पोलीस पदोन्नतीमधील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती
गृह विभागाने बुधवारी जारी केलेल्या पोलीस पदोन्नतीमधील पाच अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बदली करताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या मुख्यमंत्र्यांनी या पाच बदल्यांना स्थगिती दिली आहे. शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसेच बदलीच्या आदेशाला स्थगिती दिलेले पाचही पोलीस अधिकारी ठाणे जिल्ह्याशी संबंधित आहेत.
राज्यातील ३९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या काल, बुधवारी झाल्या होत्या. मात्र या बदल्यांवरून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती दिली आहे. त्यामध्ये महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाला स्थगिती मिळाली आहे.