गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (11:38 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय सतरावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ जयजयाजी रघुराया ॥ अनाथ नाथाप्राणसखया ॥ दुर्धर हे तुझी माया ॥ निवारीं भयापासुनी ॥ १ ॥
मी तव अत्यंत दीन ॥ पदरीं नसे कांहीं धन ॥ जेणें घडे दान पुण्य ॥ हें तो न घडे जाण सर्वथा ॥ २ ॥
परी विश्वास बैसला एके ठायीं ॥ नामाविण सार्थक नसे कांहीं ॥ म्हणोन भलत्या प्रकारें पाहीं ॥ नाम ह्रदयीं वसों दे ॥ ३ ॥
सकृदुच्चरितं येन हरिरित्यक्षरद्वयं ॥ बद्धः परिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति ॥ १ ॥
यालागीं नाही हेत धरिला ॥ दुसराही वाक्य आधार ऐकिला ॥ नारदाप्रति अनुवादला ॥ स्वयें जनार्दनरूपें ॥ ४ ॥
नाहं वसामि वैकुंठे योगिनां ह्रदयेरवौ ॥ मद्भक्‍ता यत्र गायंति तत्र तिष्ठामि नारद ॥ २ ॥
ऐसिया व्यासवचनें ॥ विश्वास धरिला जीवप्राणें ॥ कथा कुशळता कांहीं नेणें ॥ आणीक नेणे साधन ॥ ५ ॥
आतां कळें तैसें करीं ॥ तारीं अथवा मारीं ॥ उचित येईल तें करीं ॥ अयोध्यापुरवासिया ॥ ६ ॥
ऐका श्रोतेहो सादर ॥ मलमाहात्माचा विस्तार ॥ कथाभाग अपूर्व फार ॥ लक्ष्मीनारायण संवाद ॥ ७ ॥
श्रीभगवानुवाच ॥ श्रृणुदेवि प्रवक्ष्यामि कथामाश्चर्यकारिणीं ॥ मलिम्लुचस्य मासस्य क्रुतस्नानत्रयस्यच ॥ ३ ॥
लक्ष्मीतें वेद जनार्दन ॥ मलमासी करितां स्नान ॥ परि दिनत्रय करितां जाण ॥ तेंही महिमान अवधारा ॥ ८ ॥
जयातें शक्ति नाहीं शरीरीं ॥ स्नान करितां एकमास वरी ॥ तयानें त्रिरात्र बरविया परी ॥ स्नानविधि सारिजे ॥ ९ ॥
तरी येविषयींचा इतिहास ॥ अवधारी जे सावकाश ॥ श्रवणकरितां विशेष ॥ साधे यश तयातें ॥ १० ॥
पूर्वी दक्षिणदिशे पवित्र ॥ प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र ॥ गंगाप्रवाह विचित्र ॥ ब्राह्मणवर्णी सुपात्र पैं ॥ ११ ॥
ब्रह्मवृंदांचा समुदावो ॥ ठायीं ठायीं वेदघोष पाहाहो ॥ चारीवर्ण स्वधर्म पाहा हो ॥ यथाचारें वर्तती ॥ १२ ॥
षट्‍कर्मिरत ब्राह्मण ॥ अध्ययन अध्यापन ॥ समयीं अतिथि आलिया जाण ॥ देती भोजन यथासुखें ॥ १३ ॥
श्रुतिस्मृति पुराणें ॥ घरोघरीं हरिकीर्तनें ॥ वेदघोष पारायणें ॥ सदांसर्वदा सारखीं ॥ १४ ॥
तंव तया नगरीं एक ब्राह्मण ॥ धर्मशर्मा नामाभिधान ॥ सदाचारें सुखसंपन्न ॥ सर्वज्ञ दयाळु तो ॥ १५ ॥
तयाची स्त्री परम पतिव्रता ॥ काशीनामें साध्वी विख्याता ॥ एकोमय वर्तती उभयतां ॥ वृद्ध अवस्था दोघातें ॥ १६ ॥
पोटीं संतान नसे कांहीं ॥ परी विद्याबळें मान्यता होई ॥ विशेष भाव सर्वाठायीं ॥ पूजासनीं श्रेष्ठता ॥ १७ ॥
उभयतां समान वयस ॥ तव पातलिया मळमास ॥ गौतमी तटी स्नानास ॥ नारी नर समस्त जाताती ॥ १८ ॥
ऐसें वर्ततां ते अवसरीं ॥ विप्रस्त्रियेनें देखिलें नेत्रीं ॥ मनामाजी विचार करी ॥ म्हणे कवण परी करावी ॥ १९ ॥
जन जाताती स्नानासी ॥ आचरताती पुण्याचरणासी ॥ शक्ति नाहीं माझिया शरिरासी ॥ कवण उपायासी करूं आता ॥ २० ॥
ऐसी चिंता करितां ह्रदयात ॥ तंव पति पातला गृहांत ॥ येरी पुसतसें वृत्तांत ॥ खेदयुक्त आजि कांहीं ॥ २१ ॥
येरू म्हणे स्वामीराजा ॥ वृथा जन्म हा पैं माझा ॥ नेमधर्म तपवोजा ॥ अधोक्षजा नेंणें मी ॥ २२ ॥
मलमास तो पुण्यागळा ॥ स्नानातें जाती विप्रमेळा ॥ स्त्री बाळ वृद्ध सकळां ॥ करिती सोहळा उपचारें ॥ २३ ॥
ते देखो न माझे जीवीं ॥ चिंता वाटतसे ह्रदयीं ॥ परी शरीरीं शक्ति नाहीं ॥ यालागीं पाहीं उद्विग्न मी ॥ २४ ॥
ऐकूनि स्त्रियेचें उत्तर ॥ कृपेनें द्रवलें विप्रअंतर ॥ काय बोले प्रत्युत्तर ॥ तें साचार परिसीजे ॥ २५ ॥
धन्य ते उभयतां पवित्र ॥ तयाचें दर्शने ॥ पवित्र गाव नाहींतरी चित्रविचित्र ॥ स्त्री पुरुष चरित्र अवधारा ॥ २६ ॥
स्त्रिया आचरती नेमधर्म ॥ भ्रतार क्षुधेनें तळमळे परम ॥ तयावरी क्रोधयुक्त अधम ॥ बोले काय कामिनीतें ॥ २७ ॥
म्हणे तुम्हांतें स्नान नाहीं संध्या नाहीं ॥ पाकसिद्धी जाली कीं नाहीं ॥ या विरहित आणीक कांहीं ॥ दूजा नाहीं व्यापार ॥ २८ ॥
स्वयें पुण्य करवेना ॥ दूजियाचें देखों शकेना ॥ आतां क्षणभरी निवांत बैसा ना ॥ मी येत्यें पुराणाहूनी ॥ २९ ॥
तंवतरी निद्रा करा स्वस्थ ॥ लवकरी जेवितां देह पोसत ॥ शेवटी मसणवटी होय प्राप्त ॥ ऐसें ज्ञान सांगत भ्रतारा ॥ ३० ॥
भ्रतारें बोधावें स्त्रियेसीं ॥ शास्त्ररीती आहे ऐसी ॥ सांप्रत स्त्रीधर्मासीं ॥ न भूतो भविष्यति ॥ ३१ ॥
असो ऐसी नव्हे विप्र ललना ॥ नुलंघी कधीं पतिवचना ॥ धन्य ते पतिव्रता अंगना ॥ विप्रराणा संतोषे ॥ ३२ ॥
मग स्त्रियेतें बोले उत्तर ॥ उभयतां जराभूत शरीर ॥ चालतां न ठाके गंगातीर ॥ तरी एक विचार अवधारीं ॥ ३३ ॥
संपूर्ण मासवरी करितां स्नान ॥ शरीरीं अवकाश न दिसे जाण ॥ तरीं त्रिरात्री व्रत संपूर्ण ॥ करूं आपण उभयतां ॥ ३४ ॥
ऐसा विचार करूनियां ॥ त्रिरात्र जाती तटाकिया ॥ एकमेकाचा हस्त धरूनियां ॥ जाती लवहाह्या स्नानातें ॥ ३५ ॥
उष:कालीं करूनियां स्नान सारूनियां तीळतर्पण ॥ स्वगृहीं येती परतून ॥ देती दान द्विजातें ॥ ३६ ॥
शक्तिनुसार अपूप अन्न ॥ ते कांस्यपात्रीं निक्षेपून ॥ घृतासहित किंचित सुवर्ण ॥ देती दान सत्पात्रीं ॥ ३७ ॥
मग पाकसिद्धी करून ॥ स्वपंक्तीसीं-विप्र पाचारून ॥ यथारूचीं करीती भोजन ॥ आनंद मना उभयतांच्या ॥ ३८ ॥
ऐसे लोटले दोन दिवस ॥ तिसरें दिनीं चालिले गंगेस ॥ तंव अपूर्व वर्तलें त्या समयास ॥ सावकाश अवधारा ॥ ३९ ॥
एक याम उरली रजनी ॥ उभयतांचे निजध्यास असे मनीं ॥ म्हणोन अपरात्रीच उठोनी ॥ स्नानालागुनी चालिले ॥ ४० ॥
स्नानार्थं सर्वं सभारान् गृहीत्वा गौतमीप्रति ॥ गमनं कृत्वामागत्यमार्गे कश्चित् क्षुधाकुल: ॥ ४ ॥
तंव एकाएकीं समोर ॥ पिशाच उभा राहिला थोर ॥ लंबोदर दीर्घ शरीर ॥ क्षुधातुर उभा ठेला ॥ ४१ ॥
मस्तकीं केश विखुरले ॥ ते धूम्राकार आरक्त डोळे ॥ नखाचे गुंडाळे वळले ॥ जिव्हां आवाळें चाटित ॥ ४२ ॥
दंत विशाळ दीर्घ थोर ॥ केवळ अस्थींचा पंजर ॥ उभा ठेला नग्न दिगंबर ॥ देखून विप्र कांपतसे ॥ ४३ ॥
विप्र ललना भयभीत ॥ केउते उदलें अरिष्ट अद्‌भुत ॥ पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त ॥ अकस्मात उदेलें ॥ ४४ ॥
नेणों कर्माचें विंदान ॥ आम्हां पुण्य घडेल कोठून ॥ स्नानातें आजी तिसरा दिन ॥ निवारीं विघ्न केशवा ॥ ४५ ॥
तंव तो पिशाच वृक्षातें ॥ आळेपिळे असे घेत ॥ नयनीं देखून उभयातें ॥ धांवून येत सन्निध ॥ ४६ ॥
तद्‌दृष्ट्‍वा विकृतिं भूतं धर्मशर्मा द्विजोत्तमः ॥ उवाच वचनं सूक्ष्मं कोऽसित्वं भीमदर्शनः ॥ ५ ॥
विप्रें धैर्य धरून मनीं ॥ बोलता झाला तेच क्षणीं ॥ म्हणे तूं तव कोण या स्थानीं ॥ आलासि कोठूनीं सांगपां ॥ ४७ ॥
ऐकून विप्राचें उत्तर ॥ येरें घातला नमस्कार ॥ पूर्वस्मरण जालें साचार ॥ बोले उत्तर ब्राह्मणातें ॥ ४८ ॥
ऐक भूदेवा वहिलें ॥ तव दर्शनं पावन झालें ॥ करद्वय जोडून वहिलें ॥ विप्रालागीं तेधवा ॥ ४९ ॥
पिशाच जोडितां कर ॥ विप्र भीतीनें गेला दूर ॥ कांपतसे थरथर ॥ झाला स्थीर ते काळीं ॥ ५० ॥
मग तो पिशाच बोलें वचन ॥ मी पावन जालों तव दर्शन ॥ पूर्व स्मरण आठवलें जाण ॥ ऐकें कथन भूदेवा ॥ ५१ ॥
पूर्वी मी धनवंत सावकार ॥ सकळ वस्तूंचा रक्षणार ॥ माझियां धनासीं नाहीं पार ॥ सौख्य अपार भोगी मीं ॥ ५२ ॥
दासदासी स्वगृहीं ॥ गोमहिषी खिल्लारें पाहीं ॥ पुत्र कन्या स्नुषा सर्वही ॥ मिती नाहीं भाग्यातें ॥ ५३ ॥
परी स्वप्नींही नेणें धर्मदान ॥ मग कैचें पुराणश्रवण ॥ नेणें कधीं हरिकीर्तन ॥ नाही दर्शन संताचें ॥ ५४ ॥
सदां सर्वदां चित्त द्रव्यावरी ॥ विप्र भोजन न घडे तिळभरी ॥ तंव पातली महामारी ॥ जालों शरीरीं हतकाया ॥ ५५ ॥
यमदूतीं नेला मारित ॥ कुंभपाकादी जाचणी तेथ ॥ मज भोगविली अमित ॥ ते न सांगवत माझेनी ॥ ५६ ॥
यमजाचणी अपार ॥ सांगतां उलों पाहे अंतर ॥ शब्द न फुटे बाहेर ॥ बोलता उत्तर तुम्हांसीं ॥ ५७ ॥
ऐसें दुःख बहुत ॥ मज भोगविती यमदूत ॥ मग मज ढकलून देत ॥ चांडाळ योनींत जन्मलों ॥ ५८ ॥
तिसरे जन्मीं भिल्ल जालों ॥ चौरकर्म करूं लागलों ॥ वाट पाडूं लागलों ॥ मारूं लागलों प्राणियां ॥ ५९ ॥
जीवमात्राचा करीं घात ॥ पुराणिकातें जिवें मारित ॥ साधुसंताते द्वेषित ॥ नाहीं भीत पापातें ॥ ६० ॥
परद्वारातें मिती नाहीं ॥ ऐसें पाप वर्तलों देहीं ॥ तंव भगेंद्रें लिंग पाहीं ॥ पतन जालें शरीर ॥ ६१ ॥
मग लागला क्षयरोग ॥ मृत्यु पावलों सवेग ॥ तंव यमलोकींचा संग ॥ सांगता भोग उदेला ॥ ६२ ॥
माझें पाप अति दुस्तर ॥ जाणूनियां यमकिंकर ॥ असिपत्र नरक अघोर ॥ भोगविले फार मजलागीं ॥ ६३ ॥
ऐसे तीस सहस्र वर्षेवरी ॥ क्लेश भोगविले शरीरीं ॥ मग पिशाच योनि निर्धारी ॥ प्राप्त जाली मजलागीं ॥ ६४ ॥
निवेदिलासे समस्त ॥ परि तव दर्शनें करुनि मुक्त ॥ होईन ऐसें वाटतें ॥ ६५ ॥
ऐसा माझा पूर्ववृत्तांत ॥ निवेदिलासे समस्त ॥ परी तव दर्शनें करूनि मुक्त ॥ होईन ऐसें वाटतें ॥ ६५ ॥
तरी ब्राह्मण ह्रदय कोमळ ॥ करी परोपकार अढळ ॥ जेणें निरसे पिशाचमळ ॥ होई दयाळ महाराजा ॥ ६६ ॥
परउपकारी द्विजवर्या ॥ आचरसी सद्‍वृत्ती सक्रिया ॥ तरीं मातें उपकार करूनियां ॥ निवारींया भयापासुनी ॥ ६७ ॥
ऐसी ग्लानी करून ते काळीं ॥ बोलतसे करुणा मेळीं ॥ विप्र द्रवला ह्रदयकमळीं ॥ अभयवाणीं बोलत ॥ ६८ ॥
म्हणे तो अकिंचन ब्राह्मण गांठीस नाही कांहीं धन ॥ जेणें करितां घडे धर्मदान ॥ तेंही साधन नेणें मी ॥ ६९ ॥
परी मळमास असे प्रस्तुत ॥ त्रिरात्री स्नानातें असे जात ॥ तयामाजी दोन दिवस जाले सतत ॥ उर्वरित दिन एक पैं ॥ ७० ॥
तरीं आम्ही स्नान करून मागुती येतां ॥ तोंवरी तूं स्थिर राहें आतां ॥ पुढें विचार सुचेल तत्वतां ॥ तोची व्यथा परिहारी ॥ ७१ ॥
ऐसा वदोनी प्रश्न तयासी ॥ उभयतां गेले स्नानासी ॥ येरू बैसला मार्गासी ॥ केधवां येती म्हणोनी ॥ ७२ ॥
जळो ही दुराशा पापीण ॥ इणें नाडिलें समग्रजन॥ न सोडी कवणा लागून ॥ दुरत्यय जाणे आशा हे ॥ ७३ ॥
तापसी होकां संन्यासी ॥ भूत अथवा पिशाचासी ॥ रंक हो कां रायासी ॥ आशा कवणासी सुटेना ॥ ७४ ॥
जेणें आशेचा त्याग केला ॥ तोचि जाणावा मुक्त जाला ॥ येर तो जगत्रय भला ॥ सर्वही गोंविला आशेनें ॥ ७५ ॥
असो तो पिशाच आशाबद्ध ॥ मार्ग लक्षीतसे सुबद्ध ॥ तों येरीकडे गंगाजळीं ब्रह्मवृंद ॥ स्नानें करिती अद्यमर्षणीं ॥ ७६ ॥
सारूनियां नित्य कर्म ॥ मागे परतला विप्रोत्तम ॥ तंव मार्गी तो अधम ॥ वाट पाहत बैसला ॥ ७७ ॥
