शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (18:27 IST)

सीताबाई तडवीः दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातल्या सीताबाई तडवींचा मृत्यू

26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सीताबाई तडवी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून गेल्या होत्या. तिथून परतताना जयपूर येथे थंडीच्या कडाक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
 
सीताबाई महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी गावात राहणाऱ्या लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या होत्या. गेल्या 25 वर्षांत लोक संघर्ष मोर्च्यात त्या कायम पुढे असायच्या.
 
त्यांच्या गावात एकदा एका धरणामुळे अनेक लोक विस्थापित होणार होते तेव्हाही त्यांनी मोठा संघर्ष केला होता. तो संघर्ष आजपर्यंत सुरू आहे. या संघर्षासाठी त्यांना अनेकदा कारावासही भोगावा लागला.
 
वन जमिनीच्या लढाईतही त्यांनी मुंबईत उपोषण केलं होतं. वन अधिकार कायद्याच्या लढाईतही त्या अग्रेसर होत्या. नंदुरबार ते मुंबई या 480 किमी यात्रेत 5000 लोकांच्या साथीने केलेल्या आंदोलनात सीताबाईंचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. 2018 मध्ये मुंबईला निघालेल्या पायी मोर्चात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
 
सीताबाईंचं संपूर्ण कुटुंब विविध आंदोलनात सहभागी असे. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर 22 डिसेंबरला अंबानींच्या आंदोलनातही त्यांनी सहभाग नोंदवला होता. आता 16 जानेवारीपासून ते 27 जानेवारीपर्यंत त्या दिल्लीतल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. मात्र थंडीच्या कडाक्याने त्यांचा मृत्यू झाला.
 
सीताबाई आदिवासी समाजाच्या शेतकरी होत्या आणि अनेक आंदोलनात त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी भाग घेतला होता. उद्याा त्यांच्या मुळगावी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील.