शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (09:43 IST)

बिग बॉस मराठी: शिव ठाकरेचा अमरावती ते MTV रोडीज ते विजेतेपदापर्यंतचा प्रवास

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे.
 
रविवारी संध्याकाळी बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा रंगला. या सोहळ्यात प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर शिवनं सिझन-2च्या विजेत्याचा किताब पटकावला आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख रुपये मिळाले.
 
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे आणि आरोह वेलणकर पोहोचले होते. घरातला 100 दिवसांचा प्रवास या सदस्यांनी पूर्ण केला होता.
 
शिव ठाकरे आणि नेहा शितोळे हे अगदी शेवटपर्यंत घरात राहिलेले सदस्य होते. साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी अशी ओळख असलेल्या शिवला बिग बॉस विजेता म्हणून आता नवीन ओळख मिळाली आहे.
 
"मी 'रोडीज' मध्ये जाण्यासाठी चार वर्षं प्रयत्न करत होतो. पाचव्या वेळेस मी 'रोडीज'मध्ये पोहोचलो. हिंदी बिग बॉसमध्ये जाण्यासाठीही मी प्रयत्न केला होता. एव्ही, प्रेस कॉन्फरन्स आणि ही ट्रॉफी हे सगळं मी टीव्हीवर पाहताना इमॅजिन करायचो. आणि आता मी विजेता आहे," अशी प्रतिक्रिया शिवनं बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर दिली.
 
"मला चित्रपटही मिळाला आहे. 'अपना टाइम आयेगा' असं हे फीलिंग आहे. स्वप्नं पूर्ण होतातच," असं तो पुढे म्हणाला.
 
कोण आहे शिव ठाकरे?
मूळ अमरावतीच्या शिवने बिग बॉसच्या घरात पहिल्यापासूनच आपली वेगळी छाप निर्माण केली होती. MTVच्या 'रोडीज'मधून शिव ठाकरे हा मराठमोळा स्पर्धक नावारूपास आला. 'रोडीज' त्या पर्वात त्याने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती.
 
इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत खूप संघर्षातून जावं लागलं, असं शिवनं 'बिग बॉस' मध्ये अनेकदा सांगितलं होतं.
 
घरची परिस्थिती बेताची असल्यानं भल्या पहाटे आपण दूध आणि पेपर टाकायचं काम देखील करायचो, असं त्यानं 'बिग बॉस'च्या घरात सांगितलं होतं.
 
अभिनेत्री वीणा जगतापसोबत असलेल्या त्याच्या खास मैत्रीमुळे तो या संपूर्ण पर्वात चर्चेत होता. प्रेक्षकांना त्याच्या खेळासोबतच त्याची आणि वीणाची केमिस्ट्री देखील आवडली.
 
शिव ठाकरेचा बिग बॉसच्या घरातला प्रवास
26 मे रोजी सुरू झालेलं हे बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व घरातील भांडणं, रोमान्स, टास्क, एकमेकांबद्दलचं गॉसिप यामुळे चांगलंच चर्चेत राहिलं. सर्व स्पर्धकांनी 100 दिवसात या स्पर्धेला रंगत आणली.
 
सुरुवातीला काहीचा शांत वाटणारा शिव नंतर खुलत गेला आणि मग त्याने आपला प्रभाव निर्माण केला तो शेवटपर्यंत.
 
या संपूर्ण प्रवासात त्याला वीणानं साथ दिली. ते एकमेकांत इतके गुंतले की वीकेंडला महेश मांजरेकरांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली. पण आपण काही गैर करत नसल्याचं सांगत त्या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली.
 
'बिग बॉस'नंतर आपण लग्न करणार असल्याचंही शिव आणि वीणा यांनी आधीच्या एका एपिसोडमध्ये जाहीर केलं होतं.
 
महेश मांजरेकरांनी दिली चित्रपटाची ऑफर
मराठी बिग बॉसचे होस्ट आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजेकर यांनी शिवला त्यांच्या 'वीर दौडले सात' या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. बिग बॉस मराठी-2 च्या महाअंतिम सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.