रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (16:23 IST)

मेरी कोम : BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन

- ऋजुता लुकतुके
पद्मविभूषण आणि सहावेळा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या मेरी कोमशी तुम्ही गप्पा मारत असता तेव्हा अशी वाक्यांवर वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतात. मेरी अशीच आहे. आत्मविश्वासाचं दुसरं नाव मेरी आहे. आणि तिला ठाम विश्वास आहे, की देवाने तिला खास बनवलंय. म्हणूनच तिचं व्यक्तिमत्वही खास आहे आणि तिचं बॉक्सिंगही नैसर्गिक आहे.
 
आज वयाच्या 37व्या वर्षी मेरीकडे विक्रमी सहा विश्वविजेतेपदं आहेत, ऑलिम्पिक ब्राँझ पदक आहे (ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे), आशियाई आणि राष्ट्रकुल सुवर्णही आहे. यातली बहुतेक पदकं तिने 2005मध्ये आपल्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर जिंकली आहेत. विशेष म्हणजे सिझेरियन नंतर एका वर्षात मेरी पुन्हा रिंगमध्ये उतरली.
 
मेरी कोमकडे तुम्ही बॉक्सिंग रिंगच्या बाहेर बघितलंत तर दिसेल 5 फूट 2 इंच उंचीची एक मुलगी. आणि वजन जेमतेम 48 किलो. बॉक्सिंग सारख्या मर्दानी खेळात ही मुलगी चॅम्पियन होईल असं कुणाला वाटेल का? बॉक्सिंगचा जगज्जेत्याच्या डोळ्यात अंगार हवा आणि देहबोलीत जरब हवी. महम्मद अली किंवा माईक टायसनला आठवा. मेरीकडे यातलं काही नाही, उलट चेहऱ्यावर एक हास्य आहे. पण, ती चपळ आहे, तिच्या हालचाली वेगवान आहे. आणि नजर अर्जुनाप्रमाणे माशाच्या डोळ्यावर म्हणजे विजयावर रोखलेली आहे.
 
'तुमचे कोच, मदतनीस, कुटुंबीय हे सगळे एका मर्यादेपर्यंत तुमच्या बरोबर असतात. एकदा रिंगमध्ये उतरलात की, तुम्ही एकट्या असता. तिथे 9 ते 10 मिनिटांची लढाई तुम्हाला एकट्याला लढायची असते. हे मी नियमितपणे स्वत:ला बजावते. आणि अशा लढाईसाठी स्वत:ला तयार करते.
 
आणि शरीरिक तसंच मानसिक तंदुरुस्तीसाठी मेहनत घेते. नवनवीन तंत्रं शिकते, माझ्या जमेच्या आणि कमकुवत बाजू मला ठाऊक असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मी हुशारीने खेळते.' अलीकडेच एका मुलाखतीत मेरीने मला हे सांगितल्याचं आठवतं.
 
मग मेरीची हुशारी नेमकी कशात आहे?
याचंही उत्तर मेरीकडे तयार आहे. 'अगदी दोन तासांचा सरावही तुम्हाला पुरतो. पण, त्यात शिस्त हवी.' तंदुरुस्ती आणि आहार यातही मेरीचा दृष्टिकोण समतोल आहे. स्वत:वर भाराभर नियम लादण्यापेक्षा सराव आणि आहाराचा क्रम ती स्वत:च्या मर्जीने ठरवते. आजही घरी बनवलेलं मणिपूरी जेवण ती जेवते, भरपूर सारा भात आणि जोडीला वाफवलेला मासा आणि भाज्या.
 
स्वत:चं शरीर आणि आवड-निवडी बघून आपला दिनक्रम आणि सराव क्रम तिने स्वत: ठरवलाय. तिचा मूड आणि स्वभाव बघून बदल करण्याची लवचिकताही ती दाखवते. आणि 37व्या वर्षी जिंकायचं असेल तर असे बदल करावेच लागतात, असं तिचं म्हणणं आहे.
 
'2012 पूर्वीची मेरी आणि आता समोर असलेली मेरी यात फरक आहे. तरुण मेरी रिंगमध्ये पंचवर पंच मारायची. आताची मेरी योग्य संधीसाठी वाट बघते. त्यातून माझी उर्जाही वाचते.'
 
2001मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली. आधी तिचा भर होता तो ताकद आणि दीर्घ काळ खेळू शकण्याच्या क्षमतेवर...पण, अलीकडे तिचं लक्ष असते ते कौशल्य वाढवण्यावर...
 
आव्हानं परतवणारी मेरी
हौशी बॉक्सिंगमध्ये विक्रमी सहावेळा विश्वविजेतेपदावर तिने नाव कोरलंय. सर्वाधिक आठ विश्वविजेतेपद पदकं तिच्याकडे आहेत. फ्लायवेट गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावणारी ती पहिली भारतीय बॉक्सर आहे. आशियाई स्पर्धा (इंचियन, 2014) आणि राष्ट्रकुल स्पर्धेत (गोल्डकोस्ट, 2018) सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे. तर आशियाई स्तरावर विक्रमी पाचवेळी तिने विजेतेपद पटकावलंय.
 
गरीब घरातून आलेल्या मणिपुरी मुलीचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
 
घरची परिस्थिती आणि वातावरण यामुळे लहानपणापासून आव्हानांना झेलण्याची तिला सवय आहे. गरिबीमुळे दिवसभरात फक्त एकवेळ पूर्ण जेवण तिला शक्य होतं. अगदी बॉक्सिंगचा सराव करत असतानाही पोषक आहार कधी मिळालाच नाही.
 
वडिलांना शेतीच्या कामात मदत करणं आणि लहान भावंडांना सांभाळणं यातच तिचा दिवस जात होता. पण, त्या ही परिस्थितीत ती विचार करायची की, आपल्या जीवनाला कसा आकार देता येईल आणि त्यातून परिस्थिती कशी बदलता येईल.
 
अभ्यासात फारशी गती नव्हती. पण, खेळाच्या मैदानात ती खूश असायची. मैदान मारणं तिच्या रक्तातच होतं.
 
त्याच सुमारास तिच्या गावच्या डिंगको सिंगने बँकॉक आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकलं आणि मेरीचं लक्ष बॉक्सिंगकडे गेलं. तिला तिचा मार्ग सापडला. 'बॉक्सिंग म्हणजे माझ्या आयुष्यात सकारात्मकतेची झुळुक होती. आयुष्य कसं जगायचं या खेळाने मला शिकवलं. मला हार मानायची नव्हती. आयुष्यातही आणि बॉक्सिंग रिंगमध्येही.' मेरी हे बोलत असते तेव्हा तिला त्याचा अर्थही कळलेला असतो. आणि तो ती जगतही असते.
 
बॉक्सिंगचा निर्णय तर झाला, पण...
मेरीने बॉक्सिंगला सुरुवात केली पंधराव्या वर्षी. पण लहान चणीमुळे आणि मुलांबरोबर खेळत असल्यामुळे हा खेळ तिच्यासाठी सोपा नव्हताच. मुलांच्या एका ठोशातच ती खाली पडायची. आणि अनेकदा तिच्या चेहऱ्यावर व्रण नाहीतर टेंगुळ याचयं. पण, म्हणून बॉक्सिंग सोडायचा विचार कधी तिच्या मनात आला नाही.
 
'माघार घेण्याचा पर्याय माझ्यासमोर नव्हताच. तुम्ही मला खाली लोळवू शकाल. पण, मी तशीच पडून राहीन हे शक्य नाही. मला पलटवार करता येतो. करावाच लागेल.' तिच्या यशाचं रहस्य हेच आहे.
 
2000 साली राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्यानंतर यशाच्या एकेक पायऱ्या ती चढत गेली. पुढच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ती तयार होती.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर उदय
या प्रवासात तिचे पती ऑनलर कोम यांचीही तिला मदत मिळाली. 2005मध्ये लग्न झाल्यावर दोन वर्षांत मेरीने जुळ्या मुलांना जन्म दिला. ऑनलर यांनी मुलांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली. आणि मेरी पुन्हा रिंगमध्ये उतरली.
 
2008मध्ये पुन्हा एकदा विश्वविजेतपदाला तिने गवसणी घातली. तोपर्यंत देशात खाजगी वृत्त वाहिन्याही आल्या होत्या. त्यांनी केलेल्या कव्हरेजमुळे क्रीडासंस्कृतीही देशात मूळ धरू लागली होती. खेळाडूंना प्रसिद्धी मिळायला लागली. मेरी कोमकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. प्रसिद्धी आणि मान तिच्याकडे चालून आला.
 
काही दिवसांपूर्वी पद्मविभूषण पुरस्कारासाठी तिच्या नावाची घोषणा झाली आहे. भारतरत्नानंतरचा हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला आहे. 25 एप्रिल 2016मध्ये महामहीम राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी तिचं नामनिर्देशन केलं. राज्यसभेतही ती सक्रीय आहे. आणि मणिपुरी लोकांच्या समस्या ती अहमहमिकेनं मांडते.
 
गरिबी आणि प्रतिकुलतेशी झगडून तिने नवी वाट धुंडाळली आणि ऑलिम्पिक यशाला गवसणी घातली. देशातली ती एक प्रथितयश आणि ऑल टाईम ग्रेट अॅथलीट आहे. आताही तीन मुलांची ही आई आपल्या ठरवलेल्या मार्गावर न थकता मार्गक्रमण करतेय. स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेय. आताही तिला समोर दिसतंय ते ऑलिम्पिक सुवर्ण. त्यासाठी टोकयो ऑलिम्पिक पात्रतेचा तिचा प्रयत्न आहे. तिच्या पुढील प्रवासासाठी बीबीसी मराठीच्या तिला शुभेच्छा!