शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (08:40 IST)

Nashik :ऑनलाईन खरेदी-विक्रीवर जादा कमिशनचे आमिष दाखविले अन् युवकाने पावणे दोन लाख रुपये गमावले

वस्तू खरेदी-विक्री करून त्या बदल्यात जादा कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात मोबाईलधारकाने एका तरुणास पावणेदोन लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सागर प्रसाद सुरेंद्र रॉय (वय 36, रा. अमीकुंज रो-हाऊस, महाजननगर, अंबड लिंक रोड, नाशिक) हे कामाच्या शोधात होते. ते ऑनलाईन विविध कामांची माहिती घेत होते. त्यादरम्यान 9886941526 या क्रमांकाच्या अज्ञात मोबाईलधारकाने रॉय यांच्याशी टेलिग्राम व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधला.
 
अज्ञात आरोपीने रॉय यांना वस्तू खरेदी-विक्री केल्यास त्या बदल्यात जादा कमिशन मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी रॉय यांना 1 लाख 69 हजार 100 रुपये किमतीच्या वस्तू आरोपी याने ऑनलाईन विकत घेण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी रॉय यांना या वस्तू विकण्यास सांगितले. या वस्तू त्यांनी विकल्यानंतर रॉय यांना एकूण दोन लाख 75 हजार 600 रुपयांची रक्कम कमिशनस्वरूपात मिळणार होती; मात्र आरोपी याने फिर्यादीकडून टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, तसेच एएमए222.वर्क या साईटवरून वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांवर 1 लाख 69 हजार 100 रुपये भरण्यास सांगितले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी ही रक्कम भरली होती.
 
रॉय यांनी वस्तू विकल्यानंतर कमिशनचे पैसे आरोपीकडे मागितले होते; परंतु कमिशनची रक्कम फ्रीज करून ते पैसे हवे असल्यास तुम्हाला अधिक वस्तू घ्याव्या लागतील, असे सांगून अज्ञात मोबाईलधारकाने रॉय यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 7 व 8 जूनदरम्यान घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor