IST)

बारामतीत कोरोनाचे भयावह दृश्य, बेड नसल्यामुळे खुर्चीवरच उपचार

हाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
 
अनेक जिल्ह्यांमध्ये बेडची कमतरता जाणवत आहे. बारामतीमध्ये बेडच उपलब्ध नसल्यामुळे खुर्चीवरच उपचार केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बारामतीत रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, त्यामुळे अनेक रुग्णांना खुर्चीवर बसून उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बारामतीयेथील शासकीय सिल्व्हर जुबली हॉस्पिटल मधील आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर स्वतः रुग्णांना खुर्चीवर बसवून उपचार करताना पहायला मिळत आहेत. बारामती तालुक्यात ६४४ बेड उपलब्ध आहेत. त्यातील फक्त १३० बेड हे शासकीय आहेत. त्यातील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात ९२ बेडची क्षमता असताना सध्या रुग्णालयात १९० रुग्ण उपचार घेत आहेत.
 
दरम्यान बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केलं आहे. लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला १ ते २ दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. १४ दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे.