सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (16:06 IST)

अदार पुनावाला: वेगाचा चाहता सर्वांना वेगानं लस पुरवू शकेल का?

मयुरेश कोण्णूर
2020 च्या सप्टेंबर महिन्यात, जेव्हा कोरोनाविरोधातल्या लशीच संशोधन झालं होतं आणि मानवी चाचण्या जगभरात सुरू झाल्या होत्या, तेव्हा आम्ही पुण्याच्या 'सिरम इन्स्टिट्यूट'मध्ये गेलो होतो. 'सिरम'चा ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका सोबत करार झाला होता.
 
भारतासह जगभरात 'कोव्हिशील्ड'चा पुरवठा होणारं 'सिरम' हे सर्वांत मोठं केंद्र असणार हे एव्हाना जगाला समजलं होतं.
 
ज्या दिवशी आम्ही 'सिरम'च्या प्लांटमध्ये होतो, त्याच दिवसापासून 'कोव्हिशिल्ड'चं मास प्रोडक्शन सुरू होणार होतं. अजून जगातल्या कोणत्याही भागातल्या मानवी चाचण्या पूर्ण झाल्या नव्हत्या आणि कोणत्याही देशाच्या सरकारांनी या लशीला परवानगी दिली नव्हती.
पण जगासमोरची आणीबाणी पाहता, परवानगी मिळण्याअगोदरच हे 'अॅट रिस्क' उत्पादन सुरू होत होतं. म्हणजे, चाचण्या निष्फळ ठरल्या, तर हे सगळं उत्पादन पाण्यात. पण या जोखीम घेतल्याशिवाय जगासमोर पर्यायही नव्हता.
 
दिवसभर जिथं 'कोव्हिशिल्ड'चं उत्पादन होणार होतं तो प्लांट पाहिला. लशी तर इथं याअगोदरही बनल्या होत्या, पण आता जे होत होतं ते ऐतिहासिक होतं. ते पाहून झाल्यावर आमच्या सोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटलं, चला, अजून एका ठिकाणी तुम्हाला नेतो. हडपसरच्या कॅम्पसमधून आतल्या आत एक रस्ता 'सिरम'च्या मांजरीच्या परिसरात जातो. रस्ता कसला, मधल्या शेतांवरुन जाणारा फ्लायओव्हरच तो आहे. फक्त 'सिरम'चा खाजगी रस्ता आहे, जो थेट मांजरीच्या परिसरात उतरतो.
स्वतंत्र वाहनानं या परिसरात पोहोचल्यावर अगोदर एक मोठा हेलिपॅड आहे, त्यावर एक हेलिकॉप्टर उभं आहे आणि त्याच्या शेवटाला एक मोठं पँसेंजर विमान दिसतं. छोटं चार्टर्ड विमान नाही तर एअरबस 320 पॅसेंजर विमान. समजत नाही की आता तर आपण 'सिरम'च्या 'वॅक्सिन एसईझेड'मध्ये होतो आणि आता अचानक एअरपोर्टवर कसे आलो? सोबतचे अधिकारी सांगतात, 'ते अदार पूनावालांचं ऑफिस आहे. ते विमान इथं कायमस्वरूपी उभं करण्यात आलं आहे आणि ते अदर पूनावालांच्या कार्यालयात रुपांतरित करण्यात आलंय.'
 
त्याला जोडून असलेली इमारतही हुबेहूब एखाद्या विमानतळावरच्या टर्मिनलसारखीच आहे. विमान टर्मिनलला येऊन थांबलंय. आणि या कार्यालयाला नावसुद्धा दिलंय - 'टर्मिनल वन'. पुनावाला त्या दिवशी पुण्यात नव्हते, म्हणून आम्हाला आत जाता आलं नाही, पण बाहेरुन त्यांची 'स्टाईल' दिसली.
 
'सिरम'च्या परिसरात या दोन्ही जागांवरच्या भेटीत जे दिसलं, ते एका प्रकारे पूनावालांच्या साम्राज्याचं सूत्र आहे. जिथं जगाच्या मोठ्या लोकसंख्येशी संबंध आहे, ज्याला बिझनेसच्या भाषेत 'मार्केट' म्हणता येईल, तिथं जोखीम पत्करुन गुंतवणूक करण्याची दृष्टी आणि त्या गुंतवणूकीतून वाढत गेलेल्या साम्राज्याची दृष्टीत भरणारी भव्यता, लकाकी.
कोरोनाकाळ सुरू झाला आणि पूनावलांच्या 'सिरम'चं नावं सर्वांच्या तोंडी आलं. गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस कधी येणार याची वाट पाहत राहणा-या ग्रामस्थांपासून ते 'जागतिक आरोग्य संघटने'च्या अध्यक्षांपर्यंत. जगातला सर्वांत मोठा लस उत्पादक भारतात आहे आणि तोही पुण्यात, याची बहुतांशांना कल्पना नव्हती.
 
'सिरम' आता जगाची लशीची भूक अशा काळात भागवणार होती ज्या काळात जगाचं अस्तित्व त्या लशीवर टेकलेलं होतं. आधुनिक वैद्यकशास्त्रात सर्वांत वेगवान प्रयत्नांनी, अत्यल्प काळात तयार करण्यात आली. ज्यावेळेस जगभरातले अनेक कोरोना प्रतिबंधक लस प्रकल्प संशोधनाच्या टप्प्यात होती, तेव्हा बहुतांशांचं लक्ष ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाकडे होतं.
 
'सिरम'चा तेव्हा या सुरुवातीच्या टप्प्यातच एस्ट्राझेनेकासोबत करार झाला, तेव्हा भारतानंही एक नि:श्वास टाकला. 'सिरम' केवळ 'कोविशिल्ड' पाशी थांबलं नाही, तर त्यांच्याकडे 'नोव्हावॅक्स'च्या निर्मितीच्या करारासोबत स्वत:च्या अजून दोन कोरोनाप्रतिबंधक लसींची निर्मिती होणार आहे.
 
2021च्या जानेवारीमध्ये भारतातलं लसीकरण सुरू झालं आणि 'सिरम'मधून लशींचे बॉक्सेस घेऊन जाणा-या कंटेनरमध्ये बसलेले अदार पुनावालांचे फोटो सगळ्या माध्यमांमध्ये झळकले.
भारतात 'कोव्हॅक्सिन'च्या सोबतीनं 'कोव्हिशिल्ड' लस द्यायला सुरुवात झाली. 'कोव्हिशिल्ड'चा पसारा मोठा आहे, त्यामुळे भारतात ती सर्वाधिक दिलेली लस आजच्या दिवसापर्यंत तर आहेच, पण जगभरातही तीच सर्वाधिक आहे. 'सिरम'मध्ये तयार झालेले कोव्हिशिल्डचे कोट्यावधी डोसेस भारताबाहेरही गेले.
 
'कोव्हॅक्स' देशांमधल्या करारांमध्ये ठरल्याप्रमाणे तोही पुरवठा सुरू झाला. पण भारतात फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि गणित गडबडलं. भारतातली मागणी वाढली, राज्यांकडून दबाव वाढला, पुरवठा आणि निर्मितीचं व्यस्त प्रमाण समोर आलं, टीकेचे बाण सुटायला लागले.
 
1 मे पासून देशात 18 वर्षांवरच्या सगळ्यांसाठी लसीकरण खुलं झालं आणि परिस्थिती अधिकच गंभीर झाली. केंद्र सरकारकडून होणारा पुरवठा नियमित नाही आहे आणि पुरेसाही नाही आहे. राज्यांची सरकारं पैसे देऊन लस घ्यायला तयार आहेत पण लशीचं तेवढं उत्पादन नाही आहे. 'सिरम'च्या परदेशी जाणा-या लशींची निर्यात थांबवली आहे.
जे देश भारताकडे डोळे लावून बसले होते, करार करुन बसले होते, त्यांना किमान वर्षाखेरीपर्यंत थांबावं लागणार आहे. देशभरातलं लसीकरण कूर्मगतीपेक्षा कमी वेगानं जणू होतं आहे. आणि अशा स्थितीत 'सिरम' आणि 'पूनावाला' पुन्हा एकदा आशेच्या आणि टीकेच्या केंद्रस्थानी आहेत.
 
अदार, त्यांचे वडिल सायरस आणि कुटुंबीय लंडनला निघून गेले आहेत. 'धमक्यांमुळं ते पळून गेले का' अशा वावड्याही उठल्या, पण त्यांनी त्या नाकारल्या आहेत. ब्रिटनमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा त्यांनी केली आहे. जग ज्यांची चर्चा करतं आहे त्या पूनावाला आणि 'सिरम'चं साम्राज्य सुरु कुठून झालं?
 
घोड्यांचे व्यापारी ते लशींच्या व्यापाराची 'दूरदृष्टी'
पुनावालांचं कुटुंब ब्रिटिशांच्या काळात 19 व्या शतकात पुण्यामध्ये आलं असं म्हटलं जातं. अनेक पारसी कुटुंबं ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये त्यांच्यासोबतच प्रशासनात, व्यापारात जवळकीचे संबंध प्रस्थापित करत स्थिर झाली. ज्या भागात ते स्थिर झाले तिथली नावं या कुटुंबांनी घेतली असंही आपल्याला दिसतं.
 
अशाच प्रकारे या कुटुंबाला 'पूनावाला' म्हटलं जाऊन ते ब्रिटिशकाळात 'पुणेकर' झाले. स्वातंत्र्यपूर्वकाळात बांधकाम व्यवसायात या उद्यमी कुटुंबानं जम बसवला होता. पण त्याहीपेक्षा त्यांची ओळख निर्माण झाली आणि आजही आहे ते घोड्यांच्या व्यापारानं, ती सुरुवात केली अदार यांचे आजोबा सोली पुनावालांनी.
 
त्यांनी पूनावाला स्टड फार्म्स सुरू केलं, उत्तम शर्यतींच्या घोड्यांची पैदास सुरू केली आणि लवकरच पुनावालांचं नाव घोड्यांच्या व्यापाराशी जोडलं गेलं. राजे, ब्रिटिश अधिकारी, उद्योगपती असा सगळा 'एलिट' वर्ग घोड्यांच्या शर्यतीशी जोडला गेला होता. त्यामध्ये जम बसवून पुनावालांच्या साम्राज्याची पायाभरणी झाली.
पण 'सिरम'चा प्रवेश होण्यासाठी साठीचं दशक उजाडावं लागलं आणि पिढीही बदलावी लागली. पुनावालांच्या विस्तारलेल्या घोड्यांच्या व्यापाराची सूत्रं जेव्हा सायरस यांच्या हाती आली तेव्हा त्यांची नजर अशा उद्योगाकडे गेली, ज्याकडे अद्याप कोणाचीही गेली नव्हती. त्या उद्योगाच्या भविष्याचीही खात्री त्याकाळात कोणी देऊ शकलं नसतं. पण सायरस यांनी त्यांचे डाव खेळले. तो उद्योग होता लसनिर्मितीचा. लशींचं उत्पादन हे भारतात त्या काळात अत्यंत मर्यादित होतं आणि सरकारी होतं.
मुंबईतली 'हाफकीन' संस्था लसनिर्मिती करायची. इथं सर्पदंशाच्या आणि टिटॅनसच्या लशींच्या निर्मितीसाठी पुनावालांच्या स्टड फार्ममधल्या शर्यतींतून निवृत्त झालेल्या घोड्यांचा उपयोग व्हायचा. कारण त्यासाठी आवश्यक अॅंटिबॉडीज घोड्यांच्या सिरममध्ये, म्हणजे रक्ताच्या द्रव्य भागामध्ये, तयार केल्या जायच्या आणि तिथून त्या घेऊन मोठ्या प्रमाणावर लस निर्मितीसाठी वापरल्या जायच्या. सायरस यांची नजर आपल्याच घोड्यांच्या अशाही वापराकडे गेली आणि 'सिरम'च्या कल्पना त्यांच्या डोक्यात आली.
 
"आम्ही आमचे हे शर्यतीतून बाद झालेले घोडे ब्रीडिंग स्टॉक म्हणून मुंबईच्या हाफकीन इन्स्टिट्यूटला देत होतो. तिथल्या एका डॉक्टरनं मला म्हटलं की तुमच्याकडे घोडे आहेत, जमीन आहे. तुम्हाला फक्त एक प्रोसेसिंग प्लांट उभारावा लागेल जर लसनिर्मितीमध्ये उतरायचं असेल तर," असं सायरस पूनावाला त्यांच्या 'इंडिया टुडे टिव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात.
 
या सल्ल्यामध्ये त्यांना नव्या उद्योगाची संधी दिसली. 1966 मध्ये त्यांनी 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'ची स्थापना केली. तो काळ लशींच्या संशोधनाचा, निर्मितीचा, भारतासहित जगभरातल्या संसर्गजन्य आजारांविरुद्ध मोठ्या सरकारी लसीकरण मोहिमांच्या सुरुवातीचाही होता. लवकरच 'सिरम'नं अनेक आजारांवरच्या लशींची निर्मिती करायला सुरुवात केली.
 
'हाफकीन'मधलेही अनेक संशोधक 'सिरम'कडे आले. गोवर, गालगुंड यांच्यावर प्रभावी ठरणाऱ्या लशींचं 1971 मध्ये संशोधन झालं. देवी आणि पोलिओचं निर्मूलन करण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम सुरू होते. केवळ सरकारी संस्थामधल्या मर्यादित वेगानं उत्पादन होणा-या लशींवर अवलंबून असणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये 'सिरम'नं संधी हुडकली होती. 'सिरम'नं युरोप, अमेरिकेतून नवं तंत्रज्ञान आणलं, उत्पादन वाढवलं, त्यामुळं किमतीही कमी झाल्या.
अर्थात लसीकरणासारखे सामाजिक आरोग्याचे हे कार्यक्रम सरकारी यंत्रणेच्याच हाती आजसारखे तेव्हाही असल्यानं, प्रशासकीय खाचखळग्यांतून वाट काढतच 'सिरम'ला जावं लागलं.
 
"अनेक प्रकारच्या परवानग्या मिळवण्यासाठी महिने आणि वर्षं जातात. पहिलं पंचवीस वर्षं अत्यंत अवघड होती. नंतर आमची आर्थिक स्थितीही सुधारत गेली, आमच्यकडे योग्य माणसं आली जी योग्य शब्दांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करब शकतील, दिल्लीत जाऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या अक्षरश: पायाशी बसून कामं करुन घेतील. मी आजही मुद्दाम हे म्हणतो कारण तशी परिस्थिती आजही आहे. जर या सरकारी अधिकाऱ्यांकडे लक्ष पुरवलं नाही तर परवानग्या आजही अत्यंत धिम्या गतीनं मिळतात. आज इतक्या वर्षांनंतर 'सिरम'कडून गेलेला अर्ज शंकेच्या नजरेतून पाहिला जात नाही," सायरस त्यांच्या मुलाखतीत सांगतात.
 
सायरस यांच्या काळात लसनिर्मितीमध्ये 'सिरम'नं आपली एका प्रकारे मोनोपोली प्रस्थापित केली, जगभरात पुरवठा वाढवला आणि सायरस जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले गेले. केवळ 5 लाख रुपयांच्या भांडवलनं 'सिरम' सुरू केलेले सायरस आज 'फोर्ब्स'च्या यादीनुसार ते जगातले 165व्या क्रमांकावरचे आणि 'फोर्ब्स इंडिया'च्या यादीनुसार ते भारतातले 6 क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
 
अदार यांची एन्ट्री आणि 35 देशांपासून 165 देशांपर्यंत
इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण केलेले अदार पुनावाला 2001 मध्ये 'सिरम'च्या, म्हणजे घरच्याच, उद्योगात उतरले. सेल्स विभागापासून त्यांनी सुरुवात केली आणि 'सिरम'चं आता बदललेलं आणि विस्तारलेलं रूप यांच्यावर त्यांच्या वडिलांपेक्षा अदार यांची छाप आहे. तोपर्यंत मुख्यत्वे भारतात आणि तेही सरकारी बाबूशाहीमध्ये अडकलेलं 'सिरम'चं अस्तित्व त्यांना नको होतं.
 
"ते केवळ अपमानास्पदच नव्हतं, तर त्यातून काही हातीही लागणार नव्हतं. मला तो केवळ मूर्खपणा वाटला," असं अदार 'ब्लूमबर्ग'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात. 2011 मध्ये अदार पूनावाला 'सिरम'चे सीईओ झाले. त्यांनी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं होतं. एक म्हणजे उत्पादन क्षमता वाढवत जाणं आणि अधिकाधिक देशांमध्ये लशींचा पुरवठा 'सिरम'मधून करणं.
 
"विस्ताराचा एक भाग म्हणून 2012 मध्ये 'सिरम'नं हॉलंडच्या एका सरकारी लसनिर्मिती कंपनी आपल्या ताब्यात घेतली. ही उद्दिष्टं कालबद्ध प्रमाणात 'सिरम' करत राहिलं. त्यामुळेच जेव्हा जगाला कोरोना विषाणूचा विळखा पडायला लागला अणि लस तो विळखा सोडवण्याचा मुख्य मार्ग आहे हे निश्चित समजलं, तेव्हा जगाचं लक्ष 'सिरम'कडे गेलं. कारण तोपर्यंत 'सिरम' जगातली दरवर्षी सर्वाधिक लशींचं उत्पादन करणारी फॅसिलिटी बनली होती आणि 2001 पर्यंत 35 देशांना पुरवठा करणारी 'सिरम' आता 165 देशांना विविध लशी पुरवत होती. याच विस्तारावर अवलंबून राहून आदर पूनावाला 'सिरम'ला कोरोना लशीची जगाची बँक करू पाहात होते.
 
या विस्तारात आणि तंत्रज्ञानातल्या गुंतवणुकीमागे आणखी एक कारण आहे ज्याचा पुनावालाही उल्लेख सतत करत असतात, तो म्हणजे हा पूर्णपणे त्यांच्या कुटुंबाचा उद्योग आहे. केवळ त्यांचीच गुंतवणूक आहे. म्हणजे केवळ त्यांचाच पैसा आहे, दुसऱ्या कोणाचा पैसा नाही. खाजगी गुंतवणूकदार पाहून प्रायव्हेट इक्विटी मधून काही पैसा उभारण्याचा पर्याय काही वेळेस 'सिरम' समोर आला, पण ते प्रत्यक्षात झालं नाही. तसं झालं असतं तर पुढच्या एका टप्प्यावर त्यांना पब्लिक लिस्टिंगकडे जावं लागलं असतं आणि आता जशी कोरोना लशीला अंतिम मान्यता मिळण्याअगोदरच पुनावाला मोठी गुंतवणूक करू शकले, तसं कदाचित करता आलं नसतं. ती जोखीम घेता आली नसती.
 
"ती जोखीम आम्ही घेऊ शकलो कारण आम्ही लिस्टेड कंपनी नाहीत. तसं असतं तर आम्हाला गुंतवणूकदारांना, बँकांना, अनेकांना उत्तरं देत बसावं लागलं असतं," असं आदर पूनावाला 'फोर्ब्स इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात.
जसं या लेखाच्या सुरुवातीला म्हटलं, जोखिम आणि भव्यता ही पूनावालांच्या साम्राज्याचं सूत्र आहे असं वाटतं, तसंच कोरोना प्रतिबंधक लशीच्या प्रकल्पाच्या बाबतीतही दिसतं. ज्या लशीची वैद्यकीय उपयुक्तता सिद्ध व्हायची आहे, संशोधन अद्याप सुरू आहे, त्यावेळेच मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 2020 च्या मे महिन्यात एस्ट्राझेनेकसोबत त्यांचं बोलणं झालं आणि 'सिरम' या लसनिर्मितीमध्ये उतरली.
 
उत्पादन सुरू केल्यावर एका टप्प्यावर वर्षाला 100 कोटी डोसेसचं 'सिरम' उत्पादन करेल असं ठरलं. त्यासाठी आवश्यक जागा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, कच्चा माल यांची मोठी गुंतवणूक करावी लागली. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसोबत 'गावी'मध्ये सहभागी होऊन गरीब राष्ट्रांना परवडेल त्या दरानं लस उपलब्ध करुन देण्याचंही ठरलं.
 
आणि या सर्वांसोबत भारतात लसपुरवठा करण्याची जबाबदारीही. अॅस्ट्रोझेन्कासोबत केलेल्या 'कोविशिल्ड'च्या करारासोबत अमेरिका आणि युरोपच्या इतर लशींच्या निर्मितीसाठीही 'सिरम'ने करार केले आणि सोबतच स्वत:च्या स्वतंत्र लशींचं संशोधनही सुरु केलं. 'सिरम'ममधून चार ते पाच कोरोना प्रतिबंधक लशींचं उत्पादन करण्याचा हा प्लान होता. म्हणूनच भारताजवळ 'सिरम' आहे याचा हेवा वाटत असल्याचं इतर देशांच्या नेत्यांनी जाहीर म्हटलंही.
 
लसीकरण सुरू झालं आणि...
'सिरम'च्या स्थापनेपासून, तिला वाढवण्यापासून, कोरोना जागतिक साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून दूरदृष्टी दाखवणारे पुनावाला आणि 'सिरम', लसीकरण सुरू झाल्यावर मात्र कौतुकासोबत टीकेचेही धनी होत आहेत. त्याला अर्थात कारण भारतातल्या लसीकरणाचा मंदावलेला वेग हा आहे.
 
देशात आलेल्या जीवघेण्या दुस-या लाटेनं जो हाहा:कार उडवला, त्यानंही लसीकरणावरचा दबाव वाढवला. पण तेवढ्या लशी उपलब्ध नाहीत आणि इतक्या लगेच त्या उपलब्ध होण्याची शक्यताही नाही. भारताचं अपेक्षित परिणाम न देऊ शकलेलं आणि चुकलेलं लसीकरण धोरण त्यामागे आहे.
 
सुरुवातीच्या टप्प्यात देशासोबत परदेशातही कराराप्रमाणे लशी पाठवण्यात आल्या, गरज ओळखून नियोजन करुन आगाऊन ऑर्डर्स न देणं, अनेक वयोगटांसाठी लसीकरण खुलं करणं, राज्य सरकारांना आवश्यक उत्पादन होत नसतांना लस खरेदी करण्यास परवानगी देणं, जगभरातल्या उपलब्ध इतर लशींसाठी आगाऊ करार न करणं अशी अनेक कारण सध्या अडकून बसलेल्या भारतातल्या लसीकरणामागे दिसताहेत. पण तरीही 'सिरम' आणि त्यांची जगभरातली सर्वांत मोठी उत्पादन यंत्रणा असतांना ही परिस्थिती का आली हे प्रश्न सरकारसोबत 'सिरम'लाही विचारले जाणं स्वाभाविक होतं.
वास्तविक अदार पुनावाला प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यागोदरही काय करायला हवं याचे सल्ले देत होते. भारताला सर्वांचं लसीकरण दोन डोसेससहीत पूर्ण करायचं असेल तर 80 हजार कोटी रुपयांची गरज असेल असं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्येही लिहिलं होतं. आवश्यक तेवढे डोसेस ऑर्डर आल्यावर बनवण्यासाठी काही आवश्यक कालावधी लागतो हेही ते वारंवार सांगत होते.
 
भारताला प्राथमिकता देऊन सर्व डोसेस केंद्र सरकारकडे देण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं. देशासोबत ज्या इतर गरीब देशांना लस देण्याची जबाबदारी करारांअंतर्गत, आहे त्याविषयीही ते बोलत होते. उत्पादनाला येणारा खर्च आणि सरकारला ते ज्या किमतीनं लस देत आहेत, यातही फरक आहे. मधल्या काळात जेव्हा अमेरिकेनं लस उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली, तेव्हा अदार पूनावलांना ट्वीट करुन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना टॅग करावं लागलं.
 
पण असं होऊनही लसीकरणाच्या धोरणावरुन आणि प्रत्यक्ष कार्यक्रमावरुन टीका सुरू आहे. 'सिरम' आणि अदार पुनावालांना कालांतरानं स्पष्टीकरण वा त्यांची बाजू मांडावी लागते आहे. केंद्रानं राज्य सरकारांनाही लस विकत घेण्यास परवानगी दिल्यानंतर ती लस कधी मिळून शकेल यावर स्पष्ट उत्तर मिळालं नाही.
 
केंद्राला 150 रुपये आणि राज्यांन 400 रुपये असं का याचं उत्तर मिळालं नाही. न्यायालयातही त्यावर सुनावणी सुरु आहे. राज्य सरकारांचा लस खरेदीसाठी उत्पादकांवर दबाव वाढत गेला. दबाव वाढला, तसा केंद्रानं 'सिरम'मधून होणाऱ्या लसीच्या निर्यातीवरही बंदी घातली. 'सिरम'चे इतर देशांसोबतचे करार धोक्यात आले.
 
काही दिवसांपूर्वी अदार यांनी प्रसिद्धीपत्रक काढून दोन खुलासे केले. एक म्हणजे, भारतीय करदात्यांच्या पैशातून उत्पादन केलेली कोणतीही लस त्यांनी परदेशात पाठवली नाही आहे आणि दुसरं म्हणजे वर्षाखेरीपर्यंत ते लशींची निर्यात करू शकणार नाहीत. मात्र या पत्रकात पुनावाला यांनी इतर देशांना मदतीसाठी दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण इतर देशांना मदत केली, म्हणून आता दुस-या लाटेत ते देश आपल्याला मदत करताहेत असंही ते म्हणाले. यावरुनच 'सिरम' पण सद्य परिस्थितीत कशी अडकली आहे याचा अंदाज येतो.
 
या सगळ्या वादंगांमध्येच आदर पूनावाला लंडनला निघून गेले. त्यांनी तिथल्या वर्तमानपत्राला मुलाखत देत काही विषयांवर बोललो तर आपल्या जीवाला धोका आहे अशा आशयाचं विधान केलं. त्याच्या काहीच दिवस अगोदर त्यांना केंद्र सरकारनं सुरक्षा पुरवली होती. पण आदर लंडनला गेले. तिथं 'मेफेअर' भागात त्यांनी मोठ्या रकमेला लीजवर घेतलेलं एक अलिशान घर तिथल्या माध्यमांतल्या चर्चेचाही मुद्दा बनलं होतं.
 
या पार्श्वभूमीवर 'सिरम'चं उत्पादन आता भारताबाहेरुनही सुरू करणार असल्याचं त्यांनी लंडनमध्ये देण्यात आलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. थोड्याच काळात ब्रिटनमध्ये केलेली मोठी गुंतवणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे देशातली लसीकरणाचे स्थिती पाहता, अदार पूनावाला भारत सोडून गेले का अशा चर्चाही सुरू आहेत.
 
पुनावाला कुटुंबीय आणि 'सिरम'कडून अशा चर्चांचं खंडन करण्यात आलं आहे आणि भारतातलं उत्पादन वाढवून सगळ्यांना लस देण्याशी ते कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. पण लंडनला गेलेले पूनावाला पुण्यात कधी परतणार याबद्दल खात्रीलायक माहिती नाही.
 
पुनावालांचं 'खानदानी' आयुष्य
कोरोना लसीमुळे आदर पूनावाला चर्चेत असले तरीही त्यांच्या राहणीमानासाठी आणि सोशल लाईफसाठीही ते आणि त्यांचे कुटुंबीय चर्चेत असतात. आदर यांची पुण्यातली स्टड फार्म आणि फार्म हाऊसेस तर भव्य आहेतच, पण नुकतचं लंडनच्या 'मेफेअर' भागात त्यांनी घेतलेलं आलिशान घर आणि त्यासाठी मोजलेली रक्कम ही सुद्धा चर्चेचा विषय झाली होती.
 
2015 मध्ये मुंबईत समुद्रकिनारी असलेलं आणि पूर्वी अमेरिकन कॉन्सलेट येथील मोठा महाल त्यांनी जवळपास 11 कोटी अमेरिकन डॉलर्सला विकत घेतला होता. तेव्हा ते मुंबईतलं सर्वात महागडं घर ठरलं होतं.
भव्यतेसाठीची ओढ जशी त्यांच्या विमानाचं ऑफिस करतांना दिसते, तसं त्यांच्या पुण्यातल्या घराच्या, ज्याचा नाव 'अदार अबोड' असं आहे, त्याच्या छतावरही दिसते.
 
'फोर्ब्स इंडिया'न आदर यांच्या लाईफस्टाईलवर लिहिलेल्या लेखामध्ये त्यांच्या घराच्या सिलिंगवर मायकेल एंजेलोच्या रोममध्ये असलेल्या पेंटिंग्सच्या प्रतिकृती चितारण्यात आलेल्या आहे. सोबतच घरामध्ये इतर प्रसिद्ध युरोपिअन चित्रकारांच्या प्रतिकृती आहेत. अनेक महाराजांच्या जुन्या महालांतून त्या काळातली झुंबरंही त्यांनी विकत घेऊन जमवल्याचं आदर 'फोर्ब्स'च्या लेखामध्ये आवर्जून सांगतात.
 
त्यांचे वडील सायरस यांच्याप्रमाणे आदर यांनाही जगभरातल्या महागड्या गाड्यांचा शौक आहे. जवळपास 20 गाड्या त्यांच्याकडे आहेत ज्यात रोल्स रॉयस, फेरारी, बेण्टले आणि लॅम्बोर्गिनी अशा गाड्यांची रांग आहे.
 
त्यांच्या मुलाला मर्सडिज ई-क्लास गाडी बॅटमोबिल म्हणून खास चीनमधून कनर्व्हर्ट करुन आणून दिली आहे. वेगाची आवड असलेल्या आदर पूनावालांनी त्यांच्या घरी बोईंग 737, फॉर्म्युला वन आणि फायटर जेट चे सिम्युलेटर्स बसवले आहेत. अदार आणि त्यांची पत्नी नताशा पुनावाला यांची बॉलिवूड पार्टीजमधली उपस्थितीही चर्चेत असते.