शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2016 (14:19 IST)

ध्येयवादी डॉ. बाबासाहेब

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे आपल्या समाजबांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सवर्णाच्या जुलमांविरुध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर, विषमतेवर, धर्ममार्तडांच्या वर्चस्वावर, समाजातील वतनदार सत्ताधार्‍यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन-दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला . गलितगात्र झालेल्या मनामनातून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. समतेवर आधारित समाजरचना घडावी असे त्यांचे ध्येय होते .
 
शैक्षणिक ध्येय :
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश समाजाला सत्त्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिला तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे ते समाजबांधवाना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे ते सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की मुलगी किंवा मुलगा एकदा शाळेत दाखल झाले की ते परिपूर्ण सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष दय़ायला हवे. डॉ. बाबासाहेबांचे म्हणणे होते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्टय़ा सशक्त होतो . व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील ङ्खरक समजायला लागतो . प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंकृत व गुणवत्तामय बनवावीत. 
 
समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे. शला म्हणजे उत्तम नागरिक बनविणारे आहेत याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. 1946 साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले.