शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (21:28 IST)

AUS vs SL T20 WC: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने उघडले विजयाचे खाते

australia shrilanka
मार्कस स्टॉइनिसच्या झंझावाती अर्धशतकामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने मंगळवारी पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. स्टॉइनिसने 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे हे T20I मध्ये सर्वात जलद अर्धशतक आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकातील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. भारताचा युवराज सिंग अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. युवराजने 2007 टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध डरबनमध्ये 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. स्टॉइनिसने 327.78 च्या स्ट्राइक रेटने श्रीलंका लायन्सची चांगलीच धुलाई केली.
 
 स्टॉइनिसने 18 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकेला 6 बाद 157 धावांवर रोखले आणि त्यानंतर 16.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. या स्पर्धेतील कांगारूंचा हा पहिलाच विजय असून आता ऑस्ट्रेलियाचेही गुणतालिकेत 2 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. सुपर-12 च्या ग्रुप 1 मधील दोन सामन्यांमधला श्रीलंकेचा हा पहिला पराभव आहे. ऑस्ट्रेलियाला आपला पुढचा सामना शुक्रवारी मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे.
 
 स्टॉइनिसशिवाय ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार अॅरॉन फिंचने 42 चेंडूत नाबाद 31 आणि मिचेल मार्शने 17 तर डेव्हिड वॉर्नरने 11 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचा मुख्य गोलंदाज वानिंदू हसरंगाला आज चांगलाच फटका बसला. त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा स्पेल संपवला. हसरंगाने 3 षटकात एकही विकेट न घेता 53 धावा दिल्या. धनंजय डिसिल्वा, महेश टीक्षाना आणि चमिका करुणारत्ने यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
 
 तत्पूर्वी, पथुम निसांका आणि असलंका यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 6 बाद 157 धावांचे आव्हानात्मक धावसंख्या उभारली. श्रीलंकेचे फलंदाज सुरुवातीच्या षटकांत धावा काढण्यासाठी धडपडत होते पण अखेरच्या दोन षटकांत ३१ धावा जोडून संघाने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. असलंकाने 25 चेंडूत नाबाद 3 चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यांना चमिका करुणारत्ने (सात चेंडूत नाबाद 14) यांची चांगली साथ लाभली आणि दोघांनी शेवटच्या 15 चेंडूंमध्ये सातव्या विकेटसाठी 37 धावांची अखंड भागीदारी केली.
Edited by : Smita Joshi