बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (16:45 IST)

बनारस हिंदू विद्यापीठ: मुसलमानाने संस्कृत शिकवण्यावरून एवढा वाद का? ही फक्त ब्राह्मणांची भाषा नाही - दृष्टिकोन

राष्ट्रीय संस्कृत संस्थानात शिकलेले फिरोज खान यांचा याच वर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला होता. मात्र त्यानंतरही बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्यांच्या संस्कृतचे प्राध्यापक म्हणून झालेल्या नियुक्तीवरून एवढा मोठा गदारोळ होईल, याची त्यांना कल्पना नव्हती.
 
एक मुस्लीम व्यक्ती आम्हाला संस्कृत कसं शिकवू शकतो, असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या नियुक्तीविरोधात धरणं आंदोलन सुरू केलं आहे.
 
फिरोझ त्या विविधतेत एकतेच्या आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात, जी आपल्या समाजाचा कणा राहिलेली आहे आणि गेली काही वर्षं त्याच संस्कृतीला धक्क्यांवर धक्के सहन करावे लागले आहेत.
 
संस्कृतमध्ये एक शब्द आहे - कूपमंडूक. दुर्दैवाने याच वृत्तीमुळे ही भाषा व्याकरण आणि साहित्याच्या दृष्टीने एकाकी पडली आणि जातीयतेला बळी पडली.
 
ज्या लोकांमुळे संस्कृतला जागतिक स्तरावर मान मिळाला ते फक्त हिंदू किंवा ब्राह्मण नव्हते तर जर्मन, इंग्रज आणि मुसलमान विद्वान होते, याचा आपल्याला विसर पडलाय. या सगळ्या लोकांनी विविध भाषांमध्ये देवाणघेवाण आणि संवाद निर्माण करणार पूल उभे केले होते.
संवाद वाढवणाऱ्या भाषा
1953-54 साली मोहम्मद मुस्तफा खान - 'मद्दाह' यांनी एका ऊर्दू-हिंदी शब्दकोशाचं संपादन केलं. उत्तर प्रदेश हिंदी संस्थेने हा शब्दकोश प्रकाशित केला होता. सात दशकं उलटूनही ऊर्दू-हिंदीमधला यापेक्षा चांगला शब्दकोश निर्माण झालेला नाही.
 
मद्दाह हे पाली, संस्कृत, अरबी, फारसी, तुर्की आणि हिंदी भाषांमधले जाणकार होते. आणि या सगळ्या भाषांसाठीचे हिंदी शब्दकोश त्यांनी तयार केले होते. 'ऊर्दू साहित्याचं अतिशय वेगाने हिंदीत भाषांतर होत असल्याने' हिंदी-ऊर्दू शब्दकोशानंतर त्यांनी ऊर्दू-हिंदी शब्दकोशही तयार करावा, असा आग्रह त्यांच्या एका हिंदू मित्राने त्यांना केला.
 
विशेष म्हणजे मद्दाह यांचा हा शब्दकोश डॉ. संपूर्णानंद यांना समर्पित करण्यात आलाय. एक राजकारणी असण्यासोबतच ते संस्कृतमध्ये पारंगत होते आणि त्यांच्याच नावाने वाराणशीमध्ये संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ आहे.
 
पण हे फक्त एक उदाहरण आहे. खरंतर आपल्या देशात भाषा आणि विद्वत्तेमध्ये संस्कृत, फारसी, हिंदी आण ऊर्दू यांचा मिलाफ होण्याची, एकमेकांत विलीन होण्याची दीर्घ परंपरा आहे. खरंतर यामुळे एकात्मकता वाढायला मदतच झाली. मुघल काळात दारा शिकोह यांनी उपनिषदांचा अनुवाद करणं हा या एकात्मकतेमधला महत्त्वाचा टप्पा होता.
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दोन किंवा तीन भाषांचे जाणकार अगदी दूरवरच्या गावांमध्येही आढळत. उदाहरणार्थ, माझे वडील संस्कृत, ऊर्दू आणि हिंदीचे जाणकार होते. त्यांनी सत्यनारायणाच्या कथेचा गढवाली मध्ये छंदबद्ध अनुवाद केला होता आणि ते त्यांच्या खासगी डायरी ऊर्दूत लिहायचे.
 
साहित्यात हिंदी-ऊर्दूच्या जवळीकीचा मोठा इतिहास आहे. प्रेमचंद, रतननाथ सरशार, ब्रजनारायण चकबस्त, फिराक गोरखपुरी, कृष्ण चंदर, राजेंद्र सिंह बेदी आणि उपेंद्रनाथ अश्क यांच्यासारख्या मोठ्या लेखकांनी ऊर्दूमध्ये लिखाण केलं. पण ते ऊर्दूत का लिहितात, असा प्रश्न कधीही विचारण्यात आला नाही.
हिंदी आणि ऊर्दूचा एकाचवेळी अभ्यास करणं ही त्यावेळी अगदी स्वाभाविक गोष्ट होती. आजही परदेशी विद्वान हिंदी आणु ऊर्दू एकत्र लिहायला-वाचायला शिकतात.
 
जास्त वाचकांपर्यंत पोहोचता यावं म्हणून प्रेमचंद हिंदीत लिहू लागले. पण म्हणून त्यांनी ऊर्दूची कास कधी सोडली नाही. त्यांची शेवटची गोष्ट - 'कफन' ही मूळ ऊर्दूतच लिहिण्यात आली होती.
 
हिंदू कुटुंबात जन्मलेले अनेक ऊर्दू शायर आजही उत्तम लेखन करत आहेत. शीन काफ निजाम, जयंत परमार आण चंद्रभान खयाल यांच्यासारखी कितीतरी नावं उदाहरणार्थ घेता येतील. ऊर्दूच्या महान परंपरेत मीर आणि गालिब असे शायर आहेत ज्यांच्या लिखाणात हिंदीचे वा बोली भाषेतले शब्द ठिकठिकाणी वापरलेले दिसतात.
 
'पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है', 'सिरहाने 'मीर' के कोई न बोलो, 'अभी टुक रोते रोते सो गया है' किंवा 'है खबर गर्म उन के आने की', 'आज ही घर मे बोरिया न हुवा' किंवा मग 'मेरे दुःख की दवा करे कोई' (गालिब).
 
फिराक गोरखपुरी यांची शायरी म्हणजे हिंदी - ऊर्दू एकतेचं अनोखं उदाहरण आहे. 'ज्यूं कोई नार सितार बजावे है', 'बहुत पहले से उन कदमों की आहट जान लेते हैं, तुझे ऐ ज़िंदगी हम दूर से पहचान लेते है', 'इसी खंडहर में कहीं कुछ दिये हैं टूटे हुए, इन्ही से काम चलाओ बड़ी उदास है रात.'
 
रोजच्या व्यवहारातल्या भाषेमध्ये हिंदी - ऊर्दूच्या मिलाफाने किती सौंदर्य आणलंय यावर फिराक यांनी एक अख्खं पुस्तकं लिहीलं होतं. शादी - ब्याह, रोटी-सब्जी, हुक्का -पानी, जात - बिरादरी, रस्मो-राह, बोरिया-बिस्तर अशी शेकडो उदाहरणं यात आहेत.
 
पण राजकारणाने भाषा एक हत्यार म्हणून वापरायला सुरुवात केली की ती भाषा खिळखिळी होते. जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीदरम्यान लाखो ज्यूंची हत्या करण्यात आली. थिओडोर अर्डोनो या तत्त्वज्ञाने म्हटलं होतं, 'आता जर्मन भाषेत कविता लिहीणं शक्य नाही.'
 
भाषांचा धर्मांशी संबंध
स्वातंत्र्यानंतर हिंदी आणि ऊर्दूसोबतही असंच काहीसं झाली. आजही आपल्याला आढळतं की हिंदीला हिंदू आणि ऊर्दूला मुस्लीम अशी ओळख देण्यात आली आहे. याचा सगळ्यात मोठा फटका बसला ऊर्दूला.
 
मग या आधुनिक काळात संस्कृत भाषा कशी शिकवायची?
 
असं म्हणतात की भाषा ही वाहत्या पाण्यासारखी असते. देशानुसार, काळानुसार या भाषेत बदल होतात. पण असं न झाल्यास हेच वाहतं पाणी साचत आणि गढूळ होतं.
 
संस्कृतबाबत हेच झालं. संस्कृत शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या लोकांनी ही भाषा नवीन काळाशी-पिढीशी जुळवून घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. खरंतर संस्कृत हा भाषाच मूलतः इतकी लवचिक आहे की ती नवीन वातावरण वा अभिव्यक्तीशी जुळवून घेऊ शकते.
 
दुर्दैवाने भाषेतली ही लवचिकता तिच्या शिक्षणपद्धतीमध्ये आली नाही आणि या भाषेतलं कामकाज त्याच जुनाट, संकुचित आणि सामंती पद्धतीने सुरू राहिलं. परिणामी ही महान भाषा बदलांपासून दूर राहिली आणि परिस्थितीशी विसंगत झाली.
 
स्वातंत्र्यानंतर संस्कृतसाठी अनेक राष्ट्रीय संस्था सुरू करण्यात आल्या. पण संस्कृतमध्ये ज्याला 'गतानुगतिक' म्हटलं जातं तसा संस्कृतचा अभ्यासक्रम तसाच जुनाट राहिला.
 
याला अपवाद होते डॉ. राधावल्लभ त्रिपाठी आणि बलराम शुक्ल यांच्यासारखे विद्वान. त्यांनी संस्कृत साहित्यातील इतर परंपरांचा शोध लावला आणि हे सिद्ध केलं की ही भाषा फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी नाही. यामध्ये फक्त 'तन्वीश्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्टि'चं सौंदर्य आणि शृंगारच नाही तर त्याकाळच्या अडचणी आणि संकटांचं चित्रणही आहे. हे चित्रण आजच्या काव्यांशी-संवदेनांशी जुळणारं आहे.
 
संस्कृतचा विकास आणि प्रसार हा खरंतर शेंडी ठेवणाऱ्या आणि आचार्यांना दंडवत घालणाऱ्या गुरुकुलांमधून होणार नाही. यासाठी आधुनिक दृष्टिकोन ठेवायला हवा. यामध्ये धर्म विद्वत्तेच्या आड येता कामा नये. आणि दुसऱ्या धर्मांमध्ये जन्म झालेल्यांना या भाषेत प्रवेश वर्ज्य केला जाऊ नये.