गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (08:54 IST)

अयोध्येच्या विकासासाठी कोट्यवधींचा खर्च, तरीही पहिल्याच पावसात दाणादाण - ग्राऊंड रिपोर्ट

Ram mandir Ayodhya
सकाळचे सात वाजले होते, आकाशात थोडे ढग जमा झाले होते आणि पावसाची थोडीशी रीपरीप सुरू होती. काही महिन्यांआधीच तयार झालेला रामपथ हा प्रशस्त काळा डांबरी रस्ता रिकामा होता.राम मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक दिसत होते. मात्र, ती संख्या तुरळकच होती. शहरातील प्रसिद्ध सिव्हिल लाईन्स बस स्थानकावर ई-रिक्षाचालक सकाळचा चहा पित होते आणि चहासोबत अयोध्यातील रस्त्यांच्या दुर्दशेवर चर्चाही करत होते.
 
ई-रिक्षाचालक बबलू यांच्याशी आमची भेट झाली. त्यांनी 13 किलोमीटर लांबीच्या रामपथाकडे बोट दाखवत सांगितलं, "साहेब हा रस्ता नाहीच. इथे जे खड्डे पडले आहेत ना, ते सर्व उद्घाटनबाजीचा परिणाम आहे.
 
"22 जानेवारीला राम मंदिराची प्राण-प्रतिष्ठा होती. त्याच्या भव्य आयोजनासाठी हा रस्ता घाईघाईनं बांधण्यात आला होता. कोणाला ठाऊक, यात कोणता आणि किती प्रमाणात माल वापरण्यात आला आहे?
बबलू पुढे म्हणाले, "हा रस्ता तयार करण्यासाठी आमची घरं तोडण्यात आली. शिवाय, आम्हाला त्याची पूर्ण नुकसान भरपाई देखील मिळाली नाही. त्यामुळेच निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलं."
 
22 जूनला झालेल्या पावसानंतर सहादतगंज पासून नया घाट, अयोध्येपर्यत जाणारा रामपथ रस्ता 10 पेक्षा अधिक ठिकाणी खचला. त्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खोल आणि भुयारासारखे खड्डे तयार झाले.
 
रस्त्यासाठी झाला होता कोट्यवधींचा खर्च
यावर्षी 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होण्याआधीच रामपथ कॉरिडॉरची उभारणी झाली होती.
 
सरकारी आकडेवारीनुसार, हा रस्ता बांधण्यासाठी जवळपास 624 कोटी रुपयांचा खर्च झाला.
राम मंदिराचं उद्घाटन करण्याआधी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अयोध्येचा विकास करण्यात आल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र, तुंबलेल्या पाण्यानं आणि खचणाऱ्या रस्त्यांनी या सर्व विकासाबाबत प्रश्न निर्माण केले आहेत.
 
अनेक स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी घाईघाईनं विकासकामं पूर्ण करण्यात आली. रस्त्यांचं काम देखील असंच घाईत पूर्ण करण्यात आलं, त्यामुळे रस्ते बांधणीच्या मानकांनुसार काम झालेलं नाही.
अयोध्या विकास मॉडेल'वर प्रश्नचिन्ह
यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत अयोध्येचं सुशोभीकरण आणि भव्य-दिव्य विकास करण्यात आला. त्याला विकासाचं दीर्घकालिक आणि शाश्वत मॉडेल म्हटलं जाऊ शकतं का?
 
अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाआधी संपूर्ण शहरात सुरू असलेल्या कामांमुळे ड्रिल मशीन आणि बुलडोझरचा आवाज घुमत होता. आता मात्र राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात अयोध्येत चारी बाजूंना पाणी साठलं आहे. अयोध्येत घरांमध्ये साचलेलं पाणी काढण्यासाठी रस्त्याच्या काठावर पम्पिंग सेट लावलेले दिसत आहेत.
 
23 ते 28 जून दरम्यान झालेल्या पावसानंतर अयोध्येत राम मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारापाशी पाणी साचलं होतं.
याशिवाय जलवानपूर, औद्योगिक परिसर असलेलं गद्दोपूर, कारसेवकपुरम आणि सिव्हिल लाईन्समध्ये जागोजागी पाणी साचलं. लोकांच्या घरांबरोबरच अनेक सरकारी कार्यालयांमध्येसुद्धा पाणी साचलं.
 
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शरयू नदीच्या किनाऱ्यावरील वस्त्या सोडल्या तर अयोध्या आणि फैजाबाद या दोन्ही शहरांमध्ये याआधी कधीही पावसाचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात तुंबत नव्हतं.
 
राम मंदिराचे पुजारी काय म्हणाले?
अशा बातम्या आल्या होत्या की, 22 जून 2024 ला झालेल्या साधारण पावसानंतर लगेचच राम मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या सत्येंद्र दास यांनी मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावरून पाणी गळत असल्याचं सांगितलं होतं.
 
आम्ही सत्येंद्र दास यांची त्यांच्या गोकुळ मंदिर निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळेस ते म्हणाले, "यासंदर्भात बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. सध्या इथं बोलण्यासारखं वातावरण नाही. विकासाबद्दल काय सांगायचं? पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे."
 
राम मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी मात्र राम मंदिराच्या गर्भगृहात पाण्याची गळती होत असल्याचे दावे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "गर्भगृहात जिथे भगवान रामलल्ला विराजमान आहेत. तिथे छतावरून पाण्याचा एक थेंब देखील गळालेला नाही. शिवाय, इतर कुठूनही गर्भगृहात पाणी आलेलं नाही."
 
मात्र, अनेक ठिकाणी नव्यानं बनलेला रस्ता खचण्याच्या मुद्द्याबाबत अयोध्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनदेखील मान्य करतं की रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे व्हायला नको होतं.
 
उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीशी संबंधित असलेले अयोध्येचे महापौर महंत गिरीशपती त्रिपाठी यांनी बीबीसीला सांगितलं, "अयोध्येत रामपथ बांधला जाणं हे नक्कीच कौतुकास्पद काम आहे. या रस्त्याच्या बांधणीत इंजिनिअरिंगशी निगडीत काही दोष होते. त्यामुळेच काही ठिकाणी खड्डे पडले. मात्र, मला वाटतं तेसुद्धा पडायला नको होते. रस्ता बांधणीत काही तांत्रिक कमतरता किंवा दोष राहिला असेल म्हणूनच काही ठिकाणी खड्डे पडले आहेत."
त्यांनी पुढे सांगितलं की, "22 जानेवारीला करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या भव्य आयोजनामुळे संपूर्ण जगभरातून भाविक इथे येण्याची अपेक्षा होती. सर्व जगाचं लक्ष त्यावेळेस अयोध्येकडे होतं. तिथे एका अत्याधुनिक रस्त्याची आवश्यकता होती."
 
"रस्ता लवकर तयार करत असताना काही तांत्रिक दोष राहिलेले असू शकतात. त्यामुळेच सुरुवातीच्या पावसातच खड्डे पडलेले दिसत आहेत. मात्र आम्हाला विश्वास आहे की योगी सरकार असताना आम्ही लवकरच या उणीवा दूर करू. आगामी काळात मुसळधार पावसाला तोंड देण्यासाठी अयोध्येची महानगर पालिका सज्ज आहे."
 
ओम प्रकाश वर्मा हे सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD)अॅडिशनल इंजिनीअर आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "रामपथ सध्या डिफेक्ट लायबिलिटी पीरीयडमध्ये आहे. या कालावधीत रस्त्यामध्ये कोणतीही समस्या आल्यास किंवा बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती संबंधित एजन्सीकडूनच केली जाईल. मानसूनच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून आणि संबंधित बांधकाम एजन्सीकडून रस्त्याची सतत देखरेख केली जाईल."
 
त्रस्त रहिवाशी
अयोध्या धाम स्टेशन रोडवर ऑनलाइन बॅंकिंगचं काम करणारे रजनीश कुमार यांच्या घरासमोर बांधल्या जात असलेल्या नाल्याचं बांधकाम महिनाभरापासून अर्धवट सोडवण्यात आलं आहे. पावसाचं पाणी तुंबल्यामुळं रजनीश यांचं घर आणि दुकानाला तडे गेले आहेत.
 
पम्पिंग सेटनं पाणी बाहेर काढत असताना रजनीश कुमार खूपच निराश झालेले दिसून येत होते.
 
साहजिकच आहे, अजून पावसाळ्याची जेमतेम सुरूवात झाली आहे आणि ही परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांचं सर्व कुटुंब घाबरलेलं आणि चिंताग्रस्त आहे.
अयोध्येच्या स्टेशन रोडवरच बांधकाम साहित्याचं दुकान असणारे बृजकिशोर म्हणतात, "महिन्याभरापूर्वी इथं नाला खोदण्यात आला आणि त्याचं काम अर्धवट सोडून देण्यात आलं. दुकानात पाणी साचतं. दुकानाची माती हळूहळू खचून पाण्यात जाते आहे."
 
"दुकान कधीही कोसळू शकतं. मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केल्यानंतर सुद्धा कोणीही दखल घेत नाही. इथं आधी कधीही पाणी साचत नव्हतं. मात्र आता दोन तास पाऊस पडल्यानंतर वाईट परिस्थिती झाली आहे."
शहरातील सामाजिक कार्यकर्ते गुफरान सिद्दीकी म्हणतात, "कधीकाळी फैजाबाद शहर अवधच्या राजधानीचं शहर होतं. इथलं जुनं स्थापत्यशास्त्राचं आणि पारंपारिक विकासाचं मॉडेल लोक आजदेखील पाहू शकतात."
 
"सर्वसाधारण पाऊस पडल्यानंतर अयोध्या आणि फैजाबाद शहरात पाणी साचल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचं मी पहिल्यांदाच पाहतो आहे. हा सर्व प्रसारमाध्यमांमधून झगमगाट आणि भव्य-दिव्य दाखवल्याचा परिणाम आहे. नाहीतर तीन महिन्यांमध्ये जे रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे त्यात प्रत्येक किलोमीटरवर पाच-पाच खड्डे कसे पडू शकतात?"
 
महानगरपालिकेच्या ऑफिसमध्येही पाणी शिरलं!
अयोध्येतील फक्त रस्त्यांवरच खोल खड्डे पडलेले नाहीत तर राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरातसुद्धा पाणी साचलेलं दिसून आलं. मंदिराशेजारील महानगरपालिकेचं कार्यालय, जवळपासची दुकानं आणि घरांमध्ये देखील पाणी साचलं होतं. तिथले लोक पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
 
अयोध्येतील महानगर पालिकेचे कर्मचारी असणारे कमलेश कुमार कार्यालयात साचलेलं पाणी पम्पिंग सेटच्या मदतीनं बाहेर काढत होते. ते म्हणाले, "पावसाळ्यात कधीही महानगर पालिकेच्या कार्यालयात पाणी साचत नव्हतं."
 
त्यांनी बीबीसीला सांगितलं, "आरएनसी ही कंपनी रस्त्याचं बांधकाम करत होती. त्यांनी जुना नाला मातीचा भर घालून बंद करून टाकला. नवीन रामपथ रस्त्याच्या बरोबर मधूनच नाला गेला आहे. मात्र त्या नाल्याला कार्यालयाच्या नाल्याशी जोडण्यात आलं नाही. यामुळेच थोडासा पाऊस पडल्यावर देखील पाणी साचलं आहे."
 
"आम्ही त्यांना सांगत होतो की कार्यालयाच्या नाल्याला मुख्य नाल्याशी जोडा. मात्र त्यांनी कोणाचाही सल्ला ऐकला नाही. मनमानी करत त्यांना वाटेल तसं काम करून मोकळे झाले."
 
राम मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर जलवानपूर परिसर आहे. या परिसरात आधीसुद्धा पावसाळ्यात अडचणी येत असत. मात्र, पहिल्या पावसातच तिथं पाणी तुंबेल असा विचार कोणीही केला नव्हता.
 
किरण जलवानपूरमध्ये भाड्याच्या घरात दुकान चालवतात. त्यांच्या दुकानामध्ये सुद्धा पाणी साचलं आहे.
 
त्यांनी सांगितलं की, आधी त्यांचं चहा-नाश्त्याचं दुकान राम मंदिराच्या शेजारी राम पथवर होतं. मात्र रस्ता रुंदीकरण करण्यात आलं तेव्हा त्यांचं 60 फूट लांब आणि 13 फूट रुंद दुकान पाडण्यात आलं.
 
किरण सांगतात, "संपूर्ण परिसरात पाणी तुंबलं आहे. माझ्या दुकानात एक फूट पाणी साचलं आहे. आता आम्ही स्वयंपाक कसा करायचा, सामान कुठं न्यायचं? काही मार्गच शिल्लक राहिलेला नाही. प्रशासनातील कोणीही लक्ष देत नाही."
जलवानपूरच्या दुसऱ्या गल्लीत पद्मावती यांचं घर आहे. आपल्या तीन मजली घरात त्या धर्मशाळा चालवतात. पद्मावती धर्मशाळेच्या दरवाज्यात उभं राहून यात्रेकरूंची वाट पाहत आहेत.
 
त्यांच्या गल्लीत पाणी साचलं आहे. त्या घाणेरड्या काळ्या पाण्यातून मी चालत येत असताना त्यांनी मला दुरूनच पाहिलं. पद्मावतींना वाटलं कदाचित मी यात्रेकरू आहे आणि राहण्यासाठी खोली शोधतो आहे.
 
मात्र, लवकरच त्यांना कळालं की मी यात्रेकरू नाही. हे कळल्यावर त्या निराश झाल्या.
 
पद्मावती म्हणाल्या, "यावर्षी दोन वेळा पाऊस पडला. दोन्ही वेळा घरांमध्ये पाणी साचलं. जे यात्रेकरू आमच्या धर्मशाळेत आले होते, ते इथून निघून गेले. त्यानंतर इथं कोणताही यात्रेकरू आला नाही. आमची संपूर्ण धर्मशाळा रिकामी पडली आहे."
 
राम मंदिर बनल्यामुळं आनंद झाला का, असं विचाल्यावर पद्मावती सांगतात, "राम मंदिर आस्थेचं केंद्र आहे. मंदिर झाल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत. मात्र आम्हाला काय हवं आहे? आमची इच्छा एवढीच आहे की, नाल्याच काम पूर्ण व्हावं आणि पाण्याचा निचरा व्हावा."
 
सद्यपरिस्थितीत अयोध्येच्या संपूर्ण विकासकामात काहीतरी गंभीर तांत्रिक चूक झाली आहे की फक्त पावसामुळं हे घडलं आहे, यावर कोणालाही काहीही सांगता येणार नाही.
 
एकीकडे सत्ताधाऱ्यांना वाटतं आहे की पावसामुळं निर्माण झालेली परिस्थिती ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र यात काहीतरी गंभीर चूक झाल्याचं सांगत आहेत.
 
विकास योजनांबाबत 'कॅग'चे प्रश्न
पारसनाथ यादव समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "हिंदू धर्मात लिहिलं आहे की कोणत्याही अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरात देवाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा करू नये. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी राम मंदिराचा राजकीय फायदा घेण्यासाठी प्राण-प्रतिष्ठा करण्यात आली."
 
ते म्हणतात, "सर्व गोष्टींना मागे ठेवून राम मंदिराशी निगडीत कामं करण्यात आली. रस्ते तुटत आहेत, खचत आहेत, गटारी तुटत आहेत. सर्वकाही घाईघाईत करण्यात आल्याचा हा परिणाम आहे."
 
अयोध्येत राहणारे असलेले प्राध्यापक अनिल कुमार सिंह यांना वाटतं की रस्ते खचणं आणि पाणी तुंबण्यामागं, घाईघाईत काम पूर्ण करणं आणि सदोष इंजिनिअरिंग ही मुख्य कारणं आहेत.
प्राध्यापक अनिल कुमार सिंह म्हणतात, "कोणत्याही तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेण्यात आलं नाही आणि त्याचबरोबर खूपच घाईघाईत काम पूर्ण केल्यामुळे हे सर्व होतं आहे. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन डोळ्यासमोर ठेवून ही सर्व कामचलाऊ कामं झाली आहेत."
 
मागील वर्षी पावसाळी अधिवेशनात लोकसभेत कॅग चा(CAG)अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालात देखील अयोध्येत सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
 
Published By- Priya Dixit