मुंबईकरांसाठी साई दर्शन होणार अधिक सोपे
मुंबईहून शिर्डीला जाणार्या साईभक्तांसाठी मध्य रेल्वेने या मार्गावर लवकरच ‘ट्रेन 18’अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. 291 किलोमिटरचे अंतर अवघ्या तीन तासांत पूर्ण करुन शिर्डीला पोहोचणारी ही एक्सप्रेस आहे. सद्या या मार्गावर धावत असलेल्या रेल्वेला हे अंतर पूर्ण करण्यासाठी तब्बल नऊ तास लागतात. त्यामुळे या गाडीला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. मात्र खाजगी वाहनाने अवघ्या तीन तासांत शिर्डीत पोहोचता येते. तर बसने हेच अंतर सहा ते सात तासांचे आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर नव्या स्वरुपातील ट्रेन 18 साठी मुंबई ते शिर्डी हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
‘ट्रेन 18’मुंबईतून सकाळी शिर्डीसाठी रवाना होईल. तीन तासांत शिर्डीला पोहोचल्यावर ती त्याच दिवशी संध्याकाळी शिर्डीहून मुंबईसाठी रवाना होईल. ‘ट्रेन 18’मुळे एका दिवसात साई दर्शन करुन मुंबईला परत येणे शक्य होणार आहे. त्यामुळे या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास रेल्वे अधिकार्यांना आहे.