शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (07:44 IST)

'या' मागणीच्या निषेधार्थ तृप्ती देसाईं यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

‘राज्यातील सर्व देवींच्या मंदिरांमध्ये यापुढे महिला पुजारी नेमाव्यात’, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. त्याचा निषेध म्हणून पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या वतीने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईं यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राज्यातील देवींच्या मंदिरांमध्ये यापुढे महिला पुजारी नेमाव्यात, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. देसाई यांच्या फोटोला काळे फासत ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने हे आंदोलन केल्याचे समोर आले आहे.
 
देसाई सध्या नांदेड दौऱ्यावर असून त्यांनी माहूर येथे जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले. राज्यातील सर्व देवस्थानच्या ट्रस्टमध्ये महिलांचा समावेश असावा. शिवाय देवीच्या मंदिरात महिला पुजारी असावी, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. यावर निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या भूमिकेला विरोध करत ब्राह्मण महासंघाने हे आंदोलन केले असल्याचे ब्राह्मण महासंघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.