बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 22 जून 2020 (16:43 IST)

भारत-चीन सीमा वाद : चीनच्या षडयंत्रला बळ मिळेल, असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी करू नये - डॉ. मनमोहन सिंग

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत-चीन सीमा वादासंदर्भात आपली भूमिका मांडणारं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यातून डॉ. मनमनोह सिंग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
 
15-16 जूनच्या रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे जे सैनिक शहीद झाले, त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको, असं डॉ. मनमोहन सिंग म्हणालेत.
 
"आपण इतिहासाच्या अत्यंत नाजूक ठिकाणी उभे आहोत. आपलं सरकार आता जे निर्णय घेईल आणि जी पावलं उचलेल, त्या निर्णयांवरून भविष्यातील पिढ्या आपल्याबद्दलचं आकलन करतील. त्यामुळे देशाचं आता नेतृत्त्वं करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे.
 
आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांवर असते. त्यामुळे देशाची सुरक्षा, सैन्य आणि भूभागीय हितावर प्रभाव पडणाऱ्या घोषणांबाबत पंतप्रधानांनी आपल्या शब्दांबाबत अधिक सावध राहिलं पाहिजे," असं मनमोहन सिंग यांनी मोदींना उद्देशून म्हटलं.
 
"एप्रिल 2020 पासून आजपर्यंत चीनने भारतीय सीमाभागातील गलवान खोरं, पँन्गॉग त्सो लेक इथे अनेकदा जबरदस्तीनं घुसखोरी केलीय," असं नमूद करत डॉ. सिंग पुढे म्हणाले, "चीनच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही. चीनसमोर झुकणार नाही आणि त्यांच्याशी कुठली तडजोडही करणार नाही."
 
"पंतप्रधानांनी चीनच्या षडयंत्राला बळ मिळेल, अशी वक्तव्य करू नयेत. शिवाय, हे प्रकरण अधिक चिघळणार नाही, यासाठी संपूर्ण सरकारनं एकीनं काम करावं," असा सल्ला डॉ. सिंग यांनी दिला.
 
यावेळी मनमोहन सिंग यांनी मोदींना कानपिचक्याही दिल्यात. ते म्हणतात, "भ्रामक प्रचार कधीच मत्सुद्देगिरी आणि कणखर नेतृत्त्वाचा पर्याय ठरू शकत नाही. खुशमस्करी करणाऱ्या नेत्यांच्या आडून सत्य परिस्थिती फार काळ लपवता येणार नाही."