बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (16:04 IST)

जयंत पाटील : 105 जणांना बाजूला ठेवून महाराष्ट्राची आम्हाला पसंती, वेगळ्या पर्यायाची चर्चा नको

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीवरून उलटसुलट चर्चा सुरू होती.
त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं की, "शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. ते अनेक नेत्यांना कामासाठी भेटत असतात. अनेक जण पवारांचा सल्ला ही घेत असतात. त्यामुळे या भेटीमध्ये मला विशेष काही वाटत नाही. त्यात काही संदेह असण्याची गरज नाही."
 
बीबीसी मराठीच्या प्राजक्ता पोळ यांनी जयंत पाटील यांची सविस्तर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा संपादित अंश इथे देत आहोत.
 
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 31 मे रोजी त्यांच्या सिव्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली आणि महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडलीच.
 
पवार-फडणवीस भेटीचे वेगवेगळे अर्थ काढण्यात राजकीय पंडित व्यग्र असतानाच काँग्रसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून थेट शरद पवार यांना 'आम्हाला सुरा खुपसण्याची सवय नाही' असा आरोपवजा इशारा दिला होता. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते की, "शरद पवार थेट अमित शहांनाही भेटले आहेत, त्यामानाने देवेंद्र फडणवीस छोटे कार्यकर्ते आहेत."
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर असलेली नाराजी उघडपणे दिसून आली. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "त्यांच्या मनातली अस्वस्थता काय आहे याबद्दल मला माहिती नाही. पण पवार साहेब हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत आणि अनेक नेते त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी भेटत असतात. त्याचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही."
नाना पटोलेंच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ते त्यांचं मत आहे आणि त्यावर अधिक भाष्य करणं मला गरजेचं वाटत नाही.
 
2014 साली राष्ट्रवादीने भाजपला राज्यात सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2019 साली राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा पहाटे झालेला शपथविधी गाजला.
 
या पार्श्वभूमीवर महाआघाडीचं सरकार टिकणार नाही आणि त्यासाठी राष्ट्रवादी कारणीभूत असेल अशी संशयाची सुई कायम राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेली असते याबद्दल विचारलं असता ते म्हणतात, "शरद पवारांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलेलं आहे. हे सरकार अस्थिर व्हावं असे काहींचे प्रयत्न जरूर आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांतून गैरसमज पसरवणं, शंका उत्पन्न करणं, पक्षात फुट पाडण्याचा प्रयत्न करणं अशा गोष्टी गेल्या दीड वर्षापासून सुरू आहेत पण ते प्रयत्न यशस्वी होत नाहीत.
 
"105 जणांना बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला पसंती दिलेली आहे. त्यामुळे वेगळ्या पर्यायाची चर्चा होण्याची गरज नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आम्ही ही टर्म 2024 पर्यंत पूर्ण करू."
कोरोना काळात नाही पण त्यानंतर आमचीच सत्ता येईल, असा दावा देवेंद्र फडणवीस करतात त्यावर तुमचं काय म्हणणं आहे असं विचारल्यानंतर जयंत पाटील सांगतात की, "असा दावा फडणवीसांनी अनेकदा केला आहे. तसं केलं नाही तर त्यांचं सैन्य, त्यांचे लोक त्यांच्याबरोबर राहणार नाहीत. आपल्या लोकांना धाकात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही."
 
आरक्षणवरही जयंत पाटील बोलले आहेत. मराठा आरक्षण रद्द झालं, तर स्थानिक स्वराज्य संस्थामधलं ओबीसी आरक्षण कोर्टात रद्द झालं याचा तुम्हाला राजकीय फटका बसणार का याचं उत्तर देताना ते म्हणाले, "हे निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी घटनेत बदल होणं अपेक्षित आहे, त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणं अपेक्षित आहे.
 
"घटनेतून जे प्रश्न तयार झालेत त्यासाठी कोणत्या पक्षाला दोष देणं बरोबर नाही. आपल्या वकिलांनी सर्वोतपरी बाजू मांडली होती. आता नरेंद्र मोदींनी यात हस्तक्षेप करणं अभिप्रेत आहे."
 
जयंत पाटलांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवरही भाष्य केलं आणि ते म्हणाले की, "संभाजीराजे पक्षाची (भाजपची) भूमिका डोक्यात ठेवून नव्हे तर मराठा समाजासाठी काम करतायेत. त्यामुळे भाजपने किंवा चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर चिडू नये."
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपण स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं म्हटलं आहे.
 
आगामी निवडणुकांमधल्या राजकीय समीकरणांबाबत बोलताना पाटील म्हणाले, "काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महानगरपालिका निवडणुकीत एकत्र यावेत असं आम्हा सगळ्यांना अभिप्रेत आहे. कारण आपण सरकारमध्ये एकत्र आहोत. पण जर त्यापेक्षा वेगळी चूल त्यांना मुंबईत मांडायची असेल तर त्याला कुणी बंधन करू शकत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, त्या त्या वेळी वातावरण कसं असेल त्यावरून ठरेल. आज किती कुणी काही बोलत असलं तरी शेवटच्या आठवड्यात चित्र तयार होईल तेच खरं चित्र."