1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

बराक ओबामा: महिला या पुरुषांपेक्षा सरसच, त्यात वादच नाही

Barack Obama: Women are more important than men
जर महिला जगातल्या प्रत्येक देशाचं नेतृत्व करायला लागल्या तर जगभरात लोकांचं राहणीमान उंचावेल, असं मत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलं आहे.
 
सिंगापूरमध्ये बोलत असताना ते म्हणाले की "महिला संपूर्णपणे दोषरहित नाहीत, पण पुरुषांपेक्षा नक्कीच सरस आहेत, यात वादच नाही. जगातले बहुतांश प्रश्न, पुरुषांनी, खासकरून म्हाताऱ्या पुरुषांनी, आपल्या हातात सत्ता एकवटून ठेवल्याने निर्माण झालेत."
 
राजकीय धृवीकरण आणि सोशल मीडियाद्वारे पसरत असलेल्या चुकीच्या मतांबद्दलही ते बोलले.
 
सिंगापूरमधल्या एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की राष्ट्राध्यक्ष असतानाही त्यांनी अनेकदा हा विचार केला की महिलांनी नेतृत्व केलं तर हे जग कसं असेल. "बायांनो, मला तुम्हाला हे सांगायचंय, तुम्ही परफेक्ट नाही आहात, हे खरंय. पण मी हे खात्रीने सांगू शकतो की आमच्यापेक्षा (पुरुषांपेक्षा) कित्येक पटींनी तुम्ही सरस आहात.
 
"मला पूर्ण विश्वास आहे की पुढची दोन वर्ष पृथ्वीवरच्या प्रत्येक देशाने आपला कारभार महिलेच्या हातात दिला तर चित्र पूर्णपणे बदलून जाईल. जगातल्या अनेक गोष्टी नुसत्या बदलणार नाही तर सुधारतीलही," ते म्हणाले.
 
तुम्ही परत सक्रिय राजकारणात पुन्हा जाल का, असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, वेळ आली की नेत्यांनी पायउतार होऊन इतरांना मार्ग मोकळा करावा, यावर माझा विश्वास आहे. "म्हातारे पुरुष सत्ता सोडत नाहीत हाच तर प्रश्न आहे ना," ते म्हणाले.
 
"राजकीय नेत्यांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की विशिष्ट कामासाठी तुमच्याकडे सत्तेच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. त्यावर तुमचा आयुष्यभराचा हक्क नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ नका," असंही ते पुढे म्हणाले.
2009 ते 2017 या काळात बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
 
आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी जगभरातल्या तरुण नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका फाऊंडेशनची स्थापना केली आहे.