शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (18:02 IST)

IPL Auction: 2020च्या लिलावात कोण-कोणत्या खेळाडूंवर असेल लक्ष?

इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या हंगामासाठी लिलाव कोलकाता इथं 19 डिसेंबरला होणार आहे. या लिलावात 332 खेळाडू असतील. यामध्ये भारताचे 186 खेळाडू आहेत तर विदेशी खेळाडूंची संख्या 143 आहे. असोसिएट देशांच्या तीन खेळाडूंची लिलावासाठी निवड झाली.
 
चर्चेतले खेळाडू
2 कोटी बेस प्राईज सात विदेशी खेळाडूंनी निश्चित केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर्स पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांचा समावेश आहे. मानसिक आजारपणामुळे खेळातून काही काळासाठी विश्रांती घेणारा ग्लेन मॅक्सवेल लिलावात कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ शकतो. मॅक्सवेल याआधी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यासाठी खेळला आहे.
 
कोलकाता नाईट रायडर्सचा भाग असणारा ख्रिस लिन आता लिलावात आहे. अष्टपैलू मिचेल मार्श आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे, मात्र फिटनेस आणि वर्तन या दोन गोष्टींमुळे तो वादग्रस्त ठरला आहे.
 
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फास्ट बॉलर डेल स्टेन पुनरागमनसाठी उत्सुक आहे. स्टेन याआधी डेक्कन चार्जर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळला आहे.
 
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज छाप उमटवण्यासाठी उत्सुक आहे. मात्र मॅथ्यूजचा फिटनेस संघांसाठी अडचणीचा मुद्दा ठरू शकतो.
 
जुनं ते सोनं
सर्वाधिक बेस प्राईज निश्चित करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये रॉबिन उथप्पा, पीयुष चावला, युसुफ पठाण आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी खेळाडूंनी 1.5 कोटीची बेस प्राईज पक्की केली आहे. उथप्पा आणि चावलाला कोलकाता संघाने रिलीज केलं आहे तर सनरायझर्स हैदराबादने युसुफला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
 
राजस्थानने 8 कोटी रुपये खर्चून गेल्या वर्षी जयदेव उनाडकटला ताफ्यात समाविष्ट केलं मात्र अपेक्षित कामगिरी न झाल्याने त्यांनी त्याला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तरुण तारे
U19 क्रिकेटमध्ये छाप उमटवल्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारे तीन युवा खेळाडू चर्चेत आहे. मुंबईकर यशस्वी जयस्वाल विजय हजारे करंडक स्पर्धेत द्विशतकी खेळी साकारली. आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध यशस्वीला ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी अनेक संघ उत्सुक आहेत.
 
प्रियम गर्ग पुढील वर्षी होणाऱ्या U19 स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. मात्र त्याआधी आयपीएल संघांच्या नजरा या युवा खेळाडूवर आहेत. सातत्याने रन्स करणारा प्रियम कोणत्या संघातून खेळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
 
प्रयास राय बर्मनला गेल्या वर्षी बेंगळुरू संघाने उत्साहात समाविष्ट केलं. मात्र एका हंगामातच त्यांचा विचार बदलला. त्यामुळे प्रयासचं नाव लिलाव यादीत आहे.
 
कुणाला लॉटरी लागणार?
भारतीय टेस्ट संघाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा, अष्टपैलू हनुमा विहारी, बॉलर मोहित शर्मा, अष्टपैलू दीपक हुडा यांच्यासह आक्रमक बॅट्समन राहुल त्रिपाठी, विराट सिंग चर्चेत आहेत. इशान पोरेलने आपल्या भन्नाट वेगाने सातत्याने विकेट्स मिळवल्या आहेत. त्याच्या नावाकडे लिलावात लक्ष असेल.
 
अनेक वर्ष किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग असलेला डेव्हिड मिलर यंदा लिलाव यादीत आहे. जोरदार टोलेबाजी आणि अफलातून फिल्डर अशी मिलरची ओळख आहे. वेस्ट इंडिजचा शिमोरन हेटमेयर लिलावाचं आकर्षण ठरू शकतो.
 
हा लिलाव छोट्या स्वरूपासाठी असेल कारण पुढच्या वर्षीनंतर आयपीएल संघांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे.