शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (13:47 IST)

जो बायडन शपथविधी : 'इनॉगरेशन' म्हणजे काय? कधी होणार हा सोहळा?

अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला 'इनॉगरेशन' म्हटलं जातं. खरंतर या दिवसासाठीच्या प्रक्रिया आणि सोपस्कार वर्षानुवर्षं ठरलेल्या पद्धतीने होत आलेले आहेत. पण यावर्षी काहीसं वेगळं चित्र पहायला मिळेल.
 
जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा 20 जानेवारीला शपथविधी होईल आणि त्यानंतर ते अधिकृतरीत्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष होतील. पण कोव्हिड 19ची साथ आणि कॅपिटल इमारतीवर नुकताच झालेला हल्ला यामुळे यावेळी हा सोहळा भव्यदिव्य असणार नाही.
 
नेमकं काय काय होईल या शपथविधीच्या दिवशी, आपण जाणून घेऊयात
 
इनॉगरेशन - Inauguration म्हणजे काय?
 
हा एक अधिकृत सोहळा आहे ज्याच्यानंतर अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सुरू होतो. वॉशिंग्टन डी.सी.मध्ये हा सोहळा होतो.
 
यामध्ये निवडून आलेले नवर्निवाचित राष्ट्राध्यक्ष (President - Elect) राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ (Presidential oath of office) घेतात.
 
"मी पूर्ण गांभीर्याने शपथ घेतो की मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी निष्ठेने पार पाडीन आणि अमेरिकेच्या संविधानाचं जतन, संरक्षण आणि समर्थन करण्यासाठी माझ्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करीन."
 
अशी शपथ घेतल्यानंतर जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष होतील आणि इनॉग्युरेशन पार पडेल. पण यानंतर आनंदोत्सव सुरू राहील.
 
कमला हॅरिस या देखील या सोहळ्यात पदाची शपथ घेत अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष होतील. सहसा राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेण्याआधी उप-राष्ट्राध्यक्षांना शपथ दिली जाते.
 
जो बायडन यांचा शपथविधी कधी आहे?
 
कायद्यानुसार 20 जानेवारीला हा सोहळा होतो. वॉशिंग्टनमध्ये सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि दुपारपर्यंत जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी होईल.
 
त्यानंतर जो बायडन हे व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतील आणि पुढची 4 वर्षं हे त्यांचं घर असेल.
 
सुरक्षा व्यवस्था कशी असेल?
राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. पण 6 जानेवारीला ट्रंप समर्थकांनी कॅपिटल इमारतीवर हल्ला करत या इमारतीत शिरकाव केल्यानंतर यावेळी नेहमीपेक्षा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
 
वॉशिंग्टन डी.सी. शहरातली सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली असून शहरातले अनेक भाग बंद करण्यात आले आहेत. सुरक्षा विषयक आखणीची सर्वं सूत्रं सिक्रेट सर्व्हिसने आपल्या हाती घेतली असून हजारो पोलिस अधिकाऱ्यांसोबतच 25,000 नॅशनल गार्ड्सचं सैन्यदलही तैनात करण्यात आलेलं आहे.
 
वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून हा सोहळा पूर्ण होईपर्यंत ती कायम राहील.
 
गेला वर्षभरापेक्षा अधिक काळ या इव्हेंटसाठीची आखणी आणि नियोजन सुरू असल्याचं सिक्रेट सर्व्हिसतर्फे या सोहळ्याचं नेतृत्त्वं करणाऱ्या एजंट मॅट मिलर यांनी पत्रकारांना सांगितलं.
 
परंपरेनुसार आपण कॅपिटल बिल्डिंगच्या पायऱ्यांवरच शपथ घेणार असल्याचा आग्रह जो बायडन यांनी धरला असला, तरी या सोहळ्याला हजर राहू शकणाऱ्यांच्या संख्येत मात्र कपात करण्यात आली आहे.
 
डोनाल्ड ट्रंप हजर राहणार का?
मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी नवीन राष्ट्राध्यक्षांना शपथ घेताना पाहण्यासाठी हजर राहणं हा शिष्टाचार आतापर्यंत कायम पाळला गेलाय. पण यावर्षी असं होणार नाही. या सोहळ्याला मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हजर राहणार नाहीत.
 
"मला प्रश्न विचारणाऱ्या सर्वांसाठी, मी 20 जानेवारीला होणाऱ्या शपथविधीला जाणार नाही," असं ट्रंप यांनी 8 जानेवारी रोजी ट्वीट केलं होतं. ते त्यांच्या फ्लोरिडामधल्या निवासस्थानी जातील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
 
तर आपण त्याच दिवशी ट्रंप यांच्यासाठी 'दुसरं इनॉगरेशन' म्हणजे दुसरा शपथविधी सोहळा व्हर्च्युअली आयोजित करणार असल्याचं ट्रंप यांच्या काही समर्थकांनी म्हटलंय. ट्रंप यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण या ऑनलाईन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं 68,000 पेक्षा जास्त जणांनी फेसबुकवर म्हटलंय.
 
ट्रंप यांच्या शपथविधीला हिलरी क्लिंटन त्यांचे पती माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबत हजर होत्या. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून पराभव झालेला होता.
 
आतापर्यंत जॉन अॅडम्स, जॉन क्विन्सी अॅडम्स आणि अँड्र्यू जॉन्सन या तीनच राष्ट्राध्यक्षांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधीला हजर न राहणं पसंत केलंय. गेल्या शतकात असं कधीच घडलं नव्हतं.
 
पण आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी म्हटलंय.
 
कोव्हिड 19 मुळे काय बदल करण्यात आले आहेत?
एरवीच्या परिस्थितीत शपथविधीच्या या कार्यक्रमासाठी हजारो लोक वॉशिंग्टन डीसीमध्ये आले असते आणि नॅशनल मॉलचा परिसर लोकांनी गजबजून गेला असता आणि शहरातली सगळी हॉटेल्स भरून गेली असती. बराक ओबामांनी 2009मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा जवळपास 20 लाख लोकांनी हजेरी लावल्याचा अंदाज आहे.
 
पण यावर्षी ही संख्या अगदी मर्यादित असेल. अमेरिकन नागरिकांनी या सोहळ्यासाठी राजधानीत येऊ नये, असं आवाहन बायडन यांच्यावतीने करण्यात आलंय. संसदेमध्ये ट्रंप समर्थकांनी घुसखोरी केल्यानंतर आता वॉशिंग्टन डीसीमधल्या प्रशासनानेही हेच आवाहन केलंय. या सोहळ्यासाठी उभारण्यात आलेले स्टँड्सही काढून टाकण्यात आले आहेत.
 
यासोहळ्या दरम्यान एक परंपरा मात्र पाळली जाईल ती म्हणजे बायडन आणि हॅरिस हे नॅशनल मॉलच्या समोर असणाऱ्या अमेरिकन कॅपिटल इमारतीच्या बाहेर शपथ घेतील. 1981मध्ये रोनाल्ड रेगन यांच्या शपथविधीपासून ही प्रथा सुरू झाली होती.
 
या सोहळ्याला 200 जण सोशल डिस्टंसिंग पाळून उपस्थित राहणार असल्याचं वॉशिंग्टन पोस्टने म्हटलंय.
 
या सगळ्यांनी मास्क घातलेला असेल आणि व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या सर्वांची या सोहळ्याच्या दोन दिवस आधी कोव्हिड चाचणी करण्यात येत आहे. शपथ घेताना आपण मास्क घालणार नसल्याचं बायडन यांनी जूनमध्येच म्हटलं होतं.
 
हा अधिकृत सोहळा पाहायला हजर राहण्यासाठी पूर्वी 2 लाख तिकीटं विकली जात असत. पण आता अमेरिकेमधली रुग्णसंख्या वाढत असल्याने फकत 1,000 तिकीटं विकण्यात येत आहेत.
 
दरवेळी होणारा 'Pass in review' कार्यक्रमही यावेळी होईल. यामध्ये सत्तेचं शांततापूर्ण हस्तांतरण केलं जातं आणि नवीन प्रमुख हे लष्करी दलांची पाहणी करतात. पण दरवेळच्या पेन्सलव्हेनिया अॅव्हेन्यू ते व्हाईट हाऊस परेड ऐवजी यावेळी 'व्हर्च्युअल परेड' होईल.
 
यानंतर लष्कराचे अधिकारी जो बायडन - त्यांच्या पत्नी आणि कमला हॅरिस - त्यांचे पती यांना व्हाईट हाऊसकडे घेऊन जातील. त्यावेळी लष्कराचं बँड - ड्रम पथक सोबत असेल.
 
कोणते कार्यक्रम होणार?
गेल्या काही वर्षांमध्ये शपथ घेणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी देशातल्या लोकप्रिय कलाकारांना या कार्यक्रमाला आमंत्रित केलंय. यावर्षी कोरोनाची साथ असली, तरी हे कार्यक्रम होतील.
 
यावर्षी या सोहळ्यासाठी लेडी गागा राष्ट्रगीत गातील तर जेनिफर लोपेझ यांचा म्युझिकल परफॉर्मन्स असेल.
 
लेडी गागांनी जो बायडन यांना निवडणुकीदरम्यानही जाहीर पाठिंबा दिला होता.
 
बायडन यांचा शपथविधी झाल्यानंतर अभिनेते टॉम हँक्स हे 90 मिनिटांच्या टीव्ही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील. यामध्ये गार्थ ब्रुक्स, जॉन बॉन जोव्ही, डेमी लोवॅटो आणि जस्टिन टिंबरलेक या दिग्गजंचा समावेश असेल आणि अमेरिकेतली सर्व मोठी चॅनल्स आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स हा कार्यक्रम दाखवतील.
 
फक्त फॉक्स न्यूज हा कार्यक्रम दाखवणार नाही. फॉक्स न्यूजने ट्रंप यांना त्यांच्या कार्यकाळात पाठिंबा दिला होता.
 
डोनाल्ड ट्रंप यांना त्यांच्या शपथविधीसाठी कलाकार मिळवताना अडचण आल्याचं सांगितलं गेलं होतं. एल्टन जॉन यांनी ट्रंप यांचा प्रस्ताव नाकारला होता. सेलीन डिऑन, किस आणि गार्थ ब्रुक्स यांनीही असंच केल्याचं समजतं. शेवटी द रॉकेट्स, ली ग्रीनवुज आणि थ्री डोअर्स डाऊन या बँडने या कार्यक्रमादरम्यान कला सादर केली होती.