केधवां येईल म्हणोनी ॥ आशाबद्ध निज मनीं ॥ मार्ग लक्षीत बैसला ध्यानीं ॥ जेवीं कामिनी जारातें ॥ ७८ ॥
कीं दाता लक्षीतसे याचक ॥ अन्नार्थी लक्षी अन्नोदक ॥ तृषार्थी लक्षी गंगोदक ॥ तेवीं देख पिशाचतो ॥ ७९ ॥
विप्रातें देखून नयनीं ॥ नमस्कार घातला धरणी ॥ म्हणे दयावंता मोक्षदानी ॥ दावी करणी आपुली पैं ॥ ८० ॥
करुणा शब्द ऐकून कानीं ॥ विप्र द्रवला अंतःकरणीं ॥ मग तयातें आश्वासुनी ॥ उदक करी घेतलेसें ॥ ८१ ॥
म्हणे महापुरुषा ऐक वचन ॥ त्रिरात्री स्नानाचें जे पुण्य ॥ तें तुज म्यां केलेंसे अर्पण ॥ होऊं उद्धरण पैं तुझें ॥ ८२ ॥
ऐसें वचन बोलुनी ॥ उदक घातलें ते चरणीं ॥ तंव नवल वर्तलें तें सज्जनीं ॥ सावधमनी परिसावें ॥ ८३ ॥
पूर्ण दयाळु दीननाथ ॥ दासाचें उणें पडो नेदी किंचित ॥ आपुली ब्रीदावळी सांभाळीत ॥ महिमा वाढवीत भक्ताचा ॥ ८४ ॥
मग स्वर्गीहूनी विमान ॥ उतरतें जालें तेच क्षण ॥ चतुर्भुज विष्णुगुण ॥ समान तेजस्वी ॥ ८५ ॥
परम रमणीय लखलखीत ॥ माजी घंटा घणघणित ॥ ऐसें विमान अकस्मात ॥ नयनीं देखत विप्र तो कां ॥ ८६ ॥
दिव्यदेही करून पिशाच तें ॥ विमानीं वाहिलें तयातें ॥ तंव तो स्तुतिवाद गर्जत ॥ भावें नमीत भूदेवा ॥ ८७ ॥
म्हणे करुणाकरा विप्रवर्या ॥ कृपासागरा परम उपकारिया ॥ वेंचून आपली पुण्यक्रिया ॥ केला मज पापिया उद्धार ॥ ८८ ॥
धन्य ते परोपकारी जन ॥ परकाजीं वेंचिती प्राण ॥ तयावरी संतुष्टे जनार्दन ॥ न लागे आन साधन पैं ॥ ८९ ॥
असो ऐसा पिशाच उद्धरिला ॥ तीन जन्मातें मुक्त जाला ॥ तीन स्नानानें पुण्यागळा ॥ तात्काळ पावला मोक्षातें ॥ ९० ॥
ऐसा प्रत्यय देखून मनीं ॥ पुनः नेम धरिला ब्राह्मणीं ॥ उभयतां गेलें उद्धरोनी ॥ ते वैकुंठ भुवनीं वास्तव्य ॥ ९१ ॥
हें महात्म स्नानाचें ॥ सांगितलें तीन दिवसांचें ॥ अगणित पुण्य एक मासाचें ॥ महिमान स्नानाचें आगळें ॥ ९२ ॥
ऐसा कथाभाग समग्र ॥ लक्ष्मीतें वदे शारंगधर ॥ तोची प्राकृतभाषे सविस्तर ॥ केला उद्धार श्रोतियांचा ॥ ९३ ॥
म्हणोनी भावार्थ धरोनी ॥ व्रत आचरावें सज्जनीं ॥ अमान्य न माना कोणी ॥ व्यासवाणी सत्य हे ॥ ९४ ॥
मी तंव संतांचा पाईक ॥ चातुर्य कळा नसे ठाऊक ॥ परी तेथें वदविता एक ॥ रघुनायक दाशरथी ॥ ९५ ॥
श्रोतियांवक्तियांचे अंतरीं ॥ तोचि व्यापक सर्वांतरी ॥ म्हणोनी प्रार्थनेची वैखरी ॥ कुंठित निर्धारी जालीसे ॥ ९६ ॥
इति श्रीअधिक माहात्म्य ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ सप्तदशोऽध्याय समाप्तः ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्याची संख्या ॥ ९६ ॥ श्लोक ५ ॥
 
॥ इति सप्तदशोध्यायः ॥