सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (17:30 IST)

महाराष्ट्रात दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, सिमी दहशतवादी अटकेत, 23 वर्षांपासून फरार होता

arrest
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) शी संबंधित एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अनेक वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या हनिफ शेखला भुसावळ शहरातून अटक केली आहे. तो 23 वर्षांपासून फरार होता.
 
राजधानीतील पोलिसांच्या विशेष पथकाने भुसावळ शहरात ही कारवाई केली. आरोपी हनिफ शेख याला त्याच्या मिल्लतनगर येथील घरातून अटक करण्यात आली. त्याचे सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. फरार झाल्यानंतर तो भुसावळ येथे राहून एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता.
 
दिल्लीहून विशेष पथक आले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनिफ शेख विरुद्ध दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलिस ठाण्यात 2001 मध्ये UAPA आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. 2001 मध्ये घडलेला हा गुन्हा 'सिमी' या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे हनिफचा माग काढला.
 
भुसावळमध्ये खळबळ
गुरुवारी दुपारी दिल्लीहून आलेल्या पोलिस पथकाने बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने हनिफला दत्तनगर मेहराज बिल्डिंग, खडका रोड, भुसावळ येथून पकडले. या टीममध्ये दिल्ली स्पेशल सेलचे इन्स्पेक्टर पवन कुमार, एसआय सुमित, नवदीप यांच्यासह एकूण 15 पोलिस होते. अचानक झालेल्या या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 
दिल्लीला नेले
संशयित शेख याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला तत्काळ भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक शेखसह तत्काळ दिल्लीला रवाना झाले.
 
काय आहे आरोप?
23 वर्षांपूर्वी दहशतवादी संघटना सिमीच्या इस्लामिक मूव्हमेंट मासिकात भडकाऊ लेख लिहिल्याबद्दल दिल्लीत हनिफ शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली न्यायालयाने शेखला 2002 मध्ये फरार घोषित केले होते. दरम्यान संशयित भुसावळ येथे असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्याला अटक करण्यासाठी स्पेशल सेलचे 15 अधिकारी व कर्मचारी भुसावळात आले होते.
 
सिमी म्हणजे काय?
सिमीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याची माहिती आहे. दहशतवादाला प्रोत्साहन आणि देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्यात सिमीचा सहभाग असल्याचे अनेक पुरावे आहेत. यूएपीएसह कायद्याच्या विविध कलमांतर्गत सिमी आणि त्याच्या सदस्यांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.