शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (15:40 IST)

नाशकात दिवसभर गारठ्याने हुडहुडी! राज्यातील निच्चाकी तपमानाची नोंद; पारा किती अंशांवर?

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा कमालीचा घसरला असून नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. राज्यात निफाड तालुक्यातील ओझर सर्वात थंड ठरले असून याठिकाणी ५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्याचे तापमान घसरत होत असल्याने द्राक्ष उत्पादकही धास्तावले आहेत.
 
महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पडल्याची दिसते. परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज ५ .७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ही नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं हे निचांकी तापमान आहे. तर निफाड तालुक्याचे आजचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दरम्यान नाशिक जिल्ह्याचा पारा १० अंश दरम्यान स्थिरावला आहे.
 
गेल्या आठवड्यात थंडीने जोर धरला. वातावरणातील गारवा वाढला आहे. नाशिककर थंडीचा अनुभव घेत आहेत. दरवर्षी दिवाळीत थंडी सुरु होत असली तरी यावेळी मात्र नोव्हेंबरचा तिसरा आठवडा उजाडल्यानंतर थंडीचे आगमन झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे शनिवारी सकाळी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.निफाडला सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. याठिकाणी तापमानाचा पारा ८.१ अंश सेल्सिअसपर्यँत खाली घसरला होता.
 
सोमवारी पारा दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता.सायंकाळी सहानंतर तर यात आणखीच वाढ झाली.सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाल्याने नाशिकरांना हुडहुडी भरली आहे. आल्हाददायी हवामानाचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी अशा उबदार कपड्यांचा आधार घेतला जात आहे. तर गोदाकाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

दुसरीकडे वाढत्या थंडीचा परिणाम बाजारपेठांवरही दिसून येत आहे.सहानंतर बाहेर रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असून बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून येत आहे. निफाड तालुक्यात वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. बागांमध्ये शेकोट्या करून उब निर्माण केली जात आहे. तापमानाचा पारा घसरतच राहिल्यास द्राक्षाला फटका बसू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor