शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (18:25 IST)

मुंबईत बत्तीगुल होण्यामागे सायबर हल्ला? राज्य आणि केंद्र आमने-सामने

मयांक भागवत
बीबीसी मराठी
चीनने सायबर हल्ला केल्याने मुंबईत बत्तीगुल झाली होती का? हा मुद्दा ठाकरे सरकार आणि मोदी सरकारमध्ये वादाचा मुद्दा बनलाय.
 
सायबर हल्ल्याच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्र सरकारने परस्परविरोधी भूमिका घेतली आहे.
 
ठाकरे सरकारचा सायबर हल्ल्यामुळे मुंबईत बत्तीगुल झाल्याचा दावा केला. मोदी सरकारने 'हा सायबर हल्ला नाही' ही तर मानवीय चूक होती असं म्हणून फेटाळून लावलाय.
दरम्यान, राज्याचे उर्जामंत्री सायबर सेलचा चौकशी रिपोर्ट बुधवारी विधीमंडळात सादर करणार आहेत.
 
मुंबईत सायबर हल्ला नाही-केंद्र
केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंह यांनी ठाकरे सरकारचा चिनी सायबर हल्ल्यामुळे मुंबईत बत्तीगुल झाल्याचा दावा फेटाळून लावलाय.
 
पत्रकारांशी दिल्लीत बोलताना केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंह म्हणाले, "मुंबईत ग्रीड बंद होण्यामागे सायबर हल्ला नव्हता. ही एक मानवीय चूक होती."
 
"मुंबईतल्या पॉवर कट घटनेची दोन पथकांनी चौकशी केली. चौकशी समितीने रिपोर्ट सूपूर्द केलाय. बत्तीगुल होण्यामागे मानवीय चूक कारणीभूत आहे, सायबर हल्ला नाही," असं एएनआय न्यूज एजेंसीशी बोलताना केंद्रीय उर्जामंत्री पुढे म्हणाले.
 
"लोड डिस्पॅच सेंटरवर झाला सायबर हल्ला"
महाराष्ट्र सरकारचा मुंबईत बत्तीगुल होण्यामागे सायबर हल्ल्याचा दावा फेटाळून लावताना. केंद्रीय उर्जामंत्र्यांनी उत्तर आणि दक्षिणेच्या लोड डिस्पॅच सेंटरवर सायबर हल्ला झाल्याचं मान्य केलं.
 
"उत्तर आणि दक्षिण विभागातील लोड डिस्पॅच सेंटरवर सायबर हल्ला करण्यात आला. पण, वीज कंपन्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिमपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत." अशी माहिती केंद्रीय उर्जामंत्र्यांनी दिली.
सायबर हल्ला चीन किंवा पाकिस्तानकडून करण्यात आला. याबाबत आमच्याकडे पुरावे नाहीत. हल्ल्यामागे परदेशी हात असल्याचे पुरावे नसल्याचं, केंद्रीय उर्जामंत्री म्हणाले.
 
बत्तीगुलमागे सायबर हल्ला- अनिल देशमुख
एकीकडे, मोदी सरकारने मुंबईत बत्तीगुल होण्यामागे सायबर हल्ला नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, राज्यसरकार यामागे सायबर हल्ला असल्याचा दावा करत आहे.
 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकारांशी बोलताना मुंबईत म्हणाले, "मुंबईतील घटनेमागे सायबर हल्ला असू शकतो, ही शक्यता सायबर विभागाने वर्तवली आहे. 14 ट्रोजन हॉर्सेस (व्हायरस) सर्व्हरमध्ये टाकल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याचसोबत, 8 जीबी टाडा परदेशातून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रास्फर झाल्याचं आढळून आलंय."
 
मुंबईतील बत्तीगुल घटनेची महाराष्ट्राच्या सायबर क्राइम विभागाने चौकशी केली. हा चौकशी रिपोर्ट गृहमंत्र्यांनी उर्जा विभागाला सूपूर्द केला आहे.
"ब्लॅकलिस्टेड इंटरनेट प्रॉटोकॉल अड्रेसच्या माध्यमातून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉगइन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता सायबर विभागाने चौकशी रिपोर्टमध्ये वर्तवली आहे," असं गृहमंत्री पुढे म्हणाले.
 
दरम्यान केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंह यांनी मंगळवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सायबर हल्ल्याच्या रिपोर्टबाबत चर्चा केली.
 
गृहमंत्र्यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीचा उल्लेख पत्रकारांशी बोलताना केला. ज्यात मुंबईच्या घटनेमागे सायबर हल्ला असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
 
विधी मंडळासमोर ठेवणार अहवाल-नितीन राऊत
 
केंद्र सरकारने जरी सायबर हल्ल्याची शक्यता नाकारली असली. तरी, राज्य सरकार सायबर विभागाचा अहवाल विधीमंडळासमोर ठेवणार आहे.
 
याबाबत माहिती देताना उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, "माझी केंद्रीय उर्जामंत्र्यांशी चर्चा झालेली नाही. मात्र, सायबर हल्ल्याच अहवाल मी सदनासमोर ठेवणार आहे."
 
केंद्रीय उर्जामंत्र्यांनी सायबर हल्ल्याचा दावा फेटाळल्याबाबत बोलताना नितीन राऊत म्हणाले, "त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यात. मी रिपोर्ट सदनात मांडेन. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करेन."
 
राज्य-केंद्र वाद
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात अनेक मुद्यांवरून वाद सुरू आहेत. जीएसटीच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या थेट विरोधात भूमिका घेतली आहे.
 
त्यामुळे मुंबईती बत्तीगुल होण्यामागे सायबर हल्ल्याचा केंद्राने फेटाळून लावलेला दावा राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आणखी एक वादाचा मुद्दा ठरणार आहे.