शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (15:42 IST)

मुख्यमंत्र्यांनी संपुर्ण महाड क्षेत्राचा दौरा करत दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट दिली

तळीये गावात बचाव आणि मदतकार्यासाठी आर्मी, नौदल, एअऱफोर्स अशा सगळ्या यंत्रणांची मदत आपण महाडच्या तळीये गावासाठी घेतली आहे.पण संपुर्ण गावावर आलेले संकटच अतिशय अवघड होते, आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि करतोय. पण तुमच्यावर स्वतःचे कुटूंबीय गमावल्याने आलेली परिस्थिती खरच अवघड आहे, तुम्ही स्वतःला सावरा, इतर गोष्टींची चिंता करू नका, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा असा दिलासा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये ग्रामस्थांना दिला.सर्व गावकऱ्यांचे सुरक्षित पुर्नवसन करण्यात येईल. तसेच कोणत्याही कागदपत्रांचा विचार करू नका, सरकार सर्व गोष्टींसाठी तुमच्या पाठीशी आहे.या सगळ्या गोष्टी सरकारवर सोडा असेही आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. मुख्यमंत्र्यांनी संपुर्ण महाड क्षेत्राचा दौरा करत दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट दिली.
 
संपुर्ण महाराष्ट्रामध्ये डोंगराळ भागात जी गावे आहेत, अशा गावांचे पुनर्वसन करण्याची आता वेळ आली आहे. त्यासाठीचा मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्याच पार्श्वभूमीवरच आता असा मोठा निर्णय घेऊन अशा सगळ्या गावांचे पुर्नवसन करण्याची वेळ आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार यासाठीचा निर्णय लवकरच घेईल असेही त्यांनी सांगितले.
 
यावेळी मृतांच्या आणि बेपत्ता नातेवाईकांनीही आपली कैफीयत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.आमचे नातलग, कुटूंबातील व्यक्ती आम्हाला अजुनही सापडलेल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला या कठीण प्रसंगातून मदत मिळावी अशीही मागणी करण्यात आली. त्यावेळी सरकारी पातळीवर सर्वांना योग्य ती मदत देण्यात येईल असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे तसेच जखमींचे सगळी ओळखपत्रे तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचेही यावेळी आश्वासन दिले. डॉक्युमेंटचा विचार करू नका ते सरकारचे काम असेही मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही या कठीण प्रसंगी स्वतःला सावरा बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.