गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (11:16 IST)

इराण विमान अपघात: युक्रेनच्या विमानावर 'चुकून' हल्ला केल्याची इराणची कबुली

युक्रेनच्या विमानावर अनवधानाने हल्ला केल्याचं इराणच्या सैन्याने म्हटलं आहे. इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलने ही माहिती दिली आहे.
 
शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात हा हल्ला म्हणजे एक मानवी चूक होती असं इराणने म्हटलं आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई करण्यात येईल असंही या निवेदनात पुढे म्हटलं आहे.
 
बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत इराणच्या एका क्षेपणास्त्रामुळेच हे विमान कोसळल्याच्या आरोपाचा इराणने इन्कार केला होता.
 
युक्रेन एअरलाईन्सच्या PS752 हे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 176 लोकांचा मृत्यू झाला होता. इराणने अमेरिकेवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला होता.
 
इराणने अमेरिकेविरोधात हल्ल्याची तयारी केली होती. त्यामुळे हे विमान म्हणजे अमेरिकेचंच युद्धविमान असेल असा इराणचा समज झाला असावा असा दावा अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी केला होता.
 
काय घडलं?
युक्रेन इंटनॅशनल एअरलाईन्सचं फ्लाईट क्रमांक PS752 हे विमान बुधवारी 176 प्रवाशांना घेऊन तेहरानच्या विमानतळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जात असताना उड्डाणाच्या काही मिनिटातच कोसळलं. विमानात बहुतांश प्रवासी कॅनडा आणि इराणचे होते.
 
युक्रेनच्या तेहरानमधल्या दूतावासाने सुरुवातीला या अपघातचं कारण इंजिनात झालेला बिघाड असल्याचं म्हटलं होतं. मात्र, काहीवेळाने तपास आयोगाच्या अहवालानंतरच विमान दुर्घटनेचं नेमकं कारण सांगता येईल, असं म्हणत त्यांनी पत्रक माघारी घेतलं होतं.
 
विमानाने उड्डाण घेतलं तेव्हा व्हिझिबिलिटी (दृश्यमानता) चांगली होती आणि विमान चालक दलही अनुभवी होता.
 
कुठलाही अधिकृत अहवाल येत नाही तोवर या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवू नये, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला आहे.
 
इराणने या दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे. ही दुर्घटना म्हणजे दहशतवादी कारवाई नाही, असंही इराणकडून सांगण्यात आलं आहे.
 
विमानात कोण-कोण होतं?
विमानात 82 इराणी नागरिक, 63 कॅनेडियन नागरिक, चालक दलासह 11 युक्रेनचे नागरिक, 10 स्वीडनचे नागरिक, 4 अफगाणिस्तानचे नागरिक आणि ब्रिटन आणि जर्मनीचे प्रत्येकी 3-3 प्रवासी होते, अशी माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. मृतांमध्ये 15 मुलांचा समावेश आहे.
 
मात्र, दुर्घटनाग्रस्त विमानात जर्मन नागरिक होते का, याविषयी खात्रीशीर माहिती आपल्याकडे नसल्याचं जर्मनी सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
 
इराणच्या एका अधिकाऱ्याने विमानात 147 इराणी नागरिक असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच प्रवाशांपैकी काही जणांकडे दुहेरी नागरिकत्व असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.