मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (16:37 IST)

महाराष्ट्र सत्तासंघर्ष: शरद पवार पुन्हा सोनिया गांधींना भेटणार

Maharashtra power struggle: Sharad Pawar will meet Sonia Gandhi again
सत्ता स्थापनेच्या दृष्टीने घडामोडी होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
 
नवीन सरकार 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल अशी चर्चा होती मात्र ते अवघड असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 17 नोव्हेंबरला नवं सरकार स्थापन होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र इतक्या लवकर सरकार स्थापन होऊ शकत नाही असं पवारांनी सांगितलं.
 
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आमची काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. या तीन पक्षांनी स्थापन केलेलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार. सरकार 5 वर्ष चालावं याकडे आमचा भर असेल असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
 
भाजपला सर्वाधिक मतं मिळाली होती मात्र मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरून भाजप-शिवसेना युतीचं बिनसल्याने त्यांचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं.
 
24 तासांत शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला मात्र निर्धारित वेळेत त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून पाठिंब्याचं पत्र मिळू शकलं नाही. केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.