सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (18:07 IST)

दिया मिर्झा म्हणते, 'अहंकारी पुरुष हाच पर्यावरणासंदर्भातला मोठा अडथळा'

- वंदना
तुम्ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असाल तर, तुम्ही कुठंही गेला तरी, लोकांचं लक्ष आपोआप तुमच्याकडं वेधलं जातं.
 
कधी-कधी दिया मिर्झा या आकर्षणाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करुन घेऊ शकते. ती तिच्या सर्वात आवडीच्या हवामान बदलाच्या विषयावर जनजागृती करताना याचा फायदा करुन घेते, पण कधी-कधी ते अडचणीचं ठरतं.
 
बीबीसी 100 वुमेनच्या मुलाखतीदरम्यान जेव्हा ती हवामान बदलाच्या कारणांवर चर्चा करत होती, तेव्हाच हॉटेलच्या दाराची बेल वाजत होती.
 
ती मुलाखतीसाठी रूममध्ये असल्याचं एका कर्मचाऱ्याला समजल्यानं त्यानं दिया मिर्झाच्या फोटोंचा एक कोलाज तयार केला होता. तेच गिफ्ट देण्यासाठी ते दाराबाहेर आले होते.
 
दियानं अत्यंत विनम्रपणे ते स्वीकारलं आणि ते लोक जाताच तिनं पुन्हा हवामान बदलावरचा दृष्टीकोन मांडणं सुरू केलं.
 
पर्यावरणासाठी तिच्या दृष्टीनं सर्वात मोठा धोका काय आहे, या मुद्द्यावर ती आली.
 
"बदलासाठी तयार नसणारे काही अहंकारी पुरुष हाच पर्यावरणाच्या संदर्भातील सर्वात मोठा मुद्दा आहे," असं ती म्हणाली.
 
"प्रदूषण करणाऱ्यांना माहिती आहे की, त्यांच्या इच्छा या पृथ्वीला नष्ट करण्याच्या दिशेनं ढकलत आहेत. त्यामुळं त्यांच्याकडं बदल न करण्यासाठी काहीही कारण नाही."
 
बीबीसी 100 वुमनमध्ये यावेळी दिया मिर्झाचाही समावेश आहे. दरवर्षी जगभरातील 100 प्रेरणादायी आणि प्रभावी महिलांचा यात समावेश असतो. 2023 मध्ये यात प्रामुख्याने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कामगिरी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
 
आमची बहुतांश चर्चा ही हवामान बदलाच्या संदर्भात लैंगिक समानतेबरोबरच अभिनेत्री म्हणून तिच्या अनुभवावरही केंद्रीत होती.
 
दिया मिर्झा अवघी 19 वर्षांची असताना तिनं मिस एशिया पॅसिफिक या सौंदर्य स्पर्धेमध्ये विजय मिळवला होता.
 
त्यानंतर तिनं मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण ती खूप जास्त सुंदर आहे, खूप गोरी आहे आणि मॉडेल बनण्यासाठी खूपच ठेंगणी आहे, असं तिला सांगण्यात आलं.
 
"पण ज्यांना माझ्याबद्दल काहीही माहिती नाही, ते मला एका चौकटीत बंदिस्त करत आहेत आणि मी काय करायचं किंवा काय करायचं नाही हे ठरवत आहेत. त्यामुळं त्यांच्या म्हणण्यानं मला फारसा फरक पडला नाही," असं दियानं म्हटलं.
 
संपूर्ण करिअरदरम्यान दियाला लैंगिक भेदभावाचा अनुभव आला.
 
"मी जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळी सेटवर फार कमी महिला असायच्या. सेटवर पितृसत्ताक वातावरण असायचं आणि एका प्रकारची उतरंड ठरलेली होती. पुरुष कलाकारांना उशिरा सेटवर येणे तसंच अव्यावसायिकपणे वागणे यासाठी भत्ते दिले जात होते. पण जर अभिनेत्री उशिरा आली तर लगेचच त्यांना अव्यावसायिक ठरवलं जात होतं. त्यावेळी व्हॅनिटींची संख्याही फार कमी होती.
 
सुरुवातीच्या काळात तर महिला कलाकारांसाठी बाहेरच्या लोकेशनवर टॉयलेटही उपलब्ध नसायचे. त्यांच्या खासगी आयुष्य असण्याच्या अधिकाराचं उल्लंघन व्हायचं," असं ती म्हणाली.
 
भारतीय चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांच्या इतिहासामध्ये फक्त वहिदा रहेमानसारख्या काही मोजक्या महिला कलाकारांनाच दादासाहेब फाळके पुरस्कार का मिळाला? असा प्रश्न आम्ही केला.
 
त्यावर दियानं म्हटलं, वहिदाजी या महान अभिनेत्री आहेत आणि त्यांनाही हा पुरस्कार फार उशिरा मिळाला. चित्रपटांमध्ये आजही दिग्दर्शन, निर्मिती, लेखन या सगळ्यातच महिलांचं प्रतिनिधित्व कमी आहे, हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवं. जोपर्यंत महिलांचं प्रतिनिधित्व वाढणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही, असंही दियानं म्हटलं.
 
पण आधीचे वेगळे अनुभव असले तरी, भविष्याबाबत दिया मिर्झा सकारात्मक असून परिस्थिती बदलत आहे असं तिचं मत आहे.
 
"भारतीय चित्रपटांमध्ये एक असा काळ होता जेव्हा एका ठरावीक वयानंतरच्या महिलांना मुख्य भूमिका दिल्या जात नव्हत्या. पुरुषांना मात्र त्या मिळत होत्या," असं ती म्हणाली.
 
"आम्ही नुकताच धक धक नावाचा एक चित्रपट प्रदर्शित केला आहे. यात चार वेगवेगळ्या वयोगटातील चार महिला आणि त्यांच्या मोटरबाइक राइडची कथा दाखवण्यात आली आहे."
 
"भारतीय चित्रपटसृष्टीला अशा प्रकारची कथा मांडण्यासाठी फक्त 110 वर्षांचा कालावधी लागला. मलाही अशी भूमिका करण्यासाठी 23 वर्षे लागली."
 
शिवाय सौंदर्य स्पर्धेची विजेती राहिलेली असल्यानं तिनं तरुण मुलींनाही संदेश दिला. "कोणालाही तुमच्याबाबत आक्षेप घेऊ देऊ नका. मी मिस एशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये टू पिस स्विमसूट परिधान करण्यास नकार दिला होता. कारण मी त्यात कम्फर्टेबल नव्हते."
 
फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर इतर क्षेत्रांतही लैंगिक समानतेचा मुद्दा उचलण्यासाठीही दिया उत्सुक आहे.
 
दियानं 2021 मध्ये एका पारंपरिक सोहळ्यात विवाह केला. पण त्यात एक महत्त्वाचा फरक होता. इतर विवाहांच्या उलट दियाच्या विवाहामध्ये महिला पुजारी होत्या.
 
"माझ्या एका मित्राच्या लग्नामध्ये महिला पुजाऱ्यानं ज्या पद्धतीनं विधी केल्या होत्या त्यानं मी खूप प्रभावित झाले होते. मलाही तेच करायचं होतं. महिला पुजाऱ्यांकडून विवाहाचे विधी करण्याच्या या निर्णयानं भारतात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन चर्चा सुरू झाली. महिलांना पुजारी बनण्याबरोबरच इतरही काही कामं का करू दिली जात नाही, हा या चर्चेचा मुख्य विषय होता," असं दियानं म्हटलं.
 
पण दियानं केवळ ही एकच परंपरा मोडीत काढली नाही. तर तिनं तिच्या लग्नात कन्यादानाचा विधी करण्यासही नकार दिला. यात वधूचे पिता तिचं दान करत असतात.
 
"माझे आजोबा म्हणायचे की, माझ्या मुली लग्नात कुणाला तरी दान करायला त्या काही वस्तू नाहीत. हा अत्यंत मोठा विचार होता. त्यामुळं माझ्या आईनंही म्हटलं की, माझ्या लग्नात कन्यादानाचा विधी केला जाणार नाही," असं दियानं सांगितलं.
 
बॉलिवूड रिपोर्टर म्हणून मी दिया मिर्झाचं करिअर अत्यंत जवळून पाहिलं आहे. लोक ग्लॅमर आणि चमक-धमक यावर लक्ष केंद्रीत करत असतात. पण पर्यावरण प्रचारक म्हणून जबाबदारी घेत नाहीत.
 
दक्षिण भारतात जन्म आणि लहानाची मोठी झाल्यानं दिया कायम निसर्गाच्या सानिध्यात राहिलेली आहे. त्यामुळं तिनं हवामान बदलाचा मुद्दा उचलला यात आश्चर्य नाही. त्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील तिचं करिअर 20 वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं.
 
दिया 2017 मध्ये युनायटेड नेशन्सची गुडविल अॅम्बेसडर बनली. हवामानविषयक कार्यक्रमात तिनं भाषण केलं होतं.
 
मुलाखतीदरम्यान ती वारंवार बालपणीच्या आठवणींना उजाळा देत होती. त्यावेळी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं कपडेही वारसा हक्कानं दिले जायचे आणि वर्षानुवर्षे ते वापरण्यात कसलीही लाजही वाटत नव्हती, असं दियानं सांगितलं.
 
घरून या परंपरेचा वारसा मिळाल्याचं ती म्हणाली. उदाहरण द्यायचं झाल्यासं नुकतीच तिनं मुलाच्या वाढदिवसानिमित्त झिरो प्लास्टिक, झिरो वेस्ट पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याठिकाणी केलेल्या डेकोरेशनचं सर्व साहित्य पुन्हा वापरण्यासाठी जपून ठेवण्यात आलं.
 
"आपल्या म्हणण्यानुसार वागावं आणि सर्वांसमोर उदाहरण ठेवणं गरजेचं आहे," असं ती अनेकदा म्हणाली. दिया हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल वापरण्यास नकार देते. त्याऐवजी ती तिच्याकडं असलेली धातूची बॉटल वापरते.
 
"जर मी स्वतःच शाश्वत जीवनशैलाचा अवलंब करत नसेल, तर मी त्याची वकिली कशी करू शकते?" असं दियानं विचारलं.
 
"तरुणांनी त्यांच्या सवयी बदलण्याची गरज गरज आहे हे सांगण्याचा अधिकार मला आहे.
 
जेव्हाही आपण पर्यावरणाच्या हानीबद्दल चर्चा करतो तेव्हा एकप्रकारची हताशपणाची भावना असते.
 
"सध्या जगात सगळीकडं जे काही घडत आहे, त्यामुळं मी काहीशी निराश आहे," असं ती म्हणाली.
 
"पण मला तरुणांची सर्जनशीलता, त्यांचे उपाय या सर्वामुळं त्यांच्याकडून आशा आहे. पण याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, त्यांची आस्था आणि प्रेम हे आहे."
 
दिया तिच्या मुलाला भेटण्यासाठी आतुर असल्यानं मुलाखत संपण्याची वाट पाहत होती. त्यामुळं मी तिला शेवटचा प्रश्न विचारला.
 
अभिनेत्री, पर्यावरण प्रचारक आणि यूएन अॅम्बेसडर यातून तिच्या मनाला सर्वात जवळचं काय आहे?
 
तिनं लगेचच उत्तर दिलं, "एक आई असल्यानं माझ्याकडं जगातील भावी पिढ्यांना आकार देण्याची संधी आहे."
 
अतिरिक्त वार्तांकन-अॅमेलिया बटरफ्लाय