गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (09:19 IST)

पवित्र हज यात्रा

- अजीज अन्सारी 
 सच्च्या मुसलमानाने रोजे ठेवणे, पाच वेळा नमाज पढणे, जकात देणे (दानधर्म करणे) आणि आयुष्यात कधीही एकदा तरी हज यात्रा करणे आवश्यक आहे.
 
या यात्रेची सुरवात हिजराच्या नवव्या शतकात झाली. प्रेषित पैगंबरांनी आपल्या तीनशे शिष्यांना या यात्रेसाठी पाठविले. त्यानंतर लगेचच दुसऱया वर्षी प्रेषित पैगंबर यांनी आपण स्वतः या यात्रेला जाणार असल्याचे जाहीर केले.
 
ही यात्रा त्यांनी पूर्ण करून वेगवेगळे विधी कसे करावेत याचा दंडक घालून दिला. ही यात्रा इतिहासात हजतूल विदा या नावाने प्रसिद्ध आहे. प्रेषितांच्या आयुष्यातील ही शेवटची यात्रा होती. त्यानंतर प्रेषित पैगंबरांना तत्पूर्वी बावीस वर्षांपासून मिळत असलेले दैवी संदेश बंद झाले.
 
जिलहजच्या महिन्यात दहा तारखेला हजचा फरीदा अदा केला जातो. जगभरातील मुसलमान या दिवसापूर्वीच सौदी अरेबियातील मक्का येथे पोहोचलेले असतात. मक्केच्या आधीच काही मैलांवर त्यांना थांबविण्यात येते. या भागाला मिक्रात असे म्हणतात. त्यावेळी सर्व हाजी (हजसाठी आलेले) एहराम बांधून ही सीमा ओलांडतात. एहराम म्हणजे न शिवलेल्या दोन सफेद चादरींचा पेहराव असतो. एक चादर कमरेच्या खाली व दुसरी कमरेच्या वर परिधान केली जाते.
 
मिक्रातची सीमा सुरू होते, तेव्हाच बरेच हाजी विमानात असतात. म्हणूनच अनेक जण विमानातच एहराम बांधतात. एहराम बांधल्यानंतर अनेक निर्बंध घालून घ्यावे लागतात. केस कापता येत नाहीत. कोणत्याही जीवाची हत्या करता येत नाही इत्यादी.
 
एहरामनंतर हजमधील सर्वांत आवश्यक विधी असतो तो तवाफ. काबाला सात प्रदक्षिणा मारल्यानंतर एक तवाफ होतो. आपल्या आरोग्य व तब्बेतीनुसार लोक तवाफ करतात.
 
काबा म्हणजे एक चौकानी आकाराच्या खोलीसारखे आहे. त्यावर नेहमी काळ्या रंगाचे कपडे असल्यासारखे असते. त्याच्या एका कोपऱ्यात एक संगमरवर (संगे अवसद) ठेवला आहे. तो जन्नत म्हणजे स्वर्गातून आलेला हा दगड असल्याचे सांगितले जाते. तवाफची सुरवात व सांगताही येथेच होते.
 
तवाफनंतर हजचा आणखी एक विधी केला जातो. त्याला सई असे म्हणतात. सफा व मरवाह या येथून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या दोन टेकड्या आहेत. या दोन टेकड्यांमधून चालणे किंवा धावणे यालाच सई असे म्हणतात. याचा संबंध हजरत इब्राहिम व त्यांच्या कुटुंबाशी आहे. आपला अतिशय लहान म्हणजे दुधावर अवलंबून असणाला मुलगा हजरत इस्माईल, पत्नी हाजरा या दोघांना इब्राहिम यांनी या वाळवंटात एकटे सोडून दिले होते. मुलगा पाण्यावाचून तडफडत होता. त्याची आई हाजरा सारखी सफा व मरवाह या दोन टेकड्यांवर जाऊन कोणी दिसते का, त्याच्याकडून आपल्या तडफडणाऱ्या मुलासाठी पाणी मिळू शकते का हे पहात होती. असे म्हणतात, की हजरत इस्माईल जेथे आपली टाच घासत होते, तेथेच पाण्याचा एक झरा निघाला. तेव्हापासून तेथे लागलेले पाणी अद्याप आटलेले नाही. त्याला आता आब-ए-जमजम असे म्हणतात. सर्व हाजी या पाण्याला अतिशय पवित्र मानून पितात. हे पाणी औषधी आणि पवित्र दोन्ही आहे. म्हणूनच हाजी हे पाणी जास्ती जास्त पिण्याचा प्रयत्न करतात. परत येताना बाटल्यांत, भांड्यात भरून हे पाणी आणले जाते. आपल्या नातेवाईकांना दिले जाते.
 
हजसाठी कुर्बानी करणे हे प्रत्येक हाजीचे कर्तव्य आहे. मक्कामध्ये काही जमाती हाजींसाठी हे काम करण्यास तयार होतात. काही पैसे घेऊन ते लोकच कुर्बानी देतात. अर्थात हाजी स्वतःसुद्धा हे करू शकतो. जे लोक हजला जाऊ शकत नाहीत, ते त्यांच्या घरी कुर्बानी देतात.
 
हजमध्ये आणखी एक महत्त्वाचा विधी आहे, तो म्हणजे सैतानाला दगड मारणे. मीना व मुजदल्फाहून परतल्यानंतर हाजी दगड घेऊन येतात. जेथे सैतानाचे स्थान आहे, त्याला तो दगड ते फेकून मारतात. यालाच सैतानाला दगड मारणे असे म्हणतात. हजच्या निमित्ताने तीस ते पस्तीस लाख लोक काबामध्ये येतात. जे विधी येथे सांगितले गेले, तेथे प्रचंड गर्दी होते. म्हणूनच कधी कधी दुर्घटनाही घडतात. त्यामुळेच हाजींनी अतिशय सावधगिरी बाळगून सुरक्षित राहून सर्व विधी पार पाडले पाहिजेत. तेथील सरकार हाजींसाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते. पण तरीही वृद्धांची व महिलांची विशेष काळजी घेतली पाहिजे